Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र-
आयसीएसई मंडळाच्या १२ वी च्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर, आज सर्वोच्च न्यायालयात
सुनावणी झाली. याचिकेत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी थेट रद्द करण्याची मागणी करण्यात आली
आहे. सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवरील सुनावणी सोमवारी घेणार असल्याचं सांगितलं
आहे. एक जून रोजी सरकार परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेणार असून, सरकारचा निर्णय
कदाचित याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागू शकतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या
विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा, १६ ऑगस्ट २०२१ पासून
घेण्याचे निर्देश, विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
यांनी दिले आहेत. परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती आणि वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या
अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची लेखी आणि प्रात्यक्षिक
परीक्षा, कोविड-19 आजारासंबंधी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सुरक्षिततेचे नियम
पाळून घेण्यात याव्यात, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ई-पास म्हणून
विद्यापीठातर्फे प्रवेशपत्र वितरीत केलं जाणार आहे, जे विद्यार्थी कोविड बाधित असल्यामुळे
लेखी परीक्षेस बसु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याबाबत सर्व संबंधितांशी
चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.
****
कोविड संसर्गामुळे मृत्यू
झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबांसाठी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यास, केंद्र
सरकारनं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत,
प्रत्येक परिवारास पाच लाख रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलं.
****
वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांना
त्यांच्या घराजवळ लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं, केंद्र सरकारनं
नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ६०
वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग व्यक्तिंना लस देण्यासाठी, छोट्या प्रभागामध्ये सार्वजनिक
वास्तूंमध्ये लसीकरण सुविधेची निर्मिती करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिले आहेत.
****
केंद्र सरकारच्या माहिती आणि
तंत्रज्ञान मंत्रालयानं, सामाजिक
संपर्क माध्यमांसंदर्भात लागू केलेल्या नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी, ट्विटरनं तीन महिन्यांची मुदत मागितली आहे. नियमांचं पालन न केल्यास
त्यांच्या मध्यस्थीचा दर्जा जाण्याची शक्यता आहे. आपली कंपनी भारतात लागू असलेल्या
कायद्याचं पालन करण्याचा प्रयत्न करेल, असं ट्विटरनं म्हटलं आहे.
****
रस्ते-महामार्गांच्या
बांधकामात वापरण्यासाठी स्टील आणि सिमेंटवर पर्याय निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असून,
कमी खर्चात महामार्गांचं बांधकाम करणं ही आज देशाची गरज असल्याचं, केंद्रीय महामार्ग
मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आयआयटी तिरुपतीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते
बोलत होते. रस्त्यांचं बांधकाम करताना आठ टक्के उपयोगी नसलेल्या प्लास्टिकचा वापर डांबरी
रस्त्यांमध्ये करण्याबाबत, महामार्ग मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्याचं, गडकरी
यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यवीर
सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं देण्यात येणारा शौर्य पुरस्कार, हुतात्मा कर्नल
बी. संतोष बाबू यांना, आणि समाजसेवा पुरस्कार, पुण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
जनकल्याण समितीला घोषित करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्मारकाच्या
वतीनं, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३८ वी जयंती आज सायंकाळी सात वाजता, दूरदृष्य
प्रणालीच्या माध्यमातून साजरी केली जाणार आहे.
****
राज्य
परिवहन महामंडळातर्फे सुरु करण्यात आलेली मालवाहतूक सेवेची व्याप्ती आणखी वाढवण्यात
येणार आहे. त्यादृष्टीनं आणखी काही एस टी बसगाड्यांचं रूपांतर, मालवाहक गाडीत केलं
जाण्याची शक्यता आहे. मालवाहतुकीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात महामंडळाला अंदाजे
५६ कोटी अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात नदी पात्रालगतच्या शेतीमध्ये अवैध रेतीसाठे आढळल्यास कठोर
कारवाई करण्यात येईल, असा इशारा, जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी दिला आहे. महानगरपालिका, नगरपालिका
आणि ग्रामीण भागात बांधकामाच्या ठिकाणी, अवैध रेतीसाठे कुणाला आढळल्यास, अशा शेतकऱ्यांनी किंवा खाजगी जमीन मालकांनी, संबंधीत
कार्यालयात तात्काळ माहिती कळवावी,
असं आवाहनही इटनकर यांनी केलं आहे.
****
आशियाई
मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळेस विश्वविजेते पद मिळवलेल्या मेरी कोम हिनं,
५१ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. मेरी कोम हिनं मंगोलियाच्या स्पर्धकाचा
चार - एक असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन वेळेस युवा अजिंक्यपद पटकावलेल्या
साक्षी हिनंही, तिच्या गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विजेतेपदासाठी तिचा सामना
आता उझबेकिस्तानच्या सितोरा शोंगदारोवा, हिच्याशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment