Thursday, 25 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      संसदेत अर्थसंकल्पीय चर्चेला प्रारंभ-भेदभावाचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग तर सरकारकडून आरोपांचं खंडन

·      महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद

·      शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

·      मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित तर वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्रा

आणि

·      पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंच्या मोहिमेला आजपासून सुरुवात

सविस्तर बातम्या

संसदेत कालपासून अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. अर्थसंकल्पात निधी वाटप करताना भेदभाव केल्याचा आरोप, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला. काल राज्यसभेत यावरच्या चर्चेत बोलतांना सीतारामन यांनी, अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं, पण नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही, असा अर्थ होत नाही, असं नमूद केलं. लेखानुदान तसंच अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

तत्पूर्वी सदनाच्या कामकाजाला प्रारंभ होण्याआधी, विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांवर अर्थसंकल्पात अन्याय झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनात केली. या आक्षेपांवर मंत्र्यांनी उत्तर दिल्यावरही, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रश्नावर आपण संसदेच्या बाहेर आणि आतही आंदोलन करणार असल्याचं खरगे यांनी स्पष्ट केलं.

लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सभात्याग केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या खासदार कुमारी सेल्जा, समाजवादी पार्टीचे वीरेंद्र सिंह, द्रविड मुन्नेत्र कळघमचे दयानिधी मारन,  तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनी सहभाग घेत, अर्थसंकल्पावर टीका केली.

भाजपाचे विप्लव कुमार देव यांनी २०१४ मध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर आर्थिक व्यवस्था पारदर्शक झाल्याचं प्रतिपादन केलं.

****

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांसाठी विक्रमी १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात आत्तापर्यंत नवे रेल्वेमार्ग, एकेरी मार्गाचं दुपदरीकरण, त्रिपदरीकरण इत्यादी कामांसाठी, आठ हजार ५८१ कोटी रुपये, तर गतिशक्ती, मल्टिमोडल टर्मिनल, रेल्वेस्थानकं अशा कामांसाठी, एक लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती वैष्णव दिली.

****

असत्य आणि भ्रामक माहितीच्या प्रसारणाला प्रतिबंध करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वसमत इथल्या हळद संशोधन केंद्राबाबत काल आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपये निधी कालच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, तीन वर्षांत हा प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यावेळी दिले.

****

राज्यातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला महायुती सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, एका प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी ही मागणी  केली आहे.

****

येत्या १६ ते २९ ऑगस्ट दरम्यान सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दिला आहे. नाशिक इथं झालेल्या बैठकीनंतर या पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या सध्याच्या जातीय ध्रुवीकरणाच्या वातावरणामध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न मागे पडत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मागच्या पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं त्यांचं उपोषण सुरू होतं.

दरम्यान, जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.

दरम्यान, ‘हैदराबाद गॅझेट’ मधल्या उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी संबंधित पथकाला दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठा - कुणबी प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, सगे-सोयरे बाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्यात यावी, आदी सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन, मराठा आरक्षण आंदोलनाचा राजकीय वापर करणाऱ्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही, यावर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन केलं. आरक्षण देताना मराठा किंवा ओबीसी कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

****

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आजपासून आरक्षण बचाव यात्रेला प्रारंभ होणार आहे. चैत्यभूमीपासून सुरू होणारी ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलडाणा या जिल्ह्यातून मार्गक्रमण करत येत्या ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचेल. या ठिकाणी जाहीर सभेनं या यात्रेची सांगता होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये आजपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी शिबीरं घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. महापालिका आणि नगरपरिषद हद्दीतही नोंदणीची कामं वेगानं करावीत असं त्यांनी सूचित केलं. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाच लाख १३ हजार १३० महिलांची या योजनेसाठी नोंदणी झाली आहे.

****

नांदेड महापालिकेच्या तेवीस मदत केंद्रांमार्फत या योजनेसाठी अर्ज संकलन सुरू आहे. आतापर्यंत सुमारे बारा हजार अर्ज दाखल झाले असून, जास्तीत जास्त महिलांनी अर्ज भरावेत, असं आवाहन नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातही या योजनेच्या प्रचारासाठी पालम, गंगाखेड आणि पूर्णा इथं कार्यशाळा घेण्यात आल्या. पूर्णा तालुक्यात एकूण १३ हजार २९० महिलांचे अर्ज सादर करण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी जीवराज यांनी दिली.

****


पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताचे सामने आजपासून सुरु होत आहेत. तीरंदाजी मध्ये दीपिका कुमारी, अंकिता भगत, भजन कौर, बी धीरज, तरुण दीप रॉय आणि प्रवीण जाधव वैयक्तिक प्रकारात खेळणार आहेत. ऑलिम्पिकचं औपचारिक उद्‌घाटन उद्या होणार आहे.

****

राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री संदिपान भुमरे यांची लोकसभेवर निवड झाल्यानं, हे पद रिक्त झालं होतं.

****

परभणी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत काल इग्नाईट महाराष्ट्र-2024 ची एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा काल परभणी इथं घेण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. अन्य एका बैठकीत जिल्हाधिकारी गावडे यांनी, सरकारच्या विविध महत्त्वकांक्षी योजनांचा आढावा घेतला.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तीन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. नितीन गुंड असं त्याचं नाव आहे, दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ सेनानी, पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ यांना काल जयंतीदिनी छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. सरस्वती  भुवन शिक्षण संस्थेत निवृत्त प्राचार्य शिवशंकर मिश्रा यांनी गोंविदभाईच्या आठवणींना उजाळा दिला.

****

परभणी आणि मानवत तालुक्यातल्या गावांना जायकवाडी जलाशय आणि निम्न दुधना प्रकल्पाचा अजूनही लाभ मिळत नसल्याचं निवेदन, शेतकऱ्यांच्या वतीनं काल परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आलं. येत्या पाच ऑगस्टपर्यंत वंचित गावांतल्या शेतकऱ्यांना पाणी पुरवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर येत्या नऊ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३७६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप पिकांना उपयुक्त असून, जिल्ह्याची पाणी पातळी उंचावण्यास उपयुक्त ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल दिवसभर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातलं भावली धरण शंभर टक्के भरल्यानं त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...