Thursday, 18 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 18 July 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १८ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ नक्षलवादी ठार, सरकारकडून पोलिसांना ५१ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

·      राज्यात १८ ते ३५ वयोगटातल्या बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप आणि विद्यावेतन देण्याच्या सरकारचा निर्णय

·      पंढरपूर इथं चंद्रभागा बसस्थानक आणि यात्री निवास इमारतीचं लोकार्पण

आणि

·      वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडून चौकशी होणार

 

सविस्तर बातम्या

गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र - छत्तीसगढ सीमेवर वांडोली गावानजीकच्या जंगल परिसरात काल पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी मारले गेले. मृत १२ नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली असून, यात टिपागड दलमच्या विभागीय समितीचे सदस्य लक्ष्मण आत्राम आणि विशाल आत्राम यांचा समावेश आहे. उर्वरित दहा जणांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं. या चकमकीत पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्यासह एक जवान जखमी झाले असून, त्यांना नागपूरला हलवण्यात आलं आहे. काल रात्री आठ वाजता चकमक थांबली असून, घटनास्थळावरुन पोलिसांनी तीन एके- 47, दोन बंदुका, एक कार्बाईन, सात ऑटोमोटिव्ह आदी शस्त्रं जप्त केली. यानंतर या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आलं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, ही गेल्या काही वर्षातली सर्वात मोठी मोहिम असल्याचं सांगून, गडचिरोली पोलिसांना ५१ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ते म्हणाले,

 

Byte…

 

****

पंढरपूर इथं काल राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या सांस्कृतिक भवनासाठी शासनानं पाच कोटी रुपये मंजूर केले असून, आणखी १० कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्रप्रदेशातल्या तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन व्यवस्थेसाठी १०३ कोटी रुपये निधीची घोषणा देखील त्यांनी काल केली.

राज्यातल्या युवकांना, उद्योगांसोबत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप देऊन, रोजगारासाठी सक्षम करणाऱ्या, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा, मुख्यमंत्र्यांनी काल पुनरुच्चार केला. या योजनेत १८ ते ३५ या वयोगटातल्या बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप आणि विद्यावेतन देण्यात येणार आहे. यामध्ये बेरोजगार तरुणांना बारावी नंतर सहा हजार, डिप्लोमा नंतर आठ हजार तर पदवीधर साठी दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे.

दरम्यान, पंढरपूर इथं उभारण्यात आलेल्या चंद्रभागा बसस्थानक आणि यात्री निवास इमारतीचं लोकार्पण काल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं. ११ हेक्टर जागेवर ३४ फलाटांचंचे चंद्रभागा यात्रा बस स्थानक उभारण्यात आलं आहे. यात्री निवासामध्ये ५०० एसटी कर्मचारी तसंच एकाच वेळी सुमारे एक हजार यात्रेकरुंची निवासाची सोय होणार आहे.

****


आषाढी एकादशीचा सोहळा काल मराठवाड्यात भक्तिभावाने साजरा झाला.

संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरातही काल विविध कार्यक्रम पार पडले. शहरातून आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

 

छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून घेत होते.

 

परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातून काल वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते.

 

बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं संत जगमित्र नागा मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तसंच जगमित्र महाराजांच्या समाधी स्थळास फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री क्षेत्र नारायण गडावर देखील लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते.

 

बुलडाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.

****

येत्या विधानसभा निवडणुकीत आपली सगळ्या २८८ जागा लढण्याची तयारी आहे, मात्र आघाडी असल्यामुळे ९० जागांवर दावा करणार असल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख घटकपक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार असून, प्रत्येकी नव्वद जागा लढवून बाकीच्या जागा अन्य मित्रपक्षांसाठी सोडण्याचा विचार आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

****

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची पडताळणी करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल अर्थात अभिरूप मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार विखे यांनी आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची मेमरी रिकामी करून अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

****

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या तक्रारीवरून ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याप्रकरणीही गुन्हा दाखल असून, या प्रकरणी पोलिस या दोघांच्या शोधात आहेत.

****

मुस्लिम धर्मियांचा मोहर्रमचा सण काल भक्तिभावाने पाळण्यात आला. करबलाच्या मैदानात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं काल मुस्लिम बांधवांच्या वतीनं ताजिये तसंच सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिया बांधवांच्या वतीनं मातमी जुलूसही काढण्यात आला. शेकडो नागरिक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. 

****

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं, काल मुंबईहून साताऱ्यात विशेष सुरक्षेत दाखल झाली. ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातल्या सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली असून, ती पुढचे सात महिने सर्वांना पाहता येणार आहेत.

****


राज्‍यातल्या अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावं, असं आवाहन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. काल मुंबईत, दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीत ते बोलत होते. या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केलं, तर राज्‍यातल्या दूध उत्‍पादकांना ३५ रुपये दर देणं शक्‍य होईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. 

****

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळानं धाराशिव इथं बांधून दिलेल्या, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचं, तसंच दोनशे चव्वेचाळीस सदनिकांचं उद्घाटन, आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातुन होणार आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रयत्नांमधून या इमारती प्रत्यक्षात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेडहून हिंगोलीकडे गुटखा घेऊन जाणारा आयशर टेम्पो काल कळमनुरी पोलिसांनी पकडला. या वाहनातून सुमारे बावीस लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.

****

बीड जिल्ह्यात पावसाचा जोर काल तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र तरीही जिल्ह्यातल्या १४३ प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प अजूनही कोरडे असून, काही प्रकल्पांची पातळी जोत्याखाली गेलेली आहे. माजलगाव प्रकल्पातही सध्या उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

****

हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...