Wednesday, 3 January 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.01.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 03 January 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी राज्यभरात विविध कार्यक्रमांतून अभिवादन

·      मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह सर्वत्र सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अर्पण

·      उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाची छत्रपती संभाजीनगर इथल्या १४ जणांना नोटीस

आणि

·      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार, देगलूरच्या रुग्ण सेवा मंडळाला जाहीर

****

थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती आज राज्यभरात महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात नायगाव इथल्या स्मारकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी शासन दहा एकर जागा खरेदी करेल आणि त्यावर शंभर कोटी रुपये निधी खर्चून भव्य स्मारक उभारण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. सावित्रीबाईंनी स्री शिक्षणाची क्रांती केली, समाजाला जगण्याची दिशा दिली, अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे निर्णय त्यांनी घेतले, त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्याने सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते. नागरिकांनी या ठिकाणी वर्षभर येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. सावित्रीबाई फुले यांचे कर्तॄत्व, त्याग, योगदान यांची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी इथल्या नवीन सभागृहाचं लोकार्पणही शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वहिली आहे. सावित्रीबाईंचं देशाप्रती योगदान अमूल्य असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा भागात असलेल्या सावित्रीबाई आणि जोतिराव फुले यांच्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटना तसंच सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं महात्मा फुले चौकातल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केलं. नांदेड जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

परभणी इथं जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शाळा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, तसंच या कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी आणि अंतरिक्ष सहलीत सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असल्याचं शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितलं.

बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. यानिमित्त शहरातल्या विविध शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

****

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांतील केंद्र शासनाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. ही रक्कम जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, तसंच इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयात सात दिवसांच्या आत जमा करण्याची सूचना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केली आहे.

****

ओबीसी समाजाच्यावतीनं येत्या ६ तारखेला पंढरपूर तर १३ तारखेला बीड इथं मेळावा घेण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी, तसंच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी हे मेळावे घेण्यात येणार आहेत.

****

कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये अकरा टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा एक डिसेंबर अखेर ४८ पूर्णांक ६५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी हे प्रमाण ५४ पूर्णांक ६४ लाख हेक्टर इतके होते.

****

उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथक-एटीएसनं छत्रपती संभाजीनगर इथल्या १४ जणांना १५ ते १८ जानेवारीदरम्यान लखनऊ इथल्या मुख्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. २२ जानेवारीला अयोध्येला होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहिम चालवण्यासंदर्भात पथकानं ही नोटीस बजावली केली. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीचे तांत्रिक पुरावे मिळताच याबाबत ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधारावर उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने छत्रपती संभाजीनगर तपास केला, आणि संबंधित बैठकीला हजर असलेल्या १४ जणांना नोटीस बजावली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं दिला जाणारा २०२४ यावर्षीचा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार, नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरच्या रुग्ण सेवा मंडळ या संस्थेला जाहीर झाला आहे. गेल्या ४६ वर्षांपासून गरीब रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य ही संस्था करत आहे. पंधरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी देगलूर इथं हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या पुरस्काराचं हे १६ वं वर्ष आहे. मराठवाड्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.

****

विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात बायजीपुरा आणि संजयनगर इथं पोहोचली. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी याठिकाणी आयोजित कार्यक्रमाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या बाळू कदम या तृतीयपंथीय व्यक्तीला विकसित भारत संकल्प यात्रेत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे व्यवसायासाठी कर्जाचा लाभ झाला आहे. कर्जाची रक्कम वेळेवर उपलब्ध झाल्यामुळे बाळू कदम यांनी केंद्र सरकारचे आभार आहे. परभणीच्या शिल्पा पोवळे आणि राजेश गमे यांनी आपले अनुभव व्यक्त केले.

बाईट - शिल्पा पोवळे, राजेश गमे जि.परभणी आणि बाळू कदम, जि.धाराशिव

****

नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात सुभाषनगर इथं दहशतवाद विरोधी पथकानं एक लाख बत्तीस हजार रुपयांचा गांजासह ८० हजार शंभर रुपये इतकी रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी शेख ईसा शेख अमीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक बेद्रे यांनी दिली.

****

भारत आणि दक्षिण अफ्रिकादरम्यान केपटाऊन इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात यजमान संघाचा पहिला डाव अवघ्या ५५ धावांत संपुष्टात आला. दक्षिण अफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे यजमान संघाचे फलंदाज धावपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत. सिराजनं सहा तर जसप्रित बुमराह आणि मुकेश कुमारनं प्रत्येकी दोन बळी घेतले. भारताच्या पहिल्या डावाची सुरवातही अडखळत झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल शुन्यावर बाद झाला. रोहित शर्मा ३९, शुभमन गिल ३६ धावा काढून तंबूत परतले. श्रेयस अय्यरही शुन्यावर बाद झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...