Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - ०२ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
**
उस्मानाबादमधे कोरोना विषाणुचे नवे १७४ रुग्ण
**
औरंगाबादमधे सकाळच्या सत्रात आढळले कोरोना विषाणुचे ७६ रुग्ण
**
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना विषाणुची लागण
आणि
**
ग्रामीण भागात अखंड इंटरनेट सेवेसाठी भारत संचार निगम वचनबद्ध- केंद्रीय राज्य मंत्री
संजय धोत्रे
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे १७४ रुग्ण आज आढळले आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातल्या
५४, तुळजापूर ४४, उमरगा ६३, परंडा ६, कळंब ३, वाशी १ तर लोहारा तालुक्यातल्या ३ रुग्णांचा
समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या आता १ हजार ४६४ इतकी झाली आहे.
आतापर्यंत ५७ रुग्णांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातले ५१६ रुग्ण
उपचारानंतर बरे झाले असून सध्या ८९१ रुग्णांवर उस्मानाबाद मधल्या विविध रुग्णालयांत
उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत कोरोना विषाणुचे शहात्तर नवे रुग्ण आढळले आहेत. यात ग्रामीण
भागातल्या ४३ तर शहरातल्या ३३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता १४ हजार ४०३ झाली
आहे. या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार सहाशे एक असून सध्या ३ हजार
तीनशे चोवीस रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या
रुग्णांची संख्या ४७८ झाली आहे.
****
लातूर
जिल्ह्यात औसा शहर आणि ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या
ही चिंतेची बाब असून या भागात नागरिकांनी तात्काळ चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, असं आमदार
अभिमन्यू पवार यांनी म्हटलं आहे. या संसर्गाची थोडीही लक्षणं आढळून आली तर संबंधितांनी
आणि त्यांच्या संपर्कातल्या व्यक्तिंनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी, असं आमदार पवार
यांनी नमुद केलं आहे.
****
गोंदिया
जिल्ह्यात कोरोना विषाणुचे ६० नवे रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातली या रुग्णांची आजपर्यंतची
ही सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणुचे ३८६ रुग्ण आढळले असून
तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोंदियामधे सध्या कोरोना विषाणुच्या १४७ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. त्यांनी आज सामाजिक संपर्क
माध्यमातून या संदर्भातली माहिती दिली आहे. प्रारंभीची लक्षणं आढळल्यानंतर आपण या विषाणू
संबंधी चाचणी करुन घेतली. त्यात आपल्याला याची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं, असं
त्यांनी नमुद केलं आहे.
****
ज्येष्ठ
अभिनेते अमिताभ बच्चन कोरोना विषाणुच्या संसर्गातून मुक्त झाल्याचं आज स्पष्ट झालं
आहे. त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयातून दुपारी सुटी देण्यात आली असून, आपण निवासस्थानी
विलगीकरणात असल्याची माहिती त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे दिली आहे.
****
उत्तर
प्रदेशच्या तंत्र शिक्षण मंत्री कमल राणी वरुण यांचं आज लखनऊमधे कोरोना विषाणू संसर्गावर
उपचार सुरू असताना निधन झालं. त्या बासष्ट वर्षांच्या होत्या. त्या मधुमेह, उच्च रक्तदाब
आदी विकारांनीही ग्रस्त होत्या. अठरा जुलैला त्यांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचं
स्पष्ट झालं होतं.
****
नांदेड
जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती
उद्धवराव पाटील कौडगावकर यांचं आज कोरोना विषाणु संसर्गामुळे निधन झालं. ते ६८ वर्षांचे
होते.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये कोरोना विषाणुचा वाढता प्रसार लक्षात घेता तालुका
निहाय आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करण्याचे आदेश राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा
मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले आहेत. दिंडोरी इथं त्यांनी
आज शासकीय आरोग्य यंत्रणांची बैठक घेतली. दिंडोरी, कळवण, सटाणा आणि पेठ या तालुक्यातल्या
कोरोना विषाणुच्या स्थितीचा आढावा या बैठकीत घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले आहेत.
आरोग्य नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
****
आजचं
युग तंत्रज्ञानाचं असून आता सर्व बाबी इंटरनेटवर आधारित आहेत अशा वेळी ग्रामीण भागात
`भारत एअर फायबर` महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून ग्रामीण भागात अखंड सेवा पुरवण्यासाठी
भारत संचार निगम वचनबद्ध असल्याचं केंद्रीय दूरसंचार माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री
संजय धोत्रे यांनी म्हटलं आहे. `भारत एअर फायबर` सेवेच्या उद्घाटन प्रसंगी महाबीज मुख्य
कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल
भंडारी आणि भारत संचार निगमचे व्यवस्थापक आणि अधिकारी उपस्थित होते. या अत्याधुनिक
सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना जलद गतीनं आणि अखंड सेवा मिळणार आहेत शिवाय दृष्य संवाद
साधण्यासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. `भारत एअर फायबर सर्व्हिस`मुळे अकोला
तसंच वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या रहिवाशांना मागणीनुसार `वायरलेस इंटरनेट`
जोडणी मिळणार आहे.
****
गेल्या
२४ तासांत पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणुचे २६१ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली
कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १५ हजार ६२० वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०७
जणांचा या विषाणुसंसर्गामुळे मृत्यु झाला आहे. तर बऱ्या झालेल्या ११ हजार २३० रुग्णांना
रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितित पालघर ग्रामीण भागात ३८१ प्रतिबंधित
क्षेत्रं आहेत.
****
कोरोना
विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात नाशिक शहरात गणेश आगमन
आणि विसर्जन मिरवणुकींना नाशिक महापालिकेनं मनाई केली आहे. या संदर्भात महापालिकेचे
आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.
****
अमरावती
जिल्ह्यात आज कोरोना विषाणुचे ६६ नवे रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णांची संख्या
२ हजार २९४ झाली आहे तर १ हजार ५७६ कोरोना बधित बरे होऊन घरी गेले आहेत आणि ६१ रुग्णांचा
आता पर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या अमरावती
मध्ये ५९१ रुग्ण उपचार घेत आहेत.
****
सातारा
जिल्ह्यातली टाळेबंदी शिथिल केल्यानंतर काल
रात्री ७ वाजेनंतर दुकानं सुरु ठेवणाऱ्या चौघांवर तसंच जमावबंदी आदेश डावलून रस्त्यावर
वाढदिवस करणाऱ्या ११ युवकांवर आज शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
शासनानं
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळात स्थलांतरीत
कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी
शासनाच्या आदेशानुसार `ऑनलाईन ई-परवाने` जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जात आहेत. मात्र काही लोकांकडून नागरिकांना ई-परवाना मिळवून
देण्याच्या नावानं अमिष दाखवलं जातं, अशाच प्रकरणात पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा
इथल्या २ झेरॉक्स केंद्राच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्यानं जनतेनं बनावट
`इ-परवाने` बनवणाऱ्यांपासून सावध रहावं असं अवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
जालना
जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी दोन लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील
कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी पिकांसाठी सात लाख ८४ हजार ८२८ विमा
अर्ज भरले आहेत. जिल्ह्यात खरिपाचं एकूण पेरणी क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर असून,
यापैकी ४४ पूर्णांक ७० टक्के क्षेत्राचा विमा उतरवण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी
अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
****
राज्याचे
सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जालन्याचे संपर्क मंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई
टोपे यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी चार वाजता जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे
समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री
मुंबई इथल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच दीर्घ आजारानं निधन झालं होतं.
****
गेल्या
पाच महिन्यांपासून लातूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या दोन रेल्वे गाड्यांचं रुपांतर
`कोविड केंद्रात` करावं, आणि पंतप्रधान सहाय्यता निधीतून या केंद्रासाठी १०० व्हेंटीलेटर
देण्यात यावेत, अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक विभागीय सल्लागार
समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली आहे. निजाम शेख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष
गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्य रेल्वे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना यासंदर्भात
निवेदनं पाठवली आहेत.
****
पंतप्रधान
पिक विमा योजने अंतर्गत ३१ जुलैपर्यंत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या जिल्ह्यातल्या
११२ शाखांमध्ये तीन लाख एकोणसाठ हजार ५३३ शेतकऱ्यांनी ३२ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा
पीक विमा हप्ता गावातल्या स्थानिक संस्थांमार्फत भरला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची
गंभीर परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना बँकेत यावं लागू नये, या करता बँकेचे मार्गदर्शक
दिलीप देशमुख यांच्या सुचनेनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी
गावात जाऊन पिक विमा स्विकारल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
****
No comments:
Post a Comment