Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी कोविड लक्षणे
ओळखून उपचार करावेत - मुख्यमंत्र्यांचे निर्देश
**
कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी - प्रवीण दरेकर यांची
टीका
**
औरंगाबाद जिल्ह्यात १९ तर जालना जिल्ह्यात चार कोविडग्रस्तांचा आज मृत्यू
आणि
**
हिंगोली तसंच औरंगाबाद जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस
****
आगामी
पावसाळ्यात कोविड संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टर्सनी वेळीच कोविड आजाराची
लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
कोविडसंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करतांना
ते आज बोलत होते. या ऑनलाईन परिषदेत जवळपास २१ हजार ५०० डॉक्टर्स सहभागी झाले. दुसऱ्या
लाटेत तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसतोय तर तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त
होऊ शकतात त्यामुळे यादृष्टीने अधिक सावधानता बाळगली पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. कोविड काळात केलेल्या कामांबद्दल मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.
****
कोरोना
विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका विधान
परिषदेतनले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली
तालुक्यातल्या धाड इथं कोविड सुश्रुषा केंद्राचं लोकार्पण दरेकर यांच्या हस्ते आज झालं.
त्यावेळी ते बोलत होते. आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नातून हे केंद्र उभं करण्यात
आलं आहे.
****
मराठा
समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत या समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी तीन हजार कोटी
रुपयांचं पॅकेज द्यावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
यांनी केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. अजित पवार यांनी स्वतःच रस्त्यावर उतरण्याची
तयारी दाखवली, त्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा
समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून द्यावं असं पाटील म्हणाले.
****
ग्रामीण
डाकसेवक नोकरभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली
आहे. कोविड आणि तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची
मुदत १५ दिवसांनी वाढवण्यात यावी, अशी विनंती मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल
यांना, टपाल विभागाचे स्थानीय लोकाधिकार समिती सरचिटणीस अजित परब यांनी केली होती.
जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार
समितीनं केलं आहे.
****
प्रत्येक
विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल असं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी म्हटलं आहे. अमरावती इथल्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षांत समारोहात
ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन
गडकरी, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर
चांदेकर या समारोहात उपस्थित होते. गडकरी यांचं व्यक्तित्व तसंच कर्तृत्व प्रेरणादायी
आहे, अशा शब्दांत राज्यपालांनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.विद्यापीठाने अशी व्यक्तिमत्त्व
घडवून देशाचं नाव उंचवावं, असं राज्यपाल म्हणाले. या दीक्षांत समारंभात ११० सुवर्णपदकं,
२२ रौप्यपदकं, २२ रोख पारितोषिकं तसंच ३१६ पीएच.डी. अर्थात आचार्य पदव्या प्रदान करण्यात
आल्या.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधक लसींचं वितरण आणि उपलब्धता सुयोग्य व्हावी, यासाठी केंद्र सरकार सातत्याने
लस उत्पादकांच्या संपर्कात आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.
भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सीन लसीची उत्पादन क्षमता जुलै-ऑगस्ट महिन्यात सहा-सात पटींनी
तर सप्टेंबर महिन्यात ही क्षमता दहा कोटी मात्रांपर्यंत वाढेल, अशी माहिती मंत्रालयानं
दिली आहे.
****
कोविड
संसर्गामुळे आईवडील किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झालेल्या बालकांची माहिती बाल स्वराज
पोर्टलवर देण्याचं आवाहन राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं राज्य सरकारांना केलं
आहे. संरक्षण आणि देखभालीची आवश्यकता असलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी कार्यरत या
पोर्टलवर आयोगानं कोविड केअर नावाने एक लिंक दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या लिंकवरून
बालकांची माहिती भरणं अपेक्षित आहे.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावर तसंच फेसबुक आणि यू ट्यूबवरही आपण ऐकू शकता
****
औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज १९ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५, अहमदनगर जिल्ह्यातल्या तीन, आणि जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद
जिल्हयात कोविड संसर्गानं आतापर्यंत तीन हजार १५० रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातल्या
एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता एक लाख ४१ हजार ७५० झाली असून चार हजार १६०
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना
जिल्ह्यात आज दिवसभरात चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार आठ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात
७२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ११ झाली आहे. उपचारानंतर
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ३९९ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत
जिल्ह्यातले ५६ हजार ४३७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या दोन हजार
५६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या औंढा तसंच कळमनुरी तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
औंढा शहरांत अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, यामुळे घरातल्या वस्तुंचं मोठं नुकसान
झालं. अनेक भागात वीजवाहक ताराही तुटल्या आहेत. कळमनुरी तालुक्यातही आखाडा बाळापूर,
नांदापूर, दांडेगाव या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.उस्मानाबाद इथंही आज दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जवळपास अर्धा तास पाऊस
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद
शहरातल्या आणि परिसरातल्या काही भागात आज पाऊस झाला. शहरातल्या पडेगाव परिसरात धुळे
सोलापूर महामार्गावर गॅस घेवून जाणाऱ्या एका ट्रकवर वडाचं झाडं उन्मळून पडल्यानं वाहतूक
काही काळ खोळंबली होती. जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण तालुक्यातही पाऊस
झाल्याचं वृत्त आहे
दरम्यान,राज्यात
बीड, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
****
कोविडग्रस्त
रुग्णांच्या उपचारासाठी रोटरी क्लब लातूरच्यावतीनं देण्यात आलेल्या २५ प्राणवायू कॉन्स्ट्रेटरचं
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. कोविड१९ प्रादुर्भावाचं
संकट अद्याप टळलं नसून जो पर्यंत संपूर्ण लसीकरण होणार नाही तो पर्यंत नागरिकांनी मार्गदर्शक
नियमावलींचं पालन करावं असं आवाहन देशमुख यांनी यावेळी केलं.
****
दिव्यांग
कल्याण निधी खर्च न करणारी परभणी जिल्हा परिषदेची समाज कल्याण समिती तत्काळ बरखास्त
करुन अराजकीय समाज कल्याण समिती स्थापन करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने
जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. २०२०-२१ साठीचा निधी मार्च महिन्यापर्यंत
खर्च न केल्याने जिल्ह्यातील अनेक दिव्यांग सक्षमीकरणापासुन वंचित राहिले असून ही अत्यंत
गंभीर बाब आहे असं पक्षानं म्हटलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या घटली असून जिल्हा अतिसंवेदनशील क्षेत्र
रेड झोनमधून बाहेर पडला आहे, त्यामुळे येत्या १ जूनपासून जिल्ह्यातले निर्बंध शिथील
केले जाऊ शकतील असे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
****
सोलापूर
जिल्ह्यात सध्या म्यूकरमायकोसिस काळी बुरशी आजाराचे १५३ रुग्ण उपचार घेत आहेत. या आजाराचा
वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या ३१ मे ते ५ जून दरम्यान विशेष मोहीम राबवून कोरोनामुक्त
नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
****
इंडियन
प्रीमिअर लीग – आयपीएलचे यंदाच्या सत्रातले उर्वरित सामने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात
संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआयच्या ऑनलाईन
बैठकीत सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला संमती दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
//***************//
No comments:
Post a Comment