Friday, 23 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज कोविड रुग्णांची संख्या जास्त असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. पंतप्रधान दुपारी देशातल्या आघाडीच्या ऑक्सिजन उत्पादकांशीही चर्चा करणार आहेत.  

****

पालघर जिल्ह्यातल्या विरार पश्चिमेला असलेल्या, विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून, त्यांनी सर्वप्रथम प्राधान्यानं आग पूर्णपणे विझवणं आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील, याकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख, आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येक ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. राज्यात आणि देशातही अशा घटना वाढल्या असून, यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

कोविड काळात रुग्णालयांवर ताण असल्यानं राज्य शासनानेच सर्व रुग्णालयांचं फायर ऑडीट करावं, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

****

नाशिकमधल्या प्राणवायु गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेत, राज्य सरकारकडून घटनेची माहिती देणारा अहवाल मागवला आहे. चार मे पर्यंत हा अहवाल सादर करायचा असून, त्यात या दुर्घटनेमागील कारणांचं स्पष्टीकरण असावं, असे आदेश न्यायालयानं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना दिले आहेत. रुग्णालयातल्या ऑक्सिजनच्या टाकीत वायू भरला जात असताना व्हॉल्वमधून गळती होत असल्याचं लक्षात आलं, मात्र ती दुरुस्ती करेपर्यंत ऑक्सिजनचा दाब कमी होऊन पुरवठा पुढील २० मिनिटांपर्यंत थांबला, अशी प्राथमिक माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितली.

****

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १८ वर्षांवरील कोविड बाधित रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य मंत्रालयानं सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लक्षणं दिसू लागल्यावर दहा दिवसांच्या आत ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या मध्यम ते गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांनाच, रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा विचार करावा, असं या सूचनेत म्हटलं आहे. मूत्राशय किंवा यकृताचे गंभीर आजार असणाऱ्यांना रुग्णांवर, आणि ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता नसलेल्या रुग्णांनाही, हे इंजेक्शन दिलं जाऊ नये, असा सल्लाही आरोग्य मंत्रालयानं दिला आहे.

****

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेक राजकीय पक्ष कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत नसल्याचं लक्षात आल्यानं, निवडणूक आयोगानं राज्यात रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा बाईक रॅली आयोजित करण्यास मनाई केली आहे. तसंच, सार्वजनिक सभांमध्ये ५०० पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. हे नियम निवडणूक संपेपर्यंत लागू असतील, असं आयोगानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

****

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक एप्रिलपासून सुरु झालेली या वर्षासाठीच्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ मंदिर समितीनं ट्विटर संदेशात ही माहिती दिली. कोविड संसर्गाच्या परिस्थितीवर मंदिर समिती लक्ष ठेवून आहे, परिस्थितीत सुधारणा झाल्यावर ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाईल, असं या संदेशांत म्हटलं आहे.

****

सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन आणि दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांमधल्या ३५ लाख लाभार्थींना एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचं अर्थसहाय्य देण्यासाठी एक हजार ४२८ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

****

परभणी जिल्हा प्रशासनाला परिवहन कार्यालयाकडून सात रुग्णवाहिका अधिग्रहित करून देण्यात आल्या आहेत. काही रुग्णवाहिका धारकांकडून नागरिकांची लूट सुरु असल्याचं निदर्शनास आल्यानं परिवहन कार्यालयानं जादा भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिका धारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...