Sunday, 4 August 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 August 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.

****

पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नवव्या दिवशी, भारताचे खेळाडू विविध खेळप्रकारांच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये आपलं कसब पणाला लावणार आहेत. गोल्फ प्रकारात शुभंकर शर्माचा सहभाग असलेला खेळ दुपारी साडेबाराला सुरु झाला. हॉकीच्या संघाची उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनसोबत दुपारी दीडला लढत आहे. तर, याचवेळी ॲथलेटीक्सच्या अडथळ्यांच्या धावण्याच्या प्रकारात पारुल चौधरीचा सहभाग आहे. लांब उडी प्रकारात जेस्वीन आल्ड्रीन अडीच वाजता खेळणार आहे. त्यानंतर मुष्टीयुध्द ७५ किलो वजनी गटात लवलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत तीन वाजता खेळेल. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनचा पुरुष एकेरी उपांत्य फेरीचा सामना साडेतीनला आहे. याचवेळी नौकायन प्रकारात पुरुष गटात विष्णु सर्वनन, तर महिला गटात नेत्रा कुमानन संध्याकाळी सहाला खेळणार आहे.

नेमबाजीत २५ मिटर मीटर रैपिड फायर पिस्टल प्रकारात अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धूचा सहभाग असलेला खेळ थोड्या वेळेपूर्वी सुरु झाला आहे

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनसन्मानयात्रेच्या निमित्तानं महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार आहेत. या जनसन्मान यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर इतर आठ जणांचा सहसमन्वयक म्हणून समावेश केला आहे.

****

राज्यस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील राजघाट इंथ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशासाठी शहिद झालेल्या विरांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विजयघाट इंथ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल स्मृतिस्थळावर जात त्यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

****

हैदराबाद मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाड्यातील मुक्ती संग्राम स्मारकाची निर्मिती होत असून, ही निर्मिती परिपूर्ण होण्यासाठी सुधारीत नव्या बाबींचा समावेश आराखड्यात करुन हा सुधारीत प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

मुक्तिसंग्राम स्मारकासंदर्भात पालकमंत्री सत्तार यांच्या समोर काल सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील संतांच्या आभासी प्रतिमा, आठही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे स्तंभ, जिल्ह्यांची ओळख दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचं प्रतिबिंब बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा, कला दालन, अजिंठा-वेरूळ लेण्यातील चित्रे, मराठवाड्याचा इतिहास दर्शवणाऱ्या माहितीपटाचं सादरीकरण स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसाठी होणार आहे.

****

पुण्यानजीक खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग आज सकाळी अकरा वाजेनंतर पावसाचं प्रमाण आणि पाण्याची आवक यानुसार बदलून वाढवण्यात येत आहे. पुण्याच्या सिंचन भवनाद्वारे ही महिती देण्यात आली आहे.

खडकवासलासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सुमारे १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात झाला आहे. तरीही आज अखेरपर्यंत या धरण साखळीत सुमारे ७३ पूर्णांक ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. विसर्ग सुरु असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरु असून, त्या परिसरातील धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. ताम्हिणी घाटासह जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहर परिसरात वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांसह आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.

****

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

****

वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आजपासून येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत याच्या अंमलबजावणीचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात तोंडापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात उद्या कृषी मार्गदर्शन - प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल पंधरवडा निमित्त आयोजित आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी साडे अकरा वाजता होणाऱ्या या शेतीविषयक कार्यक्रमाला शेतकऱ्यांसह नागरीकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

भारत-श्रीलंके दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना थोड्याच वेळेत दुपारी अडीच वाजता कोलंबो इथं सुरु होत आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती...