Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 03 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर आज पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. ४० विविध दलांमार्फत बचावकार्य सुरू आहे. भूस्खलन झालेल्या ठिकाणांहून काल १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले. गेल्या मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला, तर १७ बचाव शिबीरांत अडीच हजारांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. या शिबीरातल्या लोकांना भेटणं तूर्तास टाळावं, असं आवाहन स्थानिक मंत्रीमंडळाच्या उपसमितीनं नागरिकांना केलं आहे.
****
जागतिक खाद्य आणि पोषणाची समस्या सोडवण्यात भारत महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दिल्ली इथं आयोजित ३२ व्या कृषि अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या उद्धघाटनप्रसंगी आज ते बोलत होते. यावेळी ७५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कृषी हे सरकारच्या आर्थिक धोरणाचे केंद्र असल्याचं ते म्हणाले. भारत हा जगात भरडधान्य, दूध, डाळी आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश असून रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण १९९६ नंतर तीन टक्क्यांनी घटलं आणि हा मृत्यूदर २०२३ मध्ये शून्य पूर्णांक १७ टक्के इतका झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव अपुर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे.
देशातील नऊ सर्वाधिक प्रभावित राज्यांत डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य सुविधांचा आढावा चंद्रा यांनी काल घेतला. यावेळी त्यांनी डेंग्यूवर नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्यसरकार आणि नगरपालिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर खोटे आरोप लावले असल्याचं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्या आधारे नागपुरात सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकला, असा आरोप अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान, हे आरोप लावताना देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयानं सचिन वाजे यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नोंदवलेलं निरीक्षण ध्यानात घेतलेलं दिसत नाही. आरोपावर स्पष्टीकरण देण्यासाठी सचिन वाजे सारख्या अपराधिक व्यक्तीची मदत फडणवीस यांना का घ्यावी लागते? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
****
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पात भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकरी तसंच जमीन मालकांना योग्य मोबदला मिळेल, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भुसंपादन आणि इतर मुद्यांवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेत प्रश्न उपस्थित केला, या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी बोलत होते. पर्यावरणीयदृष्ट्या आराखडा तयार केला असून आसपासच्या शेतातील उत्पादकतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, अशा सर्व तरतुदी आराखड्यामध्ये करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
अवयवदान दिनानिमित्त नांदेड इथं डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वतीनं आज सकाळी अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या अवयवदान जनजागृती रॅलीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता हा अचूक शेतीचा कणा असल्याचं अमेरिकेतील कन्सस स्टेट विद्यापीठाच्या कृषि विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राज खोसला यांनी म्हटलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित शेतीच्या शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील मार्गदर्शनात काल ते बोलत होते.
****
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर केंद्रानं अकोला जिल्ह्यात सोमवार पाच ऑगस्टपर्यंत विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, काटेपूर्णा प्रकल्पात परवा रात्री ११ वाजेनंतर ८० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाचे चार वक्रदरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहावं, अशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment