Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
May 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा
आणि सुरक्षित रहा.
कोविड -१९ शी संबंधित अधिक
मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत केंद्राशी किंवा ०२०- २६१२७३९४
या राज्यस्तरावरच्या मदत केंद्राशी संपर्क करू शकता
****
**
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत
भारत विजयी होईल - मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त
**
केंद्र सरकारकडून आपत्कालीन पत हमी योजनेच्या व्याप्तीत वाढ
**
खतं आणि बी-बियाणांचा पुरवठा वेळेत करण्यासाठी कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनानं प्राधान्यानं
काम करण्याची कृषी मंत्री दादा भुसे यांची सूचना
आणि
**
कोविड प्रतिबंधासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या अंजनवाडा गावाचा अनोखा उपक्रम
****
जागतिक साथीच्या काळात भारत 'सेवा आणि सहकार्याचा'
संकल्प घेऊन मार्गक्रमण करत असून कोरोना विषाणू
विरुद्ध सुरु असलेल्या या लढाईत भारत विजयी होईल, असा
विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज मन की बात या
कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधत होते. या कठीण आणि अवघड परिस्थितीमध्ये चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यांतल्या नागरिकांनी अतिशय धैर्यानं, या
आपत्तीला तोंड दिलं त्याबद्दल त्यांनी नागरिकांचं कौतुक केलं.
देशात दर दिवशी ९०० मेट्रिक टन द्रवरुपी वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होत होती. ती आता प्रतिदिन ९ हजार ५००
मेट्रिक टनावर पोहचली असल्याचं सांगत, ऑक्सीजन टँकर चालक
दिनेश उपाध्याय, ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वे चालवणारे लोको पायलट शिरीषा गजनी, हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन पटनायक यांच्याशी संवाद साधत पंतप्रधानांनी
कृतज्ञता व्यक्त केली.
कृषी-क्षेत्रानं केलेल्या अन्नधान्याच्या
विक्रमी उत्पादनामुळे प्रत्येक देशवासियाला आधार देण्यास देश सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं.
आपल्या
७ वर्षांचा कार्यकाळाबाबत बोलताना, जे साध्य
झाले आहे ते देशाचे आणि देशवासियांचे असून या काळात आपण 'टीम इंडिया' म्हणून काम केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता
पक्षाच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे कोविड योद्ध्यांचा सत्कार तसंच कोविड निगडित सहायता कामं करण्यात
आली.
उस्मानाबाद इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या
हस्ते डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालय परिसरात कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना
जेवणाचे डबे पुरवणारे सामाजिक कार्यकर्ते, रुग्णवाहिका चालक, पोलीस कर्मचारी, पत्रकार
यांना गौरवण्यात आलं.
या
कार्यक्रमानंतर बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी, नागरिकांना कोविड प्रतिबंधाचे
नियम पाळण्याचं, तसंच लस घेण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
मास्कचा वापर, अंतर ठेवण
आणि वारंवार हात धुणं याचा विषय जो आहे. तो मात्र मनात ठेवण गरजेच आहे. कारण अजूनही
तिसरी लाट येईल म्हणतात. आपण काळजी घ्या. जून महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध
होत आहे. आणि जुलै, ऑगस्ट नंतर तर आपल्याला कुठलीच लसीच्या बाबतीत अडचण जाणवनार नाही.
त्यामुळे आपला जेव्हा टर्म येईल, आपण जरुर लस घ्या ही देखील विनंती आपल्या सर्वांना
या निमित्ताने करतो.
****
सबका
साथ सबका विकास, कार्यक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यासह मोठमोठी आश्वासने देऊन
केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातल्या जनतेचा पूरता भ्रमनिरास केला असल्याची
टीका काँग्रेस नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.
ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात
देश अनेक वर्ष मागे गेला, महागाईने उच्चांक गाठला, जनतेची केविलवाणी स्थिती निर्माण
झाली असल्याचं देशमुख यांनी नमूद केलं. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथं काँग्रेस
कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली. नाशिक, सोलापूर, धुळे, वाशिम इथंही
काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारविरोधात निदर्शनं केली.
