Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक सार्वजनिक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे भारतीय स्टेट बॅंकेला निर्देश
· राजकीय पक्षांनी निवडणूक नियमांचं काटेकोर पालन करावं-राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचं आवाहन
· शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर
· औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमची खासदार इम्तियाज जलिल यांना पुन्हा उमेदवारी
आणि
· ६२ व्या राज्यनाट्य स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या "नास्ति तृष्णा समो व्याधि:" या नाटकाला द्वितीय पारितोषिक
सविस्तर बातम्या
प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक सार्वजनिक करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं, भारतीय स्टेट बॅंकेला दिले आहेत. मात्र एप्रिल २०१९ आधीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली. रोखे खरेदी करणारा आणि हे रोखे वटवणारा राजकीय पक्ष यांची माहिती उघड होईल, असा रोख्यांचा क्रमांकही जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले असून, गुरुवारपर्यंत बॅंकेला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं आहे. ही सर्व माहिती निवडणूक आयोगानं संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचनाही न्यायालयानं केली आहे.
****
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश तसंच उत्तराखंड या सहा राज्यांचे गृह सचिव, मिझोराम आणि हिमाचल प्रदेशाचे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल तसंच अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांचा समावेश आहे. या सर्व बदल्यांची माहिती आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कळवण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांची बदली करण्याचे आदेशही निवडणूक आयोगानं दिले होते, त्यानुसार कार्यवाही करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राजकीय पक्षांनी निवडणूक नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. काल मुंबईत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. १८व्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या मतदानाचं वेळापत्रक, निवडणुकीसाठी विविध पातळ्यांवरची सज्जता, यासोबतच निवडणूक प्रक्रिया, नामांकन प्रक्रिया, खर्च या विषयीचे नियम आणि तरतुदींविषयी सविस्तर माहिती त्यांनी राजकीय प्रतिनिधींना दिली. निवडणूक यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्याचं आश्वासनही चोक्कलिंगम यांनी यावेळी सर्व पक्षांना दिलं.
****
मतदानाची कमी होणारी टक्केवारी ही चिंतेची बाब असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आगामी निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले...
मागच्या काही निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी जर आपण पाहिली तर ही टक्केवारी घसरत चालली आहे. आणि हा सर्वांसाठी एक चिंतेचा विषय आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये समावेश असलेल्या दोन्ही मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त व्हावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. माझं सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन आहे की मतदान करा.
जिल्ह्यातली निवडणूक व्यवस्था, मतदान केंद्रांवरच्या सुविधा, आदर्श आचारसंहितेचं पालन, यासह विविध मुद्यांबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी घेतलेली ही मुलाखत उद्या बुधवारी सकाळी साडेदहा वाजता आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. एआयआर छत्रपती संभाजीनगर या ट्यूब चॅनलवरही श्रोत्यांना ही मुलाखत ऐकता येईल.
****
आदर्श आचारसंहितेचा भंग प्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करण्याची सूचना, परभणीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे. काल परभणी इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व मतदान केंद्रं सुस्थितीत आणि आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांनी युक्त असल्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घ्यावी, सर्व यंत्रणांनी समन्वय राखून जबाबदारीने काम करावं, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
****
राज्यात बालकांच्या पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ९० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. राज्यात नियमित लसीकरणांतर्गत वर्षभरात १९ लाख चार हजार बालकांचं लसीकरण करण्याच्या उद्दिष्टांपैकी १७ लाख नऊ हजार बालकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं.
****
डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, या आजाराशी लढा देण्यासाठी सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव एल एस चांगसान यांनी व्यक्त केली आहे. त्या काल नवी दिल्लीत डेंग्यू परिषदेत बोलत होत्या. डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य आणि नगरनियोजन विभागातल्या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
उत्तर प्रदेशात वाराणसी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या एका कारखान्यावर ठाणे पोलिसांनी छापा मारून दोन जणांना अटक केली, तर २५ किलो एमडी पावडर सह सुमारे २८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ठाण्याच्या कासारवडवली भागात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत ठाणे पोलिसांनी चौघांना अटक केली होती, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलासोबत संयुक्तपणे ही कारवाई केली.
****
महायुतीचं जागावाटप सन्मानजनक पद्धतीनं आणि समन्वयानं करुन लवकरच ते जाहीर होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या परवा मुंबईत झालेल्या सभेत उपस्थित नेत्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसत होता, अशी टीका मुख्यमंत्रीयांनी केली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काल नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर आले. काल दुपारी नांदेड विमानतळावर माजी आमदार अनसुया खेडकर, युवा सेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं कुटुंब संवाद दौऱ्यामध्ये सभेला संबोधित केलं. आम्ही सत्तेचे लोभी नसून, जनतेची सेवा करणारे सेवक असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरून भाजपवर कडाडून टीका केली. त्यानंतर त्यांनी हिंगोली इथं देखील जनसभेला संबोधित केलं.
दरम्यान, ठाकरे यांचा आज सकाळी साडेअकरा वाजता उमरखेड इथं आणि दुपारी एक वाजता हदगाव इथं पदाधिकाऱ्यांसोबत संवाद मेळावा होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगचे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल हे पुन्हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादूल मुसलमिन - एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काल हैदराबाद इथं ही घोषणा केली. ओवेसी यांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून स्वत:च्या नावाची, तर बिहारमधल्या किशनगंजमधून अख्तरुल इमाम यांच्या नावाची घोषणा केली.
****
महायुतीत घटक पक्ष म्हणून शिर्डी आणि सोलापूर या लोकसभा मतदार संघाच्या जागेची मागणी आरपीआयनं केली असल्याचं, केंद्रीय राज्यमंत्री तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ६२ व्या राज्यनाट्य स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या, "नास्ति तृष्णा समो व्याधि:", या नाटकाला राज्यातून सांघिक द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेनं एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्याने सादर केलेल्या या नाटकाचं लेखन, अमेय दक्षिणदास यांनी, तर दिग्दर्शन डॉ. सुरेखा मसाळ यांनी केलं आहे. नाटकातल्या अभिनयासाठी श्रुती कुलकर्णी यांना रौप्य पदक मिळालं असून, पार्श्वसंगीत, नेपथ्य, दिग्दर्शन या श्रेणीतही या नाटकानं पुरस्कार पटकावले आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या उमरी आणि अर्धापूर तालुक्यातल्या एकूण १७ गावातल्या काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खासदार अशोक चव्हाण यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं.
****
लातूर शहरात कोयता घेऊन खंडणी उकळणाऱ्याची पोलिसांनी भर बाजारात धिंड काढली. तोहीद अकबर पठाण असं या २१ वर्षीय आरोपीचं नाव असून, त्याने आपल्या साथीदारासह खंडणी उकळून, वाहनाची तोडफोड करुन ज्या भागात दहशत निर्माण केली होती, त्याच भागात पोलिसांनी त्याची धिंड काढली.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं, जलजागृती सप्ताहाअंतर्गत पाणी प्रश्नावर आधारित भित्तीचित्र प्रदर्शनाचं काल महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ यशवंतराव डोके यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भविष्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वृक्षारोपण वाढवण्यावी गरज डोके यांनी यावेळी व्यक्त केली.
****
काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड यांचं काल हैदराबाद इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर रेणापूर इथल्या मागासवर्गीय सेवा संघ संस्थेच्या आश्रमशाळेच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment