Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 03 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
चार राज्यांच्या विधानसभा
निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ झाला. त्यानंतर
निकालांचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. ताज्या वृत्तानुसार, मध्यप्रदेशात २३० जागांचे कल हाती आले
आहेत. भारतीय जनता पक्षानं १५७ जागी तर काँग्रेस पक्षानं
६९ जागांवर आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये एकुण १९९ जागांचे कल हाती आले असून भाजप १११ तर काँग्रेस ६८ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगढमध्ये
९० पैकी भाजप ५१
तर काँग्रेस ३७ जागांवर पुढे आहे. तेलंगणामध्ये ११९ जागांपैकी भारत राष्ट्र समिती ३८, काँग्रेस ६९ जागी, भाजपनं आठ जागी तर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन - एमआयएमनं ३
जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, निवडणूक
आयोगानं मिझोरम विधानसभेच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात त्या राज्यातल्या विविध
गटांकडून आलेल्या विनंतीनुसार बदल केल्यानं तिथं आज ऐवजी उद्या मतमोजणी होणार आहे.
****
मराठी विज्ञान परिषदेचं, अठ्ठावनावं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नवी मुंबईत,
वाशी इथं येत्या ९ ते ११ डिसेंबर कालावधीत होणार आहे. डॉक्टर सोमक
रॉय चौधरी आणि डॉक्टर राजेंद्र बडवे यांना या अधिवेशनादरम्यान जीवनगौरव
पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. तसंच नेरूळच्या मृणालिनी साठे आणि
मुंबईतल्या अध्ययन संस्थेला विज्ञान प्रसारक म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.
उद्योग आणि पर्यावरण तसंच घनकचरा व्यवस्थापन हे या अधिवेशनाचे दोन मुख्य घटक असणार
असून त्यावर परिसंवाद होणार आहेत.
****
राज्य पायाभूत
शैक्षणिक आराखड्यांतर्गत प्राथमिक वर्गांतील विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार न येता त्यांना
आवश्यक ज्ञान देण्याबाबत सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा
अंगीकार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.
मुंबई इथं
राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा विषयक राज्य सुकाणू समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी
हे निर्देश दिले. बालमनाचा अभ्यास करुन, बालरोग- बाल मानसोपचार डॉक्टर, आंतरराष्ट्रीय
शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञांची मदत घेवून मुलांवर अभ्यासाचं दडपण येणार नाही, ही काळजी घेत
मुलांना आनंद मिळावा, असा बोली भाषा आणि मराठीची सांगड घालून अभ्यासक्रम निर्मिती
करण्याचं केसरकरांनी यावेळी सूचित केलं.
****
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी १५ डिसेंबरपासून लातूर-नांदेड
या महामार्गावरील शिरुर ताजबंद इथं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जय मल्हार
संघटनेचे नेते लहूजी शेळके यांनी दिला आहे. लातूर इथं काल झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
लातूर पोलिस दलाच्या वतीनं एक धाव
व्यसनमुक्तीसाठी या अंमली
पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत आज सकाळी
झालेल्या मॅरेथॉन दौडमध्ये लातूरसह मराठवाड्यातल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. १० किलोमीटर पुरुष गटात छगन
बोंबले यांनी तर महिला गटात
अश्विनी जाधव यांनी पहिलं स्थान पटकावलं. पाच किलोमीटर पुरुष गटात
विष्णू लबाडे यांनी तर महिला गटात
निकिता म्हात्रे यांनी प्रथम स्थान मिळवलं, तसंच तीन किलोमीटर पुरुष गटात अक्षय पवार आणि महिला गटात प्राणवी येलाले यांनी प्रथम स्थान पटकावलं. या विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख दहा हजार रुपयांचं पारितोषिक जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय
मुंडे यांच्या हस्ते देण्यात आलं.
****
आज आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिन
आहे. शाश्वत विकासाची उद्दीष्टं साध्य करण्यासाठी दिव्यांगजनांच्या साथीनं संयुक्त
कृती असा यावर्षीच्या या दिनाचा मुख्य विषय आहे. या दिनानिमित्त
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दिव्यांगांच्या
सक्षमीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण होणार आहे. दरवर्षी
आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचं औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान
केले जातात.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात
हरंगुळ इथं संवेदना या पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं काल क्रीडा
मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत उद्घघाटन झालं. तर छत्रपती संभाजीनगर
महापालिकेतर्फे सहा ते अठरा वयोगटातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
घेण्यात आल्या.
****
राज्यात सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी अडथळा विरहित व्यवस्था
उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन संघटनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलं
आहे.
****
दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत धावणाऱ्या सहा रेल्वेगाड्या तात्पुरत्या
स्वरुपात रद्द करण्यात आल्या आहेत. सिकंदराबादसह विजयवाडा विभागातील रेल्वे लाईन
ब्लॉकमुळं या गाड्या रद्द झाल्या आहेत. यामध्ये तिरुपती -अदिलाबाद ही दैनिक रेल्वे
पाच ते १९ डिसेंबर दरम्यान, तर आदिलाबाद- तिरुपती चार
डिसेंबरसह सहा ते वीस डिसेंबर दरम्यान यासह तिरुपती -पूर्णा साप्ताहिक रेल्वे १२ आणि १९ डिसेंबरला तर
पूर्णा- तिरुपती रेल्वे ११ आणि १८ डिसेंबरला तसंच तिरुपती-साईनगर साप्ताहिक रेल्वे
१० आणि १७ डिसेंबरला तर साईनगर- तिरुपती रेल्वे ११ आणि १८ डिसेंबर रोजी रद्द असणार
आहे.
****
No comments:
Post a Comment