Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
• पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर-देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप.
• बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन.
• जालना इथं पोलाद कंपनीत स्फोट-वीस कामगार जखमी.
आणि
• मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस-अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर येत आहेत. देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधणार आहेत. राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील. तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. या फिरत्या निधीचा फायदा २ लाख ३५ हजार चारशे स्वयंसहाय्यता गटांच्या सुमारे २५ लाख ८० हजार सदस्यांना मिळणार आहे. ३४ राज्यांमधल्या जवळजवळ ३० हजार ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दीदी दूरदृष्यप्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीतला हा तिसरा भाग असेल.
****
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आज विविध राजकीय पक्षांच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं.
ठाणे इथं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मूक निदर्शनं करण्यात आली. शासन आणि प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत असल्याने, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं आंदोलनात सहभाग घेतला.
मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काळ्या फिती बांधून भर पावसात आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली.
जालना इथं शहरातल्या गांधीचमन चौकात महाविकास आघाडीच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. भोकरदन, मंठा, जाफ्राबाद, बदनापूर इथंही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
बीड इथं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं.
नाशिक इथं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शालीमार चौकात आज निदर्शने करण्यात आली. काळ्याफिती लावून अत्याचाराच्या घटनेचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही आज बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात 'जागर जाणिवेचा' हे अभियान राबवण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केलं. केवळ बदलापूरच नव्हे, तर जिथे कुठे अशा घटना घडतात त्या राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाहीत. मानवतेला त्या काळिमा फासणाऱ्या असतात. ही प्रवृत्ती समाजाने ठेचून काढली पाहिजे, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यासारख्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आज राज्यभरात वेतनवाढ, कंत्राटदार मुक्त आणि शाश्वत रोजगार मेळावा आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. नागपूर इथं रेशीमबागेपासून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थान पर्यंत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले.
****
नेपाळ इथल्या बस अपघातग्रस्तांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडू इथं पोहोचल्या आहेत. त्यांनी त्रिभुवन विद्यापीठ रुग्णालयालाही भेट देऊन जखमींची विचारपूस केली. काठमांडूतल्या भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत २७ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले. यात महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातल्या २४ जणांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने भारतात आणले जाणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
****
केंद्रीय रेल्वेा आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ उद्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी ११ वाजता ते सचखंड गुरूद्वाऱ्याला भेट देतील. दुपारी १२ वाजता ते नांदेड रेल्वे स्थानकावर येथे विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी अडीच वाजता विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, सायंकाळी ते हैदराबादकडे प्रयाण करतील.
****
मराठवाड्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी पाटोदा, लिंबागणेश तसंच पाटोदा गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणीसह ७ तालुक्यात अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब इथं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, कंधार इथं अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही पाथरी, सोनपेठ, मानवत इथं तर हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि टेंभुर्णी इथं अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव इथं सर्वाधिक ११६ पूर्णांक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर बहुतांश भागात संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, रात्री काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंभी, रामसगाव, शेवता, बानेगाव या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. दरम्यान, या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
****
नाशिक जिल्ह्यात नाशिक तालुक्यासह इगतपुरी आणि त्रंबकेश्वर तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, त्यामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी ३ हजार ९७० दशलक्ष घनफुट तर दारणा धरणातून तेराशे दस लक्ष घनफुट पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने बहुतांश जलाशये पूर्ण भरली आहेत. सतत सुरु असणाऱ्या पावसाने विविध रस्त्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. खामगाव तालुक्यातील हिवरखेड गावाजवळचा रस्त्यावरील पूल पावसाच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे
****
कोकणात रत्नागिरी तसंच सिंधुदूर्ग जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर-कोल्हापूर रस्त्यावर अणुस्कुरा घाटात आज पहाटे दरड कोसळली, ही दरड हटवून वाहतुक सुरळीत करण्याचं काम आज दुपारपर्यंत सुरू होतं.
दरम्यान, जळगाव, धुळे, पुणे, सातारा, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
जालना इथल्या एका स्टील कंपनीत भीषण स्फोट होऊन २० कामगार जखमी झाले आहेत. आज दुपारी हा अपघात झाला. जखमींपैकी ३ कामगारांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनर इथं हलवण्यात आलं आहे. इतर १७ कामगारांवर जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी कामगारांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही पोलीस अधीक्षक बन्सल यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या ३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत श्री. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. ते धाराशिव इथं आढावा बैठकीत बोलत होते. तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यासह विविध पायभुत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना ओम्बासे यांनी दिल्या. तुळजापूर नगर परिषदेने शहरात बॅरेकेटींग लावणं, आवश्यक त्या ठिकाणी जंतूनाशक पावडरची फवारणी करणं, शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करुन स्ट्रीट लाईट लावणं, यासह श्री घाटशीळ, पापनाश आणि महाव्दार परिसरात २४ तास स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
****
आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Saturday, 24 August 2024
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 December 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...
-
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 19 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...
No comments:
Post a Comment