Tuesday, 25 May 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २५ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या यास चक्रीवादळानं आता तीव्र स्वरूप धारण केलं असून, ते उद्या पहाटे पारदीप आणि सागर बेटांदरम्यान ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा देईल. दरम्यान २१ तारखेलाच अंदमानच्या परिसरात दाखल होऊन २२ तारखेपर्यंत श्रीलंकेच्या दक्षिण किनार्यापर्यंत मजल मारणारे मोसमी वारे या वादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरच उत्तरेकडे खेचले गेले आहेत.

****

देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींच्या १९ कोटी ८५ लाख ३८ हजार ९९९ मात्रा देण्यात आल्या आहेत. यात १५ कोटी ५२ लाख ३५ हजार ३७४ जणांना पहिली, तर चार कोटी ३३ लाख तीन हजार ६२५ जणांना दुसरी मात्रा मिळाली आहे.

****

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मार्ग काढण्यासाठी आपण राज्यभर दौरा करून तज्ज्ञांची मते जाणून घेत आहोत छत्रपती संभाजीराजे यांनी काल सोलापुरात सांगितलं. राज्य सरकारच्या हातातील लाभ सरकारनं मराठा समाजाला द्यावेत, यासाठी 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना नऊ जूनपर्यंत ॲट्रॉसिटी प्रकरणात अटक केली जाणार नाही, असं आश्वासन, राज्य सरकारच्या वतीनं काल मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आलं. या कालावधीत परमबीर सिंग यांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती राज्य सरकारनं न्यायालयाकडे केली आहे.

****

बीड जिल्ह्यात आज रात्री १२ वाजेपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत, कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. औषधी दुकानं, आरोग्यसेवा, तसंच इतर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व आस्थापना या काळात बंद राहणार आहेत.

****

लातूर महानगरपालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर आज कोव्हीशिल्ड लसीची पहिली मात्रा, तसंच पहिली मात्रा घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरी मात्रा दिली जाणार आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट दिसत असली, तरी नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.

****

परभणी शहरात टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत काल २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

****

 

No comments: