Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 01
October 2023
Time: 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ ऑक्टोबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
· संपूर्ण देशभरात आज सकाळी दहा वाजता 'स्वच्छता ही सेवा' अभियान
· आकांक्षित जिल्ह्यांत जीवनमान सुधारण्यासाठीच्या संकल्प
सप्ताहाला प्रारंभ
· मराठवाडा जनविकास परिषदेचा मराठवाडा भूषण पुरस्कार पद्मश्री
डॉ. रमण गंगाखेडकर यांना प्रदान
आणि
· आशियायी क्रीडा स्पर्धेत टेनिसच्या मिश्र दुहेरीसह स्क्वॉशमध्ये
भारताला सुवर्णपदक
****
संपूर्ण देशभरात आज स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात
येणार आहे. या अभियानात सर्वांनी
सहभागी होण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी
होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचं आवाहन राज्यभरातल्या नागरिकांना
केलं आहे. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक
प्रभागात आज सकाळी १० वाजता या अभियानाला सुरवात होईल.
****
राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआयच्या वतीनं आज एक ऑक्टोबरला स्थानिक परिसर
तर उद्या दोन ऑक्टोबरला राज्यातल्या गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात
येणार आहे.
****
जालना जिल्ह्यात प्रत्येक गावात 'एक तारीख-एक तास-माझ्या गावाच्या
स्वच्छतेसाठी' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य
कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातली पर्यटनस्थळं, बस तसंच रेल्वेस्थानकं, आदी सार्वजनिक ठिकाणी आज महाश्रमदान अभियान राबवलं जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं बुद्ध लेणी परिसरात स्वच्छता ही
सेवा हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय संचार ब्यूरोचे छत्रपती संभाजीनगर इथले क्षेत्रीय प्रचार अधिकारी
संतोष देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली…
"त्याचा मुख्य उद्देश असा आहे
कि गार्बेज फ्री इंडिया
आणि एक लोकामध्य संदेश पाहूंचवाच्या
आहे कि
आपण कुठे हि कचरा
टाकू नये आपण डस्टबिन च्याच
उपयोग करावा आणि एक स्वच्छ भारत आपला
कसा असावा याचा आपण एक सुंदर सुदर्शन देतो या निमित्ताने
करणार आहोत आणि हा एक सुंदर
उपक्रम असणार आहे"
****
सुशासनाच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं, तर आव्हानात्मक उद्दिष्टं देखील साध्य करता
येतात, हे आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाने दाखवून दिल्याचं,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी
दिल्लीत भारत मंडपम इथं 'संकल्प सप्ताह' या विशेष अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर ते काल बोलत होते. देशातल्या ३२९ आकांक्षित जिल्ह्यांमधल्या ५०० गटांमध्ये जीवनमान सुधारणं,
हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्याची संकल्प सप्ताहात
निवड करण्यात आली आहे. परंडा तालुक्यातल्या
दहा मोठया ग्रामपंचायतींचे सदस्य, बचत गट महिला, तसंच ग्रामस्थ या उदघाटन सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले.
****
दोन हजार रुपये मूल्याच्या चलनी नोटा बँक खात्यात जमा
करणं किंवा बदलून घेण्यासाठी सात दिवसांची अर्थात सात ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे. आठ ऑक्टोबरपासून या
शिल्लक नोटा जमा करण्याची सुविधा फक्त रिजर्व्ह बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे.
****
मराठा समाजाला इतर मागास वर्ग - ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून चंद्रपूर इथं उपोषणाला बसलेले ओबीसी
नेते रवींद्र टोंगे यांच्यासह दोन सहकाऱ्यांनी काल आपलं उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परवा ओबीसी नेत्यांच्या बैठकीत
घेतलेल्या सकारात्मक निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलकांना
दिली. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत कोणतंही आरक्षण दिलं
जाणार नाही, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं.
****
किल्लारी भूकंपाला काल तीस वर्ष पूर्ण झाली. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या आपत्तीच्या
वेळी राबवलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्याबद्दल भूकंपग्रस्तांकडून काल किल्लारीत कृतज्ञता
सोहळा घेण्यात आला. शरद पवार, विधान परिषदेचे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी,
या भूकंपात दगावलेल्या नागरिकांच्या स्मृतिंना अभिवादन केलं.
****
विधान परिषदेच्या
उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, तसंच
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी किल्लारी इथं स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून
अभिवादन केलं. भूकंपस्थळी उभारलेल्या फुलपाखरू उद्यानाचं गोऱ्हे यांच्या हस्ते
लोकार्पण करण्यात आलं. भूकंपग्रस्त भागातील प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते
सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन बनसोडे यांनी यावेळी दिलं.
****
या भूकंपात धाराशिव
जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूर इथले अनेक नागरिक दगावले होते. सास्तूर इथं
उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला काल सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
मराठवाडा जनविकास परिषदेचे मराठवाडा भूषण तसंच
मराठवाडा रत्न पुरस्कार काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
प्रदान करण्यात आले. कृषी मंत्री धनंजय
मुंडे यांच्याह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठवाडा
भूषण पुरस्कार पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना प्रदान करण्यात आला. कैलास जाधव, सोनाली मात्रे,
सोमनाथ वाळके, कर्ण एकनाथ तांबे,
मिलिंद शिंदे तसंच आत्माराम सोनवणे यांना विविध क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी मराठवाडा
रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
ईद-ए-मिलादच्या
निमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने काल ठिकठिकाशी शोभायात्रा काढण्यात आल्या. बीड शहरात निघालेला
जुलूस शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत कादर पाशा मशीद परिसरात विसर्जित झाला.
छत्रपती संभाजीनगर इथंही भव्य मिरवणूक काढण्यात आली. नांदेड इथं
आज मिरवणूक काढण्यात येणार आहे.
****
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत काल भारताने
दोन सुवर्णपदकं जिंकली.
टेनिसच्या मिश्र दुहेरीत रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्या
जोडीने सुवर्ण पदक जिंकलं. स्क्वॉश संघानेही पाकिस्तानचा
पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं.
पुरुषांच्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कार्तिक
कुमारनं रौप्य तर गुलवीर सिंगनं कांस्य पदकाची कमाई केली.
नेमबाजीत दहा मीटर एयर पिस्टल मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या
सरबजोत सिंह आणि दिव्या टी एसनं रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत दहा सुवर्ण, १४ रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह एकूण ३८ पदकांची कमाई केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात
तुळजापूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने काल मेरी माटी मेरा देश आणि स्वच्छता
ही सेवा या उपक्रमांतर्गत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीनंतर तुळजापूरचे
तहसीलदार अरविंद बोळंबे यांना अमृत कलश सुपूर्त करण्यात आला.
****
इंडिया आघाडी ही वैचारिक आघाडी असून, या वैचारिक चौकटीत बसणाऱ्या सगळ्या
पक्षांचं आघाडीत स्वागत असल्याचं, मार्क्सवादी कम्युनिस्ट
पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार सीताराम येचुरी यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महागाई तसंच बेरोजगारी
संदर्भात बोलताना, चमकणारा भारत आणि तरसणारा भारत असं आज
चित्र निर्माण झाल्याची टीका येचुरी यांनी केली.
****
जालना इथं राज्य राखीव पोलिस दलाच्या
एका जवानाने काल कर्तव्यावर असतांना स्वतःजवळील रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. सचिन गोविंद भदरगे असं या आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. भदरगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणसाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
****
परभणी इथले मराठीचे निवृत्त प्राध्यापक शेख शफी यांचं
काल निधन झालं, ते ७६ वर्षाचे
होते. संत साहित्य हा व्यासंगाचा विषय असलेले शेख शफी हे
अध्यापनासोबतच परभणी इथं सांस्कृतिक, संगीत, नाट्य आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत होते. ‘मराठवाड्याचा
मळा आणि खानदेशचा गळा’, या लोकप्रिय कार्यक्रमाचे निवेदक आणि
सूत्रधार असलेले शफी यांनी प्रसिद्ध बासरी वादक दत्ता चौगुले यांच्या ‘दुष्यंतकुमार की गझले’ या कार्यक्रमाची निर्मितीही
केली होती.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या धर्माबादचे माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांचं काल दुपारी
निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या
पार्थिव देहावर आज दुपारी एक वाजता रत्नाळी इथं अंत्यसंस्कार होणार आहे.
****
स्वच्छता
पंधरवडा, स्वच्छता ही सेवा
या अभियानांतर्गत नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते
सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा
साहित्य वाटप करण्यात आलं तसंच त्यांची कुटुंबीयांसह आरोग्य तपासणी करण्यात आली.
****
मराठा
समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात नांदेड
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत
आहे. याच मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगाव
तहसील कार्यालयासमोर वाघोरा ग्रामस्थांनी काल ठिय्या आंदोलन केलं.
दरम्यान, धनगर आरक्षणाच्या
मागणीसाठी गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यात नायगाव तसंच बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा इथं काल दोन तास
चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज 'वेध परिषदे'चं आयोजन करण्यात
आलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज सकाळी १० ते संध्याकाळी
५ या वेळेत ही परिषद होणार आहे.
****
No comments:
Post a Comment