Tuesday, 23 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.04.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 April 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३  एप्रिल २०१९  सकाळी ७.१० मि.

****



v लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला प्रारंभ; औरंगाबाद, जालना मतदारसंघासह राज्यात १४ मतदारसंघात मतदान सुरू

v काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातला उमेदवारी अर्ज वैध; राफेल फेरविचार याचिकेवरच्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी

v भाजपची क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना तर काँग्रेसची मुष्टीयोध्दा विजेंदरसिंगला दिल्लीतून उमेदवारी जाहीर

आणि

v गंगाखेड शुगर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टेंसह इतर आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

****



 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या मतदानास काही वेळापूर्वी सुरूवात झाली आहे. देशतल्या १३ राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशातल्या ११६ मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. राज्यातल्या औरंगाबाद, जालना, अहमदनगर, सांगली, जळगाव, रावेर, पुणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघांतही मतदानास प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत राज्यात विविध राजकीय पक्षांचे १९ महिलांसह २४९ उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत. राज्यातले सुमारे दोन कोटी सत्तावन्न लाख मतदार, आज आपला मतदानाचा हक्क बजावतील.

****



 लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीची अधिसूचना निवडणूक आयोगानं काल जारी केली. या अखेरच्या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासीत प्रदेशातल्या ५९ जागांसाठी, १९ मे रोजी मतदान होणार आहे.

****



 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात अमेठी मतदार संघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांनी इंग्लंडमधल्या एका कंपनीच्या कागदपत्रांमध्ये ते ब्रिटिश नागरिक असल्याचं नमूद केलं आहे, असं एका तक्रारदारानं म्हटलं होतं. राहुल यांच्या पदवीवरही प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी आयोगानं, काल दोन्ही बाजू ऐकून घेत, राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला.



 दरम्यान, गांधी यांनी काल अमेठीत प्रचार सभा घेतली. केंद्र सरकारनं, आपल्या मतदार संघातली विकास कामं हेतुपुरस्पर थांबवली असल्याचा आरोप केला.

****



 राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकरणी भाजपाच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राहुल गांधी यांनी शपथपत्र दाखल करून, दिलगिरी व्यक्त केली.



 दरम्यान, या घटनेमुळे राहुल गांधी यांच्याबाबतची विश्वासार्हता संपली असल्याचं, भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या.



 भाजपचे ज्येष्ठ नेते त्री प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन, वारंवार खोटे बोलण्यामुळे काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता संपुष्टात आल्याची टीका केली.

****



 भारतीय जनता पक्षानं क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे तर खासदार मिनाक्षी लेखी यांना नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.



 दरम्यान, कॉंगेस पक्षानं  दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघातून मुष्टियोद्धा विजेंदर सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याबरोबरख काँग्रेसनं दिल्लीमधल्या सर्व मतदार संघातल्या उमेदवारांची नाव घोषित केली आहेत. काँग्रेसनं आतापर्यंत देशभरातल्या ४२२ उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत.

****



 बिहारमध्ये निवडणूक प्रचारात धर्मविषयक वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगानं कॉंगेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना ७२ तास प्रचारास बंदी केली आहे.



 भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधल्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी बाबरी मशिद संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****



 राज्यात चौथ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचाराला आता वेग येत आहे. या टप्प्यात येत्या २९ तारखेला मतदान होत आहे, या चौथ्या टप्प्यात मुंबईतल्या सहा मतदार संघांसह, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नंदूरबार, धुळे, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ, शिरूर, या सतरा मतदार संघात मतदान होणार आहे.



 नाशिक, दिंडोरी, धुळे, आणि नंदुरबार मतदार संघातल्या भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत तसंच नंदुरबार इथं जाहीर सभा झाली. सुरक्षा, आरोग्य सेवा, उद्योग, व्यापार, रोजगार आणि शिक्षणासह विविध मुद्यांवर बोलताना, त्यांनी विरोधकांवर अनेक मुद्यांवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही यावेळी भाषण झालं. शेतमालाच्या भावातल्या चढउताराचं विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचं, मोदी म्हणाले.

****



 निवडणुकीनंतर दुष्काळग्रस्तांसाठीचं काम गेचच सुरू करु असं आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ते काल संगमनेर इथं शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या सोबत असून या भागातल्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचंही ते म्हणाले. आपल्या भाषणात ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

****



 पालघर मतदार संघातले भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ काल विरार इथं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे विना भ्रष्टाचार सर्वांना सरकारी योजनेचा लाभ मिळत असल्याचं, फडणवीस म्हणाले.

****



 शेतकऱ्यांच्या नावांवर परस्पर ३२८ कोटी रूपयाचं पीक कर्ज उचलल्यासंदर्भात गंगाखेड शुगर कारखान्याचे  रत्नाकर गुट्टेसह इतर आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. याआधीही न्यायालयानं दोन वेळेस असे आदेश दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यानं पुन्हा हे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात दाखल याचिकेची पुढील सुनावणी १० जूनला होणार आहे.

*****



 परभणीचा कै. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्योत्सना कुकडे यांना जाहीर झाला आहे. उद्या परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. कुकडे यांना सम्नापूवर्क प्रदान करण्यात येणार आहे.

****



 बीड जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून जायकवाडी प्रकल्पातून माजलगाव धरणात दोन दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आमदार जयदत्त  क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. माजलगाव धरणात सध्या दोन पुर्णांक ९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा पाऊस पडेपर्यंत पुरणार नाही, त्यामुळे तातडीनं जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश संबंधीत विभागाला देण्यात यावेत अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.

****



 लातूर जिल्ह्यात ३८ टॅंकरच्या माध्यमातून २८ गावं आणि पाच वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. याच बरोबर जिल्ह्यातल्या २७१ गावं आणि ७२ वाड्यांसाठी ४५९ विहीरी, जिल्हा परिषदेनं अधिग्रहीत केल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बी आर शेलार यांनी दिली.

****



 नाशिक जिल्ह्यात मनमाड जवळ काल रात्री कामायनी एक्सप्रेसच्या एका डब्याला अचानक आग लागली. मनमाड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर डब्यातल्या प्रवाशांनी बाहेर उड्या घेतल्या, त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाने तातडीनं आग विझवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल सकाळी रंगाचे ब्रश तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत, पाच गोदामं खाक झाली. सुदैवानं, या गोदामात कोणी नसल्यानं, जीवीत हानी झाली नाही. अग्निशामक दलाचे चार बंब आणि दोन टँकरच्या सहाय्याने, पाच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. नागरी वसाहतीतल्या कारखान्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरातल्या नागरिकांना धुराचा त्रास झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 औरंगाबाद इथल्या पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वासाहतीतल्या एका कंपनीला काल दुपारी आग लागली. कंपन्याना उत्पादनांच्या वेष्टनासाठी पुरवलं जाणारं साहित्य या आगीत खाक झालं. सुदैवानं, या आगीत जीवीत हानी झाली नसल्याची माहिती करमाड पोलिसांनी दिली आहे.

****



 परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात सोन्ना इथं काल सकाळी नांगरणीसाठी जात असलेला ट्रॅक्टर पलटून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 गेल्या २१ एप्रिलला झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळं गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यात कुरंडीमाल केंद्रावर  आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेनं खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने उचल न केल्यानं मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. मागील वर्षी खरेदी झालेल्या धानांपैकी ६ हजार ९४४ क्विंटल धानाची उचल महामंडळानं केली नाही. हे धान उघड्यावर ठेवण्यात आलं होतं.

****



 धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या प्रचारात भारतीय सैन्य दलाचे जवान चंदू चव्हाण यांना सहभागी केल्यामुळे भामरे यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी लोकसंग्राम संघटनेचे उमेदवार अनिल गोटे यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे. भामरे यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचं उल्लघंन केल्यानं ही तक्रार करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल दत्तात्रय तटकरे यांच्यासह आणखी दोन उमेदवार सुनिल सखाराम तटकरे  आणि सुनील पांडूरंग तटकरे निवडणूक रिंगणात आहेत, मात्र त्यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा हिशोब दाखल केला नाही आणि ते निवडणूक यंत्रणांच्या बैठकांना देखील उपस्थित राहिले नसल्यानं निवडणूक आयोगाने त्यांना नोटिसा बजावल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूकीचं काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला. गगनबावडा इथले तलाठी जयंत चंदनशिवे यांचा अपघाती मृत्यू झाला तर होमगार्ड अनंत जाधव यांचा निवडणूक कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे मृत्यू झाला.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 8 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती...