Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३
ऑगस्ट
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
कोरोना विषाणू संसर्गाची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता जागतिक आरोग्य
संघटनेचा इशारा.
·
कोरोना विषाणू बाधित रुग्णांना स्मार्टफोन आणि टॅबलेटसारख्या उपकरणांचा वापर
करू देण्याची केंद्र सरकारची सूचना.
·
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना विषाणुची लागण तर जेष्ठ अभिनेते अभिताभ
बच्चन तसंच माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना विषाणूमुक्त झाल्यामुळे
रुग्णालयातून सुटी.
·
राज्यात आणखी नऊ हजार ५०९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, तर २६० जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
·
औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी सहा, नांदेडमध्ये सात तर जालना
जिल्ह्यात एकाचं निधनं, उस्मानाबादमध्ये २८०, लातूर १६१, हिंगोली ३८ तर बीडमध्ये ३८
नवे रुग्ण.
आणि
·
राज्यात आजपासून बुधवारपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा
अंदाज.
****
कोरोना विषाणू संसर्गाची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा
जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यू एच ओ नं दिला आहे. जगभरात कोरोना विषाणूच्या साथीचा
प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले. त्यानंतर या साथीच्या सध्याच्या
स्थितीचा आढावा संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत काल घेण्यात आला, त्यानंतर संघटनेनं
प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे
अनेक देशांना सामाजिक-आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल, असा इशाराही या निवेदनात
देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ३० जानेवारीला कोरोना ही जागतिक आरोग्य समस्या
असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं, तेव्हापासूनची या समितीची ही चौथी बैठक होती.
****
रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांना स्मार्टफोन आणि टॅबलेटसारख्या
उपकरणांचा वापर करू द्यावा, अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित
प्रदेशांना केली आहे. यामुळे रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्कात राहता येईल,
तसंच त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यातही मदत होईल असं केंद्र सरकारनं म्हटलं
आहे. रुग्णांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी दिलेली असली, तरी देखील याबाबत अनेक
रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आरोग्य मंत्रालयाला मिळाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर
ही सूचना जारी करण्यात आली आहे. त्या त्या राज्यांमधे अशा उपकरणांच्या वापरासाठीचं
वेळापत्रक आणि निर्जंतुकीकरण यादृष्टीनं नियमावलीही तयार करता येऊ शकेल, असं यासंदर्भात
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संबंधी रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करुन बाधितांवर वेळेत उपचार
व्हावेत तसंच वयोवृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष दिलं जावं, असं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवप्यारीबाई ब्रिजलाल धूत चॅरीटेबल ट्रस्टतर्फे
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेला पंचवीस खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता
कक्ष आणि ‘मिशन झिरो’ उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते काल ‘ई-प्रणालीद्वारे’
करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. विषाणूवर मात हे धोरण प्राधान्यानं राबवून लक्षणं
असणाऱ्या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली पाहिजे, त्यामुळे संसर्गाची साखळी
तुटण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. त्यांनी
काल सामाजिक संपर्क माध्यमातून या संदर्भातली माहिती दिली. प्रारंभीची लक्षणं आढळल्यानंतर
आपण या विषाणू संबंधी चाचणी करुन घेतली. त्यात आपल्याला याची लागण झाली असल्याचं स्पष्ट
झालं, असं त्यांनी नमूद केलं आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलगीकरणात रहावं
आणि तपासणी करून घ्यावी, असं आवाहन शाह यांनी ट्विटद्वारे केलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री
बी.एस.येडीयुरप्पा यांनाही या विषाणूची लागण झाली असल्याचं त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं.
****
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन कोरोना विषाणुच्या संसर्गातून मुक्त झाले असून,
काल त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आपण निवासस्थानी विलगीकरणात
असल्याची माहिती त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे दिली आहे. आपण बरे होण्यासाठी
प्रार्थना केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन
यांचा अहवाल बाधित आल्यामुळे त्यांना आणखी काही काळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार
आहेत. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरही विषाणू मुक्त झाल्यामुळे काल त्यांना
रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. ते ९१ वर्षांचे आहेत.
****
राज्यात काल आणखी नऊ हजार ५०९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख ४१ हजार २२८ झाली आहे. काल २६० रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १५ हजार ५७६ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. तर काल नऊ हजार ९२६ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
राज्यात आतापर्यंत दोन लाख ७६ हजार ८०९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या
एक लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात २२ लाख ५५ हजार ७०१
चाचण्या करण्यात आल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
आतापर्यंत या विषाणू संसर्गानं ४८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी २२६ बाधित
रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १४ हजार ५५३ झाली आहे.
तर काल ३०० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात
आतापर्यंत दहा हजार ९०१ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल सहा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे
जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं मृत्यू पावलेल्यांची संख्या ३९ झाली आहे. काल जिल्ह्यात
१७ नवे बाधित रुग्ण आढळले. सध्या रुग्णालयात २६२ जण उपचार घेत असून आतापर्यंत या आजारातून
३९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात जिल्ह्यातले
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती उद्धवराव पाटील कौडगावकर
यांचा समावेश आहे. ते ६८ वर्षांचे होते. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं मृत्यू
झालेल्यांची संख्या ९० झाली आहे. तर काल आणखी १७० रुग्णांची नोंद झाली. यामध्ये आरटीपीसीआर
चाचणीत १४७ तर अँटिजेन चाचणीत २३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
दोन हजार १५६ झाली आहे. तर काल १९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. नांदेड
जिल्ह्यात आतापर्यंत ९५४ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार १०१ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत ७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ६६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ३३५ झाली आहे. तर काल ४९ रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत ५५५ रुग्ण बरे झाले असून, सध्या
७०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी २८० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ५७० झाली आहे. त्यापैकी ५१६ रुग्ण बरे झाले असून,
जिल्ह्यात सध्या ९९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात येत्या ३१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी लागू राहणार असल्याचं जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ मुंडे यांनी काल सांगितलं. याकाळात अत्यावश्यक सेवा चोवीस तास तर सर्व आस्थापना
सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात कळंब नगरपालिका
क्षेत्रात आजपासून येत्या नऊ ऑगस्ट पर्यंत जनता संचारबंदी पाळण्यात येत आहे. तसंच मुरूम
नगरपालिका क्षेत्रातही कालपासून येत्या दहा ऑगस्टपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली
आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी १६१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये
अँटीजेन चाचणीतून ७१ जण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार
४६९ झाली आहे. त्यापैकी एक हजार ३४४ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार नऊ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या ७०९ झाली आहे. त्यापैकी ५०६ रुग्ण बरे झाले असून, सध्या १९५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या ९०४ झाली आहे. त्यापैकी ४२८ रुग्ण बरे झाले असून, ३२ जणांचा मृत्यू
झाला. बीड जिल्ह्यात सध्या ४४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईमध्ये काल एक हजार १०५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
एकूण बाधितांचा आकडा एक लाख, १६ हजार, ४३६ एवढा झाला आहे. तर, एकूण मृतांचा आकडा सहा
हजार, ४४७ झाला आहे. पुणे इथं काल एक हजार ७६२, पिंपरी -चिंचवड ७३४, सांगली २९४, सातारा
१६३, अहमदनगर ४०३, पालघर २६१, धुळे १४५, गोंदिया ६०, बुलडाणा ५१, यवतमाळ ३० आणि अमरावतीमध्ये
१३१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
****
बहीण भावाच्या अतूट नात्याची आठवण करुन देणारा सण राखीपौर्णिमा अर्थात नारळी
पौर्णिमा आज साजरी होत आहे. बहीण भावाला राखी बांधून हा दिवस साजरा करतात. उपराष्ट्रपती
व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्यात आजपासून बुधवारपर्यंत काही भागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामध्ये मुंबईसह, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद
तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हा पाऊस
होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, सांगली
आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही बुधवारपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज
हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
स्वच्छ भारत अभियानामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये स्वतंत्ररित्या लक्ष
केंद्रीत करण्यात आलं असून देशभरात स्वच्छतेची खात्री करण्यात या मोहिमेनं अतिशय महत्त्वाची
भूमिका बजावली आहे.
२०१४मध्ये या अभियानाचा आरंभ झाल्यापासून देशभरात दहा कोटींहून अधिक वैयक्तिक
शौचालयांचं बांधकाम झालेलं आहे. परिणामी सर्व राज्यातील अनेक ग्रामीण भाग उघड्यावरील शौचपासून मुक्त झाले आहेत. उघड्यावर
शौच न करण्याचं वर्तन कायम राहावं, कोणीही याबाबत अनभिज्ञ राहू नये आणि घन तसंच द्रवरुप
कचरा व्यवस्थापन सुविधा खात्रीने उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं स्वच्छ भारत अभियान ग्रामीणने
आता दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल सुरु केली आहे. ‘खुल्या जागेवर शौच मुक्ती - ओपन डिफिकेशन
फ्री’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. हा टप्पा प्तपा २०२४-२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
स्वच्छतेच्या सोयी तसंच घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही स्वच्छ भारत अभियानाने
लक्षणीय प्रगती केली आहे. आजपर्यंत देशभरातील चार हजार ३२४ नागरी स्थानिक संस्था उघड्यावरील
शौचपासून मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. सहा लाखांहून अधिक सामुदायिक आणि सार्वजनिक
शौचालयं बांधण्यात आली आहेत.
****
लातूर जिल्ह्यात औसा शहर आणि ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोना विषाणुच्या रुग्णांची
संख्या ही चिंतेची बाब असून या भागात नागरिकांनी तात्काळ चाचणीसाठी पुढाकार घ्यावा,
असं आमदार अभिमन्यू पवार यांनी म्हटलं आहे. या संसर्गाची थोडीही लक्षणं आढळून आली तर
संबंधितांनी आणि त्यांच्या संपर्कातल्या व्यक्तिंनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी, असं
ते म्हणाले.
****
लातूर शहरातला कोविड१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणारे अधिकचे मनुष्यबळ
उपलब्ध करून द्यावे असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले
आहेत. शहरात सध्या २३० प्रतिबंधित क्षेत्र असून त्या ठिकाणी पाळीनुसार कर्मचारी नियुक्त
करावे लागत आहेत. यापार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी सूचना केल्या असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी
जी. श्रीकांत यांनी महापालिकेकडून प्रस्ताव मागवला आहे.
****
बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी
१७ लाख ७१ हजार विमा नोंदणी अर्ज दाखल केले असून ५९ कोटी ६६ लक्ष रुपये एवढा हप्ता
विमा कंपनीत भरला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या तीन लाख ५९ हजार ५३३ शेतकऱ्यांनी ३२ कोटी चार लाख ५५ हजार
रुपयांचा विमा भरला आहे.
जालना जिल्ह्यात सात लाख ८४ हजार ८२८ विमा अर्ज भरले आहेत. जिल्ह्यात खरिपाचं
एकूण पेरणी क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर असून, यापैकी ४४ पूर्णांक ७० टक्के क्षेत्राचा
विमा उतरवण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
****
गेल्या पाच महिन्यांपासून लातूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या दोन रेल्वे
गाड्यांचं रुपांतर ‘कोविड केंद्रात’ करावं, आणि पंतप्रधान सहाय्यता निधीतून या केंद्रासाठी
१०० व्हेंटीलेटर देण्यात यावेत, अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश,
कर्नाटक विभागीय सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली आहे. निजाम शेख यांनी
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्य रेल्वे महाप्रबंधक
संजीव मित्तल यांना यासंदर्भात निवेदनं पाठवली आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथल्या गोविंद शेंडगे यांनी शिवणकाम करतानाच मोफत
मास्क वाटप करण्यास सुरुवात केली. टाळेबंदीच्या काळात व्यवसाय बंद असतानाही त्यांनी
सामाजिक जाणिवेतून हे काम केलं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
लॉकडाऊनच्या काळात सामाजिक भावनेतून मोफत मास्क वाटप करण्याचे
कार्य सुरू ठेवले आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गोविंद शेंडगे यांनी. प्रतिकुल
परिस्थितीवर मात करत स्वतःचा कपडे शिवण्याचा व्यवसाय सांभाळत मास्कचे मोफत वाटप जिल्ह्यातील
वेगवेगळ्या भागत फिरून करण्यात आले. या संदर्भात शेंडगे म्हणाले “मी स्वतःचे टेलर काम
व्यवसाय करून कारागीरला संगळं सांभाळून मी आतापर्यंत परभणी जिल्ह्यात १३ हजार मास्क
मोफत वाटप केले आहेत. मलाही समाधान वाटत आहे.” २१ हजार मोफत मास्क वाटपाचे उद्दिष्ट
ठेवणाऱ्या शेंडगे यांच्या मनाची श्रीमंती इतरांसाठी प्रेरणादायी होय.
आकाशवाणी बातम्यांसाठी, परभणीहून
विनोद कापसीकर
****
No comments:
Post a Comment