****
केंद्र
सरकारने आपत्कालीन पत हमी योजनेची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेअंतर्गत आता रुग्णालयं,
तसंच वैद्यकीय महाविद्यालयांना प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांपर्यंतच्या
कर्जावर १०० टक्के हमी कवच सरकारनं दिलं आहे. या कर्जावर साडे सात टक्के दरानं व्याज
आकारलं जाईल. या योजनेअंतर्गत कर्जवाटपाला ३१ डिसेंबरपर्यंत परवानगी असेल. नागरी हवाई
वाहतुक क्षेत्रही या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत कर्ज घेण्यास पात्र असेल, असं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खतं आणि बी-बियाणांचा पुरवठा वेळेत
व्हावा यासाठी कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनानं प्राधान्यानं काम करण्याची सूचना,
कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद विभाग कृषी विभागाच्या खरीप
हंगाम आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला रोजगार तसंच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे,
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कृषी सचिव एकनाथ डवले, यांच्यासह लोकप्रतिनिधी तसंच
औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित
होते. जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे या बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
सहभागी झाले. गावपातळीवर रासायनिक खतांची बचत १० टक्क्यांपर्यत करण्याबाबत उपक्रम राबवला
जात आहे. यामुळे शेतीची उत्पादक क्षमता वाढली असून सेंद्रीय खत वापरास चालना दिली जात
असल्याचं भुसे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरण्यास प्राधान्य द्यावं,
बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी कृषी विभागाने शेतीशाळा त्याचप्रमाणे विविध उपक्रम
राबवून बियाणांचा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असंही कृषीमंत्र्यांनी
सांगितलं.
या
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना भुसे यांनी, खत तसंच बि, बियाणांची कमतरता भासणार
नाही, युरीया आणि, इतर खतं वाढीव प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री
पिक विमा प्रस्तावाबाबत राज्यमंत्री सत्तार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातल्या संबंधित
प्रकरणाची वरिष्ठस्तरावरुन पथक पाठवून चौकशी केली जाईल, तसंच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर
कारवाई करण्यात येईल असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं.
****
ग्रामस्थांची
कोरोनाबाबतची भीती घालवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील अंजनवाडा गावचे
तरुण सरपंच किरण घोंगडे यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. जेमतेम पंधराशे लोकसंख्या असलेल्या
गावात कोरोना चाचणी करून घेणाऱ्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या मार्फत विमा काढला
जातो. संबंधिताना पाच लाख रुपयांचं विमाकवच देऊन कोरोना चाचणी करून घेण्यासाठी प्रोत्साहित
केलं जातं. या उपक्रमामुळे अधिकाधिक नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यामुळे
कोरोनाची दुसरी लाट वेशीवरच थोपवण्यास अंजनवाडा गावात यश मिळालं. जनजागृतीचा हा अंजनवाडा
पॅटर्न जिल्हाभरात राबवण्याच्या सूचना देणार असल्याचं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी
सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद
इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत आज १८ कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. यामध्ये एक रुग्ण अहमदनगर जिल्ह्यातला तर उर्वरित १७ रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले
आहेत. दरम्यान, आज सकाळी घाटीत कोविडसंसर्ग झालेले नवे २९ रुग्ण दाखल झाले, तर कोविड
संसर्गातून मुक्त झालेल्या २० रुग्णांना आज घाटी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
जालना
जिल्ह्यात आज दिवसभरात तीन कोविडबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं
दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ११ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ९१ नवीन
रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार १०२ झाली आहे. उपचारानंतर
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ४८९ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत
जिल्ह्यातले ५६ हजार ९२६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
****
बीड
जिल्ह्यात आज ५०९ नवे कोविडग्रस्त आढळले, यापैकी सर्वाधिक १२१ रुग्ण बीड तालुक्यात
आढळले, त्या खालोखाल आष्टी तालुक्यात १०२ रुग्ण, केज ५४, गेवराई ४८, पाटोदा ३८, माजलगाव
३७, शिरूर ३२, अंबाजोगाई ३१, वडवणी २१, धारूर १७, तर परळी तालुक्यात आज आठ नवे रुग्ण
आढळले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड बाधितांची
संख्या मोठ्या
प्रमाणात घटत असल्यानं टाळेबंदीचे निर्बंध येत्या एक जूनपासून शिथिल करावेत, अशी मागणी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी
केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदन
सादर केलं
आहे. दोन महिन्यांपासून राज्यात अत्यावश्यक सेवेशिवाय
अन्य दुकानं
बंद असल्यानं व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे
निर्बंध शिथिल करण्याची विनंती चव्हाण यांनी या निवेदनात केली आहे.
//*******//
No comments:
Post a Comment