Friday, 28 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर सीईटी घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

** कोविड प्रतिबंधासाठी ट्रॅकिंग ट्रेसिंग शास्त्रोक्त पद्धतीने व्हावं - आरोग्य मंत्री राजेश टोपे

** औरंगाबाद जिल्ह्यात आज १८ तर जालन्यात चार कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू

आणि

** स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन

****

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता दहावीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्यानं अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्या आज मुंबई पत्रकार रिषदेत बोलत होत्या. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दहावीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याच नियोजन आहे. अकरावी प्रवेशासाठीची CET दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शिक्षण मंत्री गायकवाड यांनी दिली.

सर्व घटकांशी सखोल चर्चा करून दहावीचं गुणदान धोरण निश्चित केल आहे. अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, गृहपाठ-तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा यांना २० गुण आणि विद्यार्थ्यांचे ९ वीचे विषयनिहाय अंतिम निकालाचे ५० गुण, या आधारे यंदाचं मूल्यमापन करण्यात येणार आहे. निकालासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. निकालांची पडताळणी विभागीय स्तरावर शिक्षण अधिकाऱ्यांकडून केली जाईल. गैरप्रकार किंवा शिस्तभंग झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही विभागानं दिला आहे. ज्यांना हा निकाल समाधानकारक वाटणार नाही, त्यांना कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यावर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देण्याची संधी असेल, असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.

****

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर CBSE आणि ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयान आज दाखल करुन घेतली. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर एकच वस्तुनिष्ठ स्वरुपाची परीक्षा घेतली जावी, आणि तिचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी येत्या ३१ तारखेला होणार आहे.

दरम्यान, बारावीच्या परीक्षेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांकडून सूचना मागवल्या होत्या. २५ मेपर्यंत राज्यांनी आपलं म्हणणं केंद्रसरकारला कळवलं असून अंतिम निर्णय येत्या १ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे.

****

राज्यात कोविड संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी ट्रॅकिंग ट्रेसिंग हे शास्त्रोक्त पद्धतीने होणं आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात कोविड आढावा बैठकीनंतर बोलत होते. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान १५ ते २० लोकांची तपासणी झाली पाहिजे तसंच रुग्णांच्या संस्थात्मक विलगीकरणावर अधिक भर दिला पाहिजे, असं टोपे म्हणाले.

दरम्यान, महिलांच्या मासिक पाळी दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारन उन्नती अभियान राबवणार असल्याचं, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत महिलांसाठी जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, औद्योगिक समूहांनी सॅनिटरी नॅपकिन पॅड्सचं वाटप करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं.

****

कोविड संसर्गामुळे जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना पत्रकार कल्याण योजने अंतर्गत मदत देण्याची विशेष मोहीम, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि पत्र सूचना कार्यालयाने हाती घेतली आहे. या अंतर्गत माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या वर्षात कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या २६ पत्रकारांच्या कुटुंबांना पत्रकार कल्याण योजने अंतर्गत प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला, मान्यता दिली. गेल्या वर्षी अशा ४१ पत्रकारांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली आहे. मदत केलेल्या कुटुंबांची एकूण संख्या आता ६७ झाली आहे. आर्थिक मदतीसाठी प्राप्त अर्जांचा त्वरित निपटारा करण्यासाठी पत्रकार कल्याण योजनेची बैठक दर आठवड्याला घेण्याचा निर्णय या समितीने घेतला आहे.

                                       ****

अभिनेता सुशांत सिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनसीबीने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला हैदराबदहून अटक केली. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. सुशांतने नैराश्यातून कथित आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० तारखेला मन की बात या आकाशवाणी वरच्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा २४ वा भाग असेल. सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल.

                                        ****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज १८ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १२, अहमदनगर चार, जालना आणि जळगाव जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार १४७ रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गांन मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या एक लाख ४१ हजार ७५० झाली असून चार हजार १६० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात चार कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४ झाली आहे. दरम्यान, आज १२० नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ५९ हजार ३९३ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातूनमुक्त झालेल्या ६२० रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५६ हजार ३८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या २८९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज ७०० नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये बीड २५१, गेवराई ८३, केज ६४, आष्टी ५६, शिरुर ५५, पाटोदा ४८, माजलगाव ४६, अंबाजोगाई ३९, वडवणी २३, धारुर २१ आणि परळी इथल्या १४ रुग्णांचा समावेश आहे.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त देश तसंच राज्यभरात त्यांना आज आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटलं आहे.

नाशिक इथं विविध संस्थाच्या वतीनं सावरकरांना अभिवादन करण्यात आलं. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. नाशिकजवळ भगूर या सावरकरांच्या जन्मगावी स्थानिक नागरिकांनी आरोग्य नियमांचं पालन करून सावरकर यांना अभिवादन केलं. सावरकरांनी रचलेल्या गीतांचा कार्यक्रम ही या ठिकाणी घेण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून ३१ मेच्या सकाळपर्यंत सप्ताहांत टाळेबंदी लागू राहणार आहे. या काळात किराणा, भाजीपाला आणि फळविक्री बंद राहणार आहे. कृषी निविष्ठा तसच सहाय्यभूत सेवा देणाऱ्या आस्थापना सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत तसंच दूध विक्रीला सकाळी नऊ वाजेपर्यत परवानगी देण्यात आली आहे.

****

सांगली इथं डिज्ने वर्ल्डच्या धर्तीवर बाल कोरोना उपचार केंद्र उभारण्यात आलं आहे. या कोरोना केंद्रात प्रवेश केल्यावर डिज्ने वर्ल्ड मध्ये आल्याचा भास होतो. एखाद्या अंगणवाडी प्रमाणे असलेल्या या केंद्रात कार्टून चित्र, खेळणी, तसंच भिंतीवरही बोलकी चित्र रेखाटण्यात आली आहेत. सांगलीचे काँग्रेस नगरसेवक अभिजित भोसले यांनी हे महाराष्ट्रातलं पहिलं बाल कोविड केंद्र साकारलं असून या ठिकाणी सध्या ५ बालकांवर उपचार सुरु आहेत.

//*************//

No comments: