Wednesday, 25 October 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 25.10.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 25 October 2023

Time: 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      विजयादशमीचा सण उत्साहात साजरा;आदिशक्तींचं सीमोल्लंघन, दीक्षाभूमीवर धम्मवंदना तसंच नांदेडच्या हल्लाबोल कार्यक्रमात नागरिकांचा लक्षणीय सहभाग

·      कोणावरही अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध-मुख्यमंत्र्यांची शपथेवर ग्वाही; तर आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका

·      माजी खासदार नीलेश राणे यांचा सक्रीय राजकारणातून संन्यास

आणि

·      पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत काल तीन सुवर्णांसह भारताकडून सतरा पदकांची लयलूट

सविस्तर बातम्या

विजयादशमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या प्रांगणात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या द्वारका भागात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचं पूजन केलं. यावेळी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन करून रामलीलेचा समारोप झाला

सरस्वती पूजनासोबतच शस्त्रपूजन हे या सणाचं ठळक वैशिष्ट्यं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अरुणाचल प्रदेशात भारत चीन सीमेवर जाऊन शस्त्रपूजन करून सैनिकांसोबत विजयादशमीचा सण साजरा केला.

राज्यभरातही दसरा अत्यंत उत्साहात साजरा झाला. घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पाटी पूजन, ग्रंथपूजन आणि आयुधांचं पूजन करून एकमेकांना सोनं अर्थात आपट्याची पानं देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. दसऱ्यानिमित्त वाहनं, आभुषणं, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमधून गर्दी केल्याचं दिसून आलं.

कोल्हापूर इथं दसरा चौकात ऐतिहासिक विजयादशमीचा सोहळा दिमाखात साजरा झाला. हत्ती, उंट, घोडे, चित्ररथ, शिवकालीन युद्धकला, आदीचा सहभाग असलेल्या मिरवणुकीने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.

तुळजापूर इथं काल सकाळी श्री तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात पार पडला. देवीच्या पाच दिवसांच्या श्रमनिेद्रेला कालपासून प्रारंभ झाला.

माहूर गडावर परशुरामांच्या पालखी मिरवणुकीने सीमोल्लंघन करून रेणुकादेवीच्या उत्सवाची सांगता झाली.

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा सीमोल्लंघन सोहळा काल पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. पालखी मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी आई राजा उदोचा जयघोष करत पालखीवर पुष्पवृष्टी केली.

नांदेडला शीख बांधवांचा हल्ला बोल काल उत्साहात साजरा झाला. सचखंड गुरुद्वारात अरदासनंतर नगरकीर्तनला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतिकात्मक हल्लाबोल सुरू झाला. यात हजारो शिख बांधव सहभागी झाले होते. या कार्यक्रमातल्या शस्त्र चालवण्याच्या प्रात्यक्षिकांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.

****

कोणावरही अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत आझाद मैदानावर झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून आपण ही शपथ घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

Byte...

कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार, म्हणजे देणार. पण आपल्याला मी सांगतो टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करु नका.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या ग्वाहीनंतरही मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू करण्याचा मुद्यावर कायम असल्याचं सांगितलं आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील काल मुंबईत शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला. मराठी माणसाला, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार नको, सगळयांना बरोबर घेऊन जाणारं सरकार असायला हवं, असं ते यावेळी म्हणाले. घराणेशाहीचं समर्थन करत ठाकरे यांनी आरक्षण, मराठा आंदोलकांवर लाठीमार तसंच पक्षफुटीच्या मुद्यावरून भाजपवर टीका केली.

****

भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या सावरगाव इथं काल दसरा मेळावा घेतला. दुसऱ्या पक्षात जाण्याइतकी आपली निष्ठा कमकुवत नसल्याचं, पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केलं. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे, या प्रश्नांबाबत अपेक्षाभंग सहन करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी यावेळी दिला.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव काल नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिस्तबद्ध पथसंचलनानंतर बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

****

६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम काल नागपूर मधल्या दीक्षाभूमीवर श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. यावेळी राज्य शासनाने २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कामांची सुरुवात केली. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून, सर्व कामं जागतिक मानांकनाची आणि गतीने करण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितलं.

****

छत्रपती संभाजी नगर इथल्या बुद्ध लेणीत झालेल्या कार्यक्रमात भदंत विशुद्धानंद बोधी यांनी उपस्थितांना २२ प्रतिज्ञा दिल्या. जपानचे धर्म गुरू इको काचो यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

शिर्डी इथं श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली. देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं या सोहळ्यात सहभागी झाले होते.

****

हिंगोली इथल्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात काल ५१ फूट उंचीच्या रावणाचं दहन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातही पाच ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम झाला. वाळुज परिसरात पत्नीपीडित आश्रमाच्या वतीनं शूर्पणखेच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर येत असून, विविध विकास कामाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मन की बात मध्ये उल्लेख केलेल्या निळवंडे धरणाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. साईबाबा मंदिराचं नवीन दर्शन रांग संकूल, अहमदनगर इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर काकडी इथं ते नागरिकांना संबोधित करणार आहेत.

****

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी काल सक्रीय राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. आपल्याला आता राजकारणात काही रस राहिला नसल्याचं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत काल भारतानं सतरा पदकं जिंकली.

पुरुषांच्या थाळीफेक मध्ये नीरज यादवने, महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दीप्ति जीवनजीनं, तर महिलांच्या पॅरा कॅनोइंग केएल २ प्रकारात प्राची यादवनं सुवर्ण पदक पटकावलं.

थाळीफेक मध्ये योगेश काठुनिया, पंधराशे मीटर टी - 46 स्पर्धेत प्रमोद बिजारीनानं, पुरुषांच्या एफ - 40 गोळाफेक मध्ये रवि रंगोलीनं, दहा मीटर एयर पिस्टल एस एच वन प्रकारात रुद्रांश खंडेलवालनं, ४०० मीटर टी - 64 धावण्याच्या स्पर्धेत अजय कुमारनं, तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सीमरननं रौप्य पदक जिंकलं.

थाळीफेक मध्ये मुथूराजानं, महिलांच्या दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात रुबिना फ्रांसिसनं, पंधराशे मीटर टी - 46 स्पर्धेत राकेश भैरानं, दहा मीटर एयर पिस्टल एस एच वन प्रकारात मनिष नरवालनं, क्लब थ्रो च्या एफ - 23 प्रकारात एकता भयाननं, तर केनोइंग मध्ये गजेंद्र सिंह आणि मनिष कौरव यांनी कांस्य पदकाची कमाई केली.

या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत दहा सुवर्ण, बारा रौप्य आणि तेरा कांस्य पदकांसह एकूण पस्तीस पदकांची कमाई केली आहे. 

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा १४९ धावांनी पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी...