Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
May 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या
कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड
लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकाने
सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
कोविड-१९ शी संबंधित अधिक मदतीसाठी
आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत केंद्राशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या
मदत केंद्राशी संपर्क करू शकता.
****
·
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं बांधकाम रोखण्यासंदर्भातली
याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली; याचिकेत जनहित नसल्याचं सांगत याचिकाकर्त्यांना
एक लाख रुपये दंड.
·
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे
राजकीय आरक्षण संपुष्टात- देवेंद्र फडणवीस यांचा आरोप तर भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे
अश्रू - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पलटवार.
·
जालना जिल्ह्यात नऊ तर औरंगाबाद जिल्ह्यात
आठ कोविडग्रस्तांचा मृत्यू.
आणि
·
हिंगोली जिल्ह्यात विवाह सोहळ्यावर कारवाई;
वधु-वरांसह २०० जणांविरोधात गुन्हा.
****
दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं बांधकाम
रोखण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून
लावली. या याचिकेत कुठलंही जनहित नसल्याचं मत नोंदवत उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना
एक लाख रुपये दंड ठोठावला. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात संसदेची नवी इमारत, पंतप्रधान
आणि उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, मध्यवर्ती सचिवालय आणि इतर अनेक सरकारी इमारती उभारल्या
जात आहेत. कोरोना काळातही अपवाद म्हणून या प्रकल्पाच्या बांधकामाला परवानगी देण्यात
आली आहे. कामगार बांधकामाच्या ठिकाणीच राहत असल्यानं नियमांचे उल्लंघन होत नसल्याचं,
निरीक्षणही उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणावरची याचिका
प्रलंबित असताना इथे सुनावणी घेता येणार नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची
याचिका फेटाळून लावली होती.
****
सीबीएसई आणि आयसीएससीच्या बारावीच्या परीक्षा
रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या तीन जूनला सुनावणी होणार आहे.
आज झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत
मागितली, त्यामुळे आता यासंदर्भातलं चित्र तीन जूनला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
****
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच इतर मागास
प्रवर्ग - ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत प्रदेश भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत
बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता ओबीसी समाजासाठी एकही जागा
राखीव असणार नाही, असं सांगत, महाविकास आघाडी सरकारनं आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना
तातडीनं हाती घेतल्या पाहिजे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. ओबीसी समाजासंदर्भात शास्त्रीय
आकडेवारी गोळा करण्याचे काम तातडीनं केलं, तर समाजाला दिलासा देता येईल. यासाठी राज्य
सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.
दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका
म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे,
ते भंडारा इथं बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातून आरक्षण रद्द व्हावं,
असं विधान बिहारच्या निवडणुकीच्या वेळी केलं होतं, आता मात्र भाजप ओबोसीचे हितचिंतक
असल्याचं भासवत आहेत, असं पटोले यांनी नमूद केलं.
****
हाफकिन सह इतर काही लस उत्पादक कंपन्यांना
भारतात आणि महाराष्ट्रात लस उत्पादन करण्याचा प्रस्ताव शासनानं ठेवला आहे. तसंच गरज
पडल्यास जागतिक बाजार पेठेतून लसी घेण्यासाठी ही शासनाचा पुढाकार असल्याचं राज्याचे
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते.
दरम्यान, उस्मानाबाद इथं नियोजित शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या संभाव्य जागेची पाहणी अमित देशमुख यांनी केली. राष्ट्रीय आरोग्य परिषदेच्या
सूचनेनुसार मान्यतेनुसार आपण चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करत असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
पुणे शहरातल्या हडपसर परिसरात उभारण्यात आलेल्या
पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ऑनलाईन
उद्घाटन करण्यात आलं. कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य
सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे असं उपमुख्यमंत्री
म्हणाले. हैदराबादची लस उत्पादक कंपनी ‘भारत बायोटेक’च्या प्रकल्पासाठी पुण्यात जागा
उपलब्ध करून देण्यात आली असून इथंही लवकरच लसीचं उत्पादन सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात
घेत, राज्य शासनानं बालरोग तज्ज्ञांचं कृती दल तयार केलं आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत
इतर संगर्सजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबतही नागरिकांनी दक्ष रहावं अशा सूचना उपमुख्यमंत्री
पवार यांनी यावेळी केल्या.
****
राज्यात ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत लागू निर्बंध
येत्या १५ जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. परभणी तसंच हिंगोली जिल्हा प्रशासनानं जिल्हांतर्गत
सुधारित आदेश जारी केले. हिंगोली जिल्ह्यात ई-कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू
राहतील. जिल्ह्यातील APMC बाजार, कृषी संबंधित सर्व दुकाने, वाहन दुरुस्ती दुकाने,
कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा इत्यादी दुकानं आणि आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी
६ वाजेपर्यंत चालू राहतील. परभणी जिल्ह्यात शेतीशी संबंधित दुकानं आठवड्याचे सर्व दिवस
सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी राहील. दोन्ही जिल्ह्यात अत्यावश्यक
सेवांची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात नऊ कोविड बाधित
रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या
आता १ हजार २० झाली आहे. दरम्यान, आज ३४ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या
आता ६० हजार १३६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ३८६
रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५७ हजार ३१२ रुग्ण या आजारातून
बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या १ हजार ८०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
रुग्णालय घाटीत आज आठ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी एक रुग्ण अहमदनगर जिल्ह्यातला
तर सात रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. दरम्यान, घाटी रुग्णालयात आज सकाळी ३८ नवे
कोविडरुग्ण दाखल झाले.
****
बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले ५१६
नवे रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक २१८ रुग्ण बीड तालुक्यात, त्या खालोखाल पाटोदा तालुक्यात
५८, आष्टी ५७, गेवराई ४९, शिरूर तसंच माजलगाव प्रत्येकी २६, केज तसंच वडवणी प्रत्येकी
२२, अंबाजोगाई १८, धारूर १४ तर परळी तालुक्यात आज ६ नवे कोविडबाधित रुग्ण आढळले.
****
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जालना
जिल्ह्याकरिता आज, २० नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातल्या २० प्राथमिक
आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिकांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य
अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात आज सुरू असलेल्या एका विवाहसोहळ्यावर
कारवाई करत, दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुंदा पोलीस ठाण्याच्या
हद्दीत शिरड शहापूर इथं कोरोना प्रतिबंधाचे नियम डावलून, कोणत्याही प्रकारची परवानगी
न घेता, हा विवाह सोहळा सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकानं त्या ठिकाणी
जाऊन वधु वरासह २०० वऱ्हाड्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी दहा जणांना ताब्यात
घेतलं असून, लग्नाचं व्हिडिओ शुटिंग पाहून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.
****
मराठा आरक्षणासाठी शिवसंग्रामच्या वतीनं येत्या
पाच जूनला पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे
यांच्या नेतृत्वात बीड इथं निघणाऱ्या मोर्चाच्या धर्तीवर पुण्यात प्रतिकात्मक आंदोलन
करणार असल्याचं, शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत
सांगितलं. न्यायालयाचा निर्णय होऊन, महिना होत आला, तरी देखील राज्य सरकार कोणत्याही
प्रकारची भूमिका मांडत नाही, असं काकडे म्हणाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित
अंतरासह सर्व नियमांचं मोर्चात पालन केलं जाणार असल्याचं, काकडे यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment