Sunday, 3 December 2023

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र ०३ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०३ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून ताज्या वृत्तानुसार, मध्यप्रदेशात २०१ जागांचे कल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षानं ११६ जागी तर काँग्रेस पक्षानं ८३ जागांवर आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये एकुण १७४ जागांपैकी भाजप ९० तर काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगढमध्ये ९० पैकी भाजप ३३ तर काँग्रेस ५७ जागांवर पुढं आहे. तेलंगणामध्ये ११८ जागांपैकी भारत राष्ट्र समिती ३७, काँग्रेस ६८ तर भाजपनं आठ जागांवर आघाडी घेतली आहे.

****

राज्यातील काही भागात दुष्काळ, पाणी टंचाई आहे. तर काही भागात अतिवृष्टीनं पिकाचं, फळबागाचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं त्वरीत शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यात केली. राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

****

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्र अभिवादन केलं आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या बुद्धिमत्ता आणि कुशल नेतृत्वानं देशाचा गौरव केला, लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मतेचे खंबीर समर्थक म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत राहतील, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुका कृषी अधिकारी संतोष हुरगट याला वीस हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल सापळा रचून पकडलं. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या सामूहिक शेततळ्याचं अंदाजपत्रक आणि अनुदान, मंजुरीला पाठवण्यासाठी हुरगट यानं ही लाच मागितली होती.

****

हिंगोली इथं काल गर्भवती महिला आहार विषयक शिबीर घेण्यात आलं. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि गायत्री शक्तीपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात गर्भवतींची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.

****

राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असली तरी राज्यातील सर्वात कमी तापमान काल महाबळेश्वरमध्ये नोंदवलं गेलं. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...