Monday, 2 October 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०२ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि विजय घाटावर लालबहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली.

तत्पूर्वी, महात्मा गांधींची कालातीत शिकवण आपला मार्ग उजळत राहाते, तर आव्हानात्मक काळात शास्त्रीजींचं नेतृत्व अनुकरणीय असल्याचं पंतप्रधानांनी टविट संदेशात म्हटलं आहे.

****

सप्टेंबर महिन्यात देशातलं जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, एक लाख ६२ हजार ७१२ कोटी रुपये इतकं झालं आहे. हे संकलन गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या संकलनापेक्षा दहा टक्क्यांनी अधिक आहे. २०२३-२४ मध्ये जी एस टी संकलनानं आतापर्यंत चार वेळा एक लाख ६० हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा राज्यासाठी राष्ट्रीय हळद मंडळ आणि सम्माक्का सारक्का आदिवासी विद्यापीठाची घोषणा केली. महाबुबनगर मध्ये काल विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी १३ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या मध्यस्थी नंतरही नाशिक जिल्ह्यातले कांदा व्यापारी, लिलाव बंद आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

****

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी काल दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. खेड, संगमेश्वरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. मुंबई-गोवा महामार्गावर निवळीमध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. खेडमध्ये जगबुडी नदीची पाणीपातळी वाढल्यानं नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...