Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या एका स्फोटात आज सकाळी २ जवान किरकोळ जखमी झाले. जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
आजच्या जागतिक सहकार दिनानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सहकारामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर होत असल्यामुळं देशाचा आर्थिक विकासदर वाढण्यास मदत होत असल्याचं अमित शहा यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी सहकार ही एक चळवळ आहे. शेती, उद्योग, पणन, बँकींग या क्षेत्रात सहकारामुळं कष्टकरी वर्गाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रा व्यवस्थित आणि सुरक्षितपणे सुरू आहे. यात्रेच्या काल सातव्या दिवशी २१ हजार ६८६ भाविकांनी श्री अमरनाथ यांच्या पवित्र गुफेत दर्शन घेतलं. गेल्या २९ जूनपासून यात्रा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत १ लाख ५२ हजार ९४६ भाविकांनी पवित्र हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं आज यात्रा काही काळासाठी थांबविण्यात आली आहे.
****
राज्यातल्या १० हजार गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभाग, कृषी तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात काल विधानसभेत दिली. महसूल मंडळ स्तरावरून हवामान केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, राजेश टोपे यांनी भाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रीत सदस्य राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उद्या शहरात होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
****
मुंबई - बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी येत्या १० आणि ११ तारखेला आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली असून ती मुंबई ते अदिलाबाद दरम्यान धावेल तर बल्लारशा -मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११ आणि १२ तारखेला अंशतः रद्द करण्यात आली असून या दिवशी ती आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल.
****
१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारतचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यापाल न्यायमूर्ती पी.सदाशिवम् यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं ही घोषणा केली. नवी दिल्ली इंथ येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या पुरस्कारासाठी समितीनं राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याचं राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि झिम्बॉब्वे दरम्यान सुरु होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी ट्वेंटी सामन्यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असून, शुभमन गिल हा संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएल सामन्यांच्या अनुभवानंतर अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे या खेळाडूंचा झिम्बॉब्वे सोबतच्या या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा १२ धावांनी पराभव केला. चेन्नईतल्या एम ए चिदंबम् मैदानावर काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेनं १८९ धावा केल्या, भारतीय महिला संघ प्रत्युत्तरादाखल निर्धारित २० षटकात ४ बाद १७७ धावाच करु शकला.
****
No comments:
Post a Comment