Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 12 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १२ जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १०० टक्के मतदान-पहिल्या
पसंतीच्या मतांची मोजणी सुरू
·
शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच
पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार
·
छत्रपती संभाजीनगर इथले हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, इतिहास
तज्ज्ञ रफत कुरेशी यांचं निधन
आणि
·
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या आरक्षण शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर
शहरातल्या शाळांना सुटी
****
विधान
परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत १०० टक्के मतदान झालं. सर्व २७४ आमदारांनी
गुप्त मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजेनंतर मतमोजणीला प्रारंभ
झाल्याचं वृत्त आहे. विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मत मिळवणं आवश्यक
आहे.
****
राज्यातल्या
शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती
वाढवण्यात येणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांची
बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी
सांगितलं आहे. ते आज विधान परिषदेत सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या
उत्तरात बोलत होते. तांबे यांनी, कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीवर
बंदी आणण्याबाबतचा प्रश्न विचारला, यासंदर्भातल्या पदार्थांचे एकूण ३६ नमुने विश्लेषणासाठी
घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात
येईल, असं आत्राम यांनी सांगितलं.
****
विकास
प्रकल्पांसाठीच्या भूसंपादन प्रक्रिया कायद्यातील सुधारणा अथवा अंमलबजावणीबाबत सुलभता
आणण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात बोलत होते.
सदस्य प्रकाश सोळंके यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यासंदर्भात नवीन प्रारूपावर
मागवण्यात आलेल्या हरकतींबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन महिनाभरात याबाबत निर्णय घेण्यात
येईल, असंही विखे पाटील यांनी सांगितलं.
****
इतर मागास
प्रवर्गातील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १५ लाख रूपये करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव
पाठवण्यात आला आहे. बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या
उत्तरात ही माहिती दिली. यासंदर्भात एक महिन्याच्या आत नवी दिल्ली इथं संबंधित विभागासोबत
चर्चा करून ही मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, वार्षिक
उत्पन्न मर्यादा ठरवताना त्यामध्ये शेतीमधून मिळणारं उत्पन्न ग्राह्य न धरण्यासाठी
केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, असं सावे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, अंतिम
आठवडा प्रस्ताव आज सादर झाला, विधान परिषदेत यावर बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी, जनतेच्या पैशाचा अपव्यय करून राज्याला अधोगतीला नेण्याचं काम सरकार करत असल्याची
टीका केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देणारं सरकार, महिला
सुरक्षेत मात्र अपयशी ठरल्याचं दानवे म्हणाले. भाजपाचे प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभागी
होत, सरकार राबवत असलेल्या जनतेच्या हिताच्या योजना अधिक गतीनं पुढे नेल्या जातील असा
विश्वास व्यक्त केला. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या उत्तर देत
आहेत.
****
घरा घरात
पाणी, घरा घरात शौचालय, आणि शौचापासून मुक्तीचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र
शासन कटिबध्द असल्याचं, राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री, गुलाबराव
पाटील यांनी म्हटलं आहे. आज दिल्लीत, केंद्र सरकारच्या जलजीवन
मिशन तसंच स्वच्छ भारत मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या
अंमलबजावणी साठी केंद्र शासनाकडून आर्थिक निधी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात
जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रगतीबद्दल केंद्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात
आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
२५ जून
हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची
अधिसूचना आज गृह मंत्रालयाने जारी केली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन केंद्र सरकारने
देशात आणिबाणी लागू केल्याची घोषणा केली होती. आणिबाणीच्या विरोधात लढा दिलेल्या आणि
अत्याचार सहन केलेल्या नागरिकांच्या योगदानाचं हा दिवस स्मरण करून देईल, असं केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ
इतिहास तज्ज्ञ रफत कुरेशी यांचं आज कॅनडात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे
होते. मुल्के खुदा तंगनिस्त, तजकरे उजालों के ही त्यांची उर्दू पुस्तकं प्रकाशित आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त पर्यटन विभागप्रमुख डॉ. दुलारी
कुरेशी यांचे ते पती होत. डॉ. दुलारी यांच्यासह त्यांनी औरंगाबादनामा या मराठी आणि
द ग्लोरियस औरंगाबाद या इंग्रजी पुस्तकांचं सहलेखन केलं. महानगरपालिकेच्या हेरिटेज
कमिटीला अनेक ऐतिहासिक वास्तू प्रत्यक्ष दाखवून त्या संरक्षित वास्तूंच्या यादीत समाविष्ट
करवून घेण्यात रफत कुरेशी यांचा सिंहाचा वाटा होता. कुरेशी यांच्या निधनानं समाजाच्या
विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
****
मराठा
आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज जालना शहरातून मराठा
आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी
झाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही रॅली जाहीर सभेत विसर्जित झाली.
दरम्यान, उद्या
छत्रपती संभाजीनगर इथं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात
आलं आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही
रॅली काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फक्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्व
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी याबाबतचे पत्रक जारी केलं आहे.
****
१५ वर्षांच्या
आतील सर्व वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब
शुल्क आकारण्यास स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
ही माहिती दिली. विविध वाहन चालक संघटनांनी ही मागणी केली होती.
****
जालना
जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात आज सकाळी झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.
छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे येत असलेल्या भरधाव ट्रकने पुढे जात असलेल्या दुचाकीला
जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले, तर एक
जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला असून पुढील तपास सुरू असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अवयव दानाबद्दल
जनजागृती होण्याची गरज छत्रपती संभाजीनगर इथले डॉ अजित भागवत यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात नांदेड इथं मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या अवयव दानातून छत्रपती संभाजीनगर
इथं, खासगी रुग्णालयात एकाच दिवशी हृदय आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या
पार पडल्या, त्या पार्श्वभूमीवर डॉ भागवत बोलत होते. अवयव प्रत्यारोपण केलेल्या या दोन्ही रुग्णांना
आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी उद्या आणि परवा शिबिरांचं
आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिल्या आहेत. ते आज याबाबत
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत बोलत होते. या शिबिरात लाभार्थी महिलांचे
अर्ज भरून घेण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, नगर परिषद
क्षेत्रीय वार्ड अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना पाठक यांनी दिल्या.
****
महसूल
कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता मंजूर करावा यासह विविध प्रलंबित
मागण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले, संघटनेचे
जिल्हाध्यक्ष गिरीश येवते यांनी याबाबत बोलतांना, संघटनेच्या
मागण्यांवर तोडगा न निघाल्यास सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिंगोली
जिल्ह्यात कळमनुरी, सेनगाव, औंढा, वसमत तहसील
कार्यालयातले कर्मचारीही या आंदोलन सहभागी झाल्याची माहिती राज्य कर्मचारी संघटनेचे
जिल्हाध्यक्ष दिलीप कदम, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष इम्रान पठाण यांनी दिली.
****
संत तुकाराम
महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज इथं पोहोचली. जिल्हाधिकारी कुमार
आशीर्वाद यांनी पालखीचं स्वागत केलं. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व
पूजन केल्यानंतर भक्तीमय वातावरणात रिंगण सोहळा पार पडला.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं उद्या गजल संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. साहित्य क्षेत्रात
कार्यरत विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमानं उद्या सायंकाळी जीवन विकास
ग्रंथालयात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गजल गायक भीमराव
पांचाळे यांच्याशी रसिकांना थेट संवाद साधता येणार आहे.
****
No comments:
Post a Comment