Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२
एप्रिल २०१९ - २०.००
****
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या राज्यातल्या १४ मतदार
संघात मतदान होत आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे २४९ उमेदवार आपलं राजकीय
भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये जळगाव लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार, रावेर १२, जालना
२०, औरंगाबाद २३, अहमदनगर १९, पुणे ३१, बारामती १८, माढा ३१, सातारा नऊ, सांगली १२,
कोल्हापूर १५, हातकणंगले १७, रत्नागिरी-सिंधुदूर्ग १२, तर रायगड मतदार संघात १६ उमेदवार
निवडणूक रिंगणात आहेत.
राज्यातले सुमारे दोन कोटी सत्तावन्न लाख मतदार, उद्या आपला
मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये जळगाव मतदार संघातल्या दोन हजार तेरा मतदान केंद्रांवर
एकोणीस लाख पंचवीस हजार तीनशे बावन्न मतदार, रावेर मतदार संघातल्या एक हजार नऊशे सहा
मतदान केंद्रांवर सतरा लाख त्र्याहत्तर हजार मतदार, जालना - दोन हजार अठ्ठावन्न मतदान
केंद्रांवर १८ लाख पासष्ट हजार, औरंगाबाद मतदार संघात दोन हजार २१ मतदान केंद्रांवर
१८ लाख चौऱ्यांशी हजार मतदार मतदान करतील,
अहमदनगर - दोन हजार तीस मतदान केंद्रांवर १८ लाख चौपन्न हजार, पुणे - एक हजार नऊशे सत्त्याण्णव मतदान केंद्रांवर
सुमारे २० लाख चौऱ्याहत्तर हजार, बारामती - दोन हजार तीनशे बहात्तर मतदान केंद्रांवर
२१ लाख १२ हजार, तर माढा मतदार संघात दोन हजार २५ मतदान केंद्रांवर १९ लाख मतदार मतदानाचा
हक्क बजावतील.
सातारा - दोन हजार दोनशे शहाण्णव मतदान केंद्रांवर १८ लाख एकोणचाळीस हजार, सांगली
- एक हजार आठशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांवर १८ लाख, कोल्हापूर - दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस
मतदान केंद्रांवर १८ लाख चौऱ्याहत्तर हजार, हातकणंगले मतदार संघात एक हजार ८५६ मतदान
केंद्रांवर १७ लाख बहात्तर हजार मतदार मतदान करतील.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्रांवर १४
लाख चोपन्न हजार मतदार, तर रायगड मतदार संघातल्या दोन हजार १७९ मतदान केंद्रांवर सुमारे
१६ लाख एकावन्न हजारावर मतदार, मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या सर्व मतदार संघातल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक
सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं असून, सुमारे दहा टक्के मतदान केंद्रांचं वेब
कास्टिंग होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक पथकं, मतदान साहित्यासह आज रवाना
झाली आहेत.
****
मतदारांनी उद्या सकाळी सात वाजेपासून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत
निर्भयपणे मतदान हक्क बजावावा, असं आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आलं आहे. मतदानासाठी
उद्या सर्वत्र पूर्ण दिवसभर अथवा, दोन तासांची सुटी असेल.
****
राज्यात चौथ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचाराला आता वेग येत
आहे. या टप्प्यात पुढच्या सोमवारी २९ तारखेला मतदान होत आहे, या चौथ्या टप्प्यात मुंबईतल्या
सहा मतदार संघांसह, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नंदूरबार, धुळे, नाशिक, दिंडोरी,
शिर्डी, मावळ, शिरूर, या सतरा मतदार संघात मतदान होणार आहे.
धुळे, नाशिक आणि दिंडोरी मतदार संघातल्या भाजप शिवसेना महायुतीच्या
उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव
बसवंत इथं जाहीर सभा झाली. सुरक्षा, आरोग्य सेवा, उद्योग, व्यापार, रोजगार आणि शिक्षणासह
विविध मुद्यांवर बोलताना, त्यांनी विरोधकांवर अनेक मुद्यांवर टीका केली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचंही यावेळी भाषण झालं. शेतमालाच्या भावातल्या चढउताराचं विरोधी
पक्ष राजकारण करत असल्याचं, मोदी म्हणाले.
नंदूरबार इथल्या भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवार हीना गावित यांच्या प्रचारासाठी
आज नंदूरबार इथेही पंतप्रधानांची सभा झाली. आदिवासी आरक्षणाला कोणी धक्का लावू शकणार
नसल्याचं, पंतप्रधानांनी या सभेत सांगितलं.
****
पालघर मतदार संघातले भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र
गावीत यांच्या प्रचारार्थ आज विरार इथं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली.
राफेल प्रकरणी फेरविचार याचिकेसंदर्भात चौकीदार चोर है, या विधानाबद्दल राहुल गांधी
यांना आज न्यायालयात माफीनामा दाखल करावा लागल्याचं, फडवणीस यांनी सांगितलं. थेट लाभ
हस्तांतरण योजनेमुळे विना भ्रष्टाचार सर्वांना सरकारी योजनेचा लाभ मिळत असल्याचं, फडणवीस
म्हणाले.
****
राफेल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च
न्यायालयात माफी मागितल्यामुळे काँग्रेस पक्ष आणि त्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा
खोटारडेपणा सिद्ध झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार
परिषदेत बोलत होते. वारंवार खोटे बोलण्यामुळे काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता संपुष्टात
आल्याची टीका जावडेकर यांनी केली.
****
No comments:
Post a Comment