आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचीत्त्याने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज ‘आपलं संविधान, आपला सम्मान’ या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांप्रती सामूहिक बांधिलकीची पुष्टी करणं आणि राष्ट्राला बांधून ठेवणारी समान मुल्यांची जपणूक करणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
येत्या पाच वर्षांत भारतीय गुन्हे न्याय यंत्रणा ही जगातली अत्याधुनिक प्रणाली बनेल असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधल्या गांधीनगर इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात, उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. सात वर्षांहून अधिक जुन्या गुन्ह्यांच्या तपासासाठी न्यायवैद्यक तज्ज्ञांनाही सहभागी करणं बंधनकारक केल्याचं शहा यांनी सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात नगर- कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाट्यावर आज पहाटे एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोघे जण पारनेर तालुक्यातले, तीन जण संगमनेर तालुक्यातले तर एक पाथर्डी तालुक्यातला आहे.
****
बालविवाह या कुप्रथेच्या प्रतिबंधासाठी कायदेशीर कारवाईचा इशारा बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिला आहे. त्या काल बीड इथं बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या.
****
बीड शहरातल्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे भूगोल दिन साजरा करण्यात आला. या निमित्त इस्रो दुरस्त अध्ययन केंद्र प्रमाणपत्र वितरण, वसुंधरा मंडळाचे उद्घाटन आणि पर्यावरण भित्तिपत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं.
****
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पदक तालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. महाराष्ट्राच्या संघानं आतापर्यंत १४ सुवर्ण १५ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह एकूण ४५ पदकं मिळवली आहेत.
****
ओमानमध्ये मस्कत इथं सुरु असलेल्या एफ आय एच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज पोलंडशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment