Thursday, 27 May 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २७ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

यास चक्रीवादळ आज झारखंड पर्यंत पोहोचलं आहे. या चक्रीवादळामुळे ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. दोन्ही राज्यांमध्ये मदत कार्य सुरु आहे.

****

लष्कर भरती प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पोलिसांना पुर्ण सहकार्य केलं जाईल, आणि भ्रष्टाचारासारख्या चुकीच्या गोष्टी खपऊन घेतल्या जाणार नाहीत, असं लष्कराच्या दक्षिण विभागाने स्पष्ट केलं आहे. दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नेन यांनी विभागातील कमांडरला, पोलीस तपासात सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

****

व्हॉट्सऍपने नव्या माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ च्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारच्या या नियमावलीमुळे वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येत असल्यानं या नियमांना स्थगिती द्यावी, अशी मागणी व्हॉट्सऍपने केली आहे.

****

बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी मराठवाड्यात राबवलेला आराखडा राज्यभरात लागू केला जाणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ही माहिती देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निर्भया निधीतील रक्कम मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं.

****

 

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं येत्या एक जूनपासून सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

****

परभणी शहरात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एका आस्थापनेला दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकानं काल ही कारवाई केली.

****

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सवंगडी कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी १११ जणांनी रक्तदान केलं.

****

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतानं १२ पदकं निश्चित केली आहेत. भारताच्या संजीत, साक्षी, जास्मीन, सिमरजीत कौर आणि शिवथापाने, उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत, आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

****

No comments: