Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला १७ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातल्या १०२ जागांसाठी मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय तामिळनाडुमधल्या ३९, राजस्थान १२, उत्तर प्रदेश आठ, मध्य प्रदेश सहा, उत्तराखंड आणि आसाममधल्या प्रत्येकी पाच, बिहार चार, पश्चिम बंगाल तीन, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय मध्ये प्रत्येकी दोन, तर छत्तीसगढ, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार, जम्मू काश्मीर, लक्षद्विप आणि पुदुच्चेरी इथल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. उमेदवारांना येत्या २७ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येतील.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते जाहीर सभा आणि रोड शो च्या माध्यमातून प्रचार कताना दिसत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमधल्या पलक्कड इथं रोड शो मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी तामिळनाडुमध्ये त्यांची जाहीर सभा होईल.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याला अंतिम रुप देण्यासाठी काँग्रेस कार्यसमितीची नवी दिल्लीत बैठक सुरु आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत.
कार्यसमितीच्या बैठकीनंतर खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची देखील बैठक होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उर्वरित उमेदवारांची नावं निश्चित केली जातील. काँग्रेसनं आतापर्यंत दोन वेगवेगळ्या याद्यांमधून एकूण ८२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
****
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गाधी यांच्या मुंबईतल्या सभेमुळे राज्य सरकार घाबरलं आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या सभेदरम्यान राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन दिलेल्या २५ हमी पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे असं देखील ते म्हणाले.
****
मतदानाची कमी होणारी टक्केवारी ही चिंतेची बाब असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आगामी निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. जिल्ह्यातली निवडणूक व्यवस्था, मतदान केंद्रांवरच्या सुविधा, आदर्श आचारसंहितेचं पालन, यासह विविध मुद्यांबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी घेतलेली ही मुलाखत उद्या बुधवारी सकाळी साडेदहा वाजता आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. एआयआर छत्रपती संभाजीनगर या ट्यूब चॅनलवरही श्रोत्यांना ही मुलाखत ऐकता येईल.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ११ हजार दोन स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. कृषी विद्यापीठाने संशोधनाच्या आधारे हवामान बदलास अनुरूप पीक पद्धती विकसित करावी, असं सांगतानाच राज्यपालांनी, कृषी पदवीधरांनी कृषि विकासात आपलं योगदान देण्याचा सल्ला दिला.
****
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातल्या रेपनपल्ली नजीकच्या कोलामार्का जंगलात आज पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. वर्गिस, मगटू, कुरसंग राजू आणि कुडीमेट्टा व्यंकटेश अशी मृत नक्षल्यांची नावं असून, चारही जण तेलंगणा राज्यातले आहेत. वर्गीस हा नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सचिव, तर मगटू हा क्षेत्र सचिव पदावर कार्यरत होता. त्यांच्यावर एकूण ३६ लाखांचं बक्षीस होतं. काल रात्री नक्षल्यांच्या तेलंगणा समितीचे काही सदस्य अहेरी तालुक्यात दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सी-60 पथकाचे जवान पाठवून नक्षलविरोधी अभियान राबवलं.आज पहाटे नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली.पोलिसांनी घटनास्थळाहून एक एके 47, एक कार्बाइन आणि दोन देशी बनावटीचे पिस्तूल, तसंच इतर साहित्य ताब्यात घेण्यात आलं. घटनास्थळ परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं.
****
स्वित्जर्लंडमध्ये आजपासून स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धा सुरु होत आहे. पुरुष एकेरीत भारताचा लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या लिओंग जून सोबत होणार आहे. किदांबी श्रीकांत, पी व्ही सिंधू, महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रिस्टो तसंच ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांचे सामने होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment