Sunday, 30 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 May 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० मे २०२ दुपारी १.०० वा.

****

जागतिक साथीच्या काळात भारत 'सेवा आणि सहकार्याचा' संकल्प घेऊन मार्गक्रमण करत असून विषाणू विरुद्ध सुरु असलेल्या या लढाईत भारत विजयी होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधतांना बोलत होते. संकटाच्या या कठीण आणि अवघड परिस्थितीमध्ये चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यांच्या लोकांनी मोठं धाडस दाखवत, अतिशय धैर्यानं, या आपत्तीला तोंड दिलं त्याबद्दल त्यांनी नागरिकांचं कौतुक केलं. देशाची सामूहिक शक्ती आणि सेवा भावना यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला असल्याचं ते म्हणाले.

देशात दर दिवशी ९०० मेट्रिक टन द्रवरुपी वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती होत होती. ती आता प्रतिदीन ९ हजार ५०० मेट्रिक टनावर पोहचली असल्याचं सांगत त्यांनी मन की बात कार्यक्रमात कोविडच्या आव्हानामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करणारे ऑक्सीजन टँकर चालक दिनेश उपाध्याय, ऑक्सिजन एक्सप्रेस चालवणार्या लोको पायलट शिरीषा गजनी, हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन पटनायक यांच्याशी आणि दिल्लीतल्या प्रयोशाळा तंत्रज्ञाशी संवाद साधत कोरोना लढाईत ते करत असलेल्या त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कृषी-क्षेत्रानं या हल्ल्यापासून स्वत:चे संरक्षण करत प्रगती साधून विकास केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनामुळे आपला देश प्रत्येक देशवासियाला आधार देण्यास सक्षम असल्याचं त्यांनी यावेळी बोलतांना नमूद केलं.

या ७ वर्षात जे साध्य झाले आहे ते देशाचे आणि देशवासियांचे असून या काळात आम्ही 'टीम इंडिया' म्हणून काम केलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक नागरिकानं देशाच्या प्रगतीसाठी पावलं उचलण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्व प्रकारच्या परिक्षेत यश मिळात असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

देशात काल १ लाख ६५ हजार ५५३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले तर ३ हजार ४६० रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात काल २ लाख ७६ हजार नागरिक कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या देशात २१ लाख १४ हजार ५०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणात देशानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशात आतापर्यंत २१ कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. काल दिवसभरात ३० लाख ३५ हजारांहून अधिक नागरिकांनी लस घेतली. यात लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या २६ लाख असून ४ लाख लोकांनी दुसरी मात्रा घेतली. काल १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या १४ लाखांहून अधिक नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आणि जवळपास १० हजार लोकांनी लसीची दुसरी मात्रा घेतल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.

****

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काल एकूण २० लाख ६३ हजार ८३९ नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण ३४ कोटी ३१ लाख ८३ हजार ७४८ चाचण्या घेण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.

****

काही खागी रुग्णालयं लक्झरी हॉटेल्ससोबत हातमिळवणी करत करोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणाचं पॅकेज देत असून हे नियमांचं उल्लंघन असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉक्टर मनोहर अग्नानी यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून अधिकाऱ्यांना राष्ट्रीय करोना लसीकरण मोहीम राबवताना नियमांचं योग्य पालन होत असल्याची खात्री करुन घेण्यास सांगितलं आहे.

नियामांनुसार लसीकरण सरकारी किंवा खासगी केंद्र, कामाच्या ठिकाणी, सामाजिक केंद्र, पंचायत भवन, शाळा, कॉलेज, वृद्धाश्रम अशा ठिकाणी केलं जाऊ शकतं. तसंच ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी घराजवळ सोसायटींकडून लसीकरणाचं नियोजन केलं जाऊ शकतं. याव्यतिरिक्त इतर ठिकाणी लसीकरणाचं नियोजन करणं बेकायदेशीर असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

****

भारतीय स्टेट बॅंकेनं खाते नसलेल्या शाखेतून एका दिवसात २५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पैसे काढण्याचा अर्ज कोणत्याही शाखेत देऊन ग्राहक हे पैसे काढू शकतील. याशिवाय धनादेशाद्वारे स्वतःसाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहकांना काढता येणार आहे. बँकेनं एका महिन्यात महानगरातील बचत खातेधारकांसाठी आठ व्यवहार मोफत करण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये पाच व्यवहार हे भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर तर तीन व्यवहार हे दुसऱ्या कोणत्याही बॅंकेच्या एटीएमवर करता येणार आहेत. महानगर वगळता अन्य भागात १० मोफत व्यवहारास परवानगी असणार आहे. यामध्ये ५ भारतीय स्टेट बँकेच्या तर पाच अन्य बॅंकांच्या एटीएमवर हे व्यवहार करता येणार असल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यातील इतर मागसवर्गीय नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र येऊन इतर मागसवर्गीयांचं राजकीय आरक्षण टिकवलं पाहिजे असं पुर्नवर्सन मंत्री आणि ओबीसी नेते विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूर इथं आज पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे उपस्थित होते.

****

याबरोबरच हे बातमीपत्र संपलं, आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी.

 

No comments: