Monday, 22 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.04.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 April 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.

****



         जागतिक वसुंधरा दिवस आज पाळला जात आहे.  भारत नेहमी पृथ्वीच्या कल्याणाच्या दिशेनं काम करत असून, कायमस्वरुपी विकासावर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वसुंधरा दिनानिमित्त ते बोलत होते. त्यांनी नागरिकांसह मातृभूमीचे आभार मानत, बऱ्याच वर्षांपासून हा महान ग्रह विलक्षण वैविध्याचं घर असल्याचं म्हटलं आहे.

****



 केंद्रीय निवडणूक आयोगानं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाबाबतचा आपला अहवाल, सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, हा अहवाल स्वीकारत, याची एक प्रत चित्रपटाच्या निर्मात्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात दाखल याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



         काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आज आपली सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दिल्लीसाठीच्या उमेदवारांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित उत्तर-पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवतील, नवी दिल्ली इथुन अजय माकन, पश्चिम दिल्ली महाबल मिश्रा, चांदनी चौक जे.पी अग्रवाल, पूर्व दिल्ली अरविंद सिंह लवली तर उत्तर पश्चिम इथूनं राजेश लिलोथिया निवडणूक लढवणार आहेत.

****



 लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या राज्यातल्या १४ मतदार संघात निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे २४९ उमेदवार आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये जळगाव लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार, रावेर १२, जालना २०, औरंगाबाद २३, अहमदनगर १९, पुणे ३१, बारामती १८, माढा ३१, सातारा नऊ, सांगली १२, कोल्हापूर १५, हातकणंगले १७, रत्नागिरी-सिंधुदूर्ग १२, तर रायगड मतदार मतदार संघात १६ मतदार निवडणूक रिंगणात आहेत.

****



 मतदारांनी सकाळी सात वाजेपासून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत निर्भयपणे मतदान हक्क बजावावा, असं आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आलं आहे. मतदानासाठी उद्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सर्वच आस्थापनांमध्ये पूर्ण दिवसभर अथवा, दोन तासांची सुटी जाहीर करण्यात आली आहे.

****



 धुळे, नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात, पुढच्या सोमवारी २९ एप्रिलला मतदान होत आहे, या दोन्ही मतदार संघातल्या भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत इथं जाहीर सभा झाली. सुरक्षा, आरोग्य सेवा, उद्योग, व्यापार, रोजगार आणि शिक्षणासह विविध मुद्यांवर बोलताना, त्यांनी विरोधकांवर अनेक मुद्यांवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही यावेळी भाषण झालं. शेतमालाच्या भावातल्या चढउताराचं विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचं, मोदी म्हणाले.



 नंदूरबार इथल्या भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी आज नंदूरबार इथेही पंतप्रधानांची सभा होणार आहे.

****



 ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं आज सकाळी रंगाचे ब्रश तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत, पाच गोदामं खाक झाली. सुदैवानं, या गोदामात कोणी नसल्यानं, जीवीत हानी झाली नाही. अग्निशामक दलाचे चार बंब आणि दोन टँकरच्या सहाय्याने, पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. नागरी वसाहतीतल्या कारखान्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरातल्या नागरिकांना धुराचा त्रास झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश श्रीकांत शेट्ये यांचं मध्यरात्री साडेअकरा वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ५४ वर्षांचे होते. १९९७ साली ते पहिल्यांदा रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले, २००१ साली झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा नगराध्यक्ष झाले. आज रत्नागिरी शहरात बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

****



 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचं आपलं वेळापत्रक जाहीर केलं आहे. उन्हाळी सुट्ट्यानंतर १५ जून रोजी नव्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होईल.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...