Tuesday, 25 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** औष्णिक वीज प्रकल्पात इंधन म्हणून कोळशाऐवजी जैव इंधनाचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय मिशनची स्थापना

** तौक्ते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत - मुख्यमंत्र्यांची घोषणा

** ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनच्या ६० हजार कुप्या जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार

आणि

** औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज दहा कोविड बाधितांचा मृत्यू

****

औष्णिक वीज प्रकल्पात इंधन म्हणून कोळशाऐवजी बायोमास अर्थात जैव इंधनाचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय मिशन स्थापण्याचा निर्णय केंद्रीय उर्जा मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे शेतातील पेंढा जाळल्यानं होणारं वायू प्रदूषण आणि औष्णिक वीज प्रकल्पातील कार्बन उत्सर्जन कमी होऊन उर्जेचे स्थित्यंतर आणि स्वच्छ उर्जेच्या स्रोतांकडे वाटचाल या उद्दीष्टांना यामुळे बळ मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या राष्ट्रीय मिशनसाठी उर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक सुकाणू समिती स्थापन केली जाईल. नियोजित राष्ट्रीय मिशनचा कार्यकाळ किमान पाच वर्षांचा असेल. या मिशनसाठी उप - गट देखील स्थापन केले जाणार आहेत. हे मिशन, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातही योगदान देणार आहे.

****

तौक्ते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. २१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा करून तौक्ते चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता, आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल, कुणालाही वंचित ठेवणार नाही असं आश्वासन दिलं होतं. ्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आज ही ोषणा केली.

****

राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोविडसह म्युकर मायकोसिसच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली, त्यात उपमुख्यमंत्री बोलत होते

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द करावी, ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बाधितांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, असं पवार यांनी सांगितलं. पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी तसेच गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्चासाठी मंजूरी देत असल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

म्युकरमायकोसीस या आजारावरील उपचारासाठी आवश्यक ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनच्या ६० हजार कुप्या जूनच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते आज मुंबईत माध्यप्रतिनिधींशी बोलत होते. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना विषाणू चाचणीचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे २ हजार २४५ रुग्ण आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचे नियंत्रण केलं जात आहे. राज्यात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावं यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली असून त्यामाध्यमातून जुनच्या पहिल्या आठवड्यात या कुप्या उपलब्ध होणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

रायगड जिल्हा ऑक्सीजन हब झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्मिती केली जात असून अन्य जिल्ह्यांनाही इथून प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. रायगड जिल्हा सामान्य रूग्णालयात उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मीती प्रकल्पाची माहिती देत आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने….

सदरील प्लॉंट हा ३०० लीटर कपॅसिटी म्हणजे सात जम्बो सिलिंडर चोविस तासात तयार होतात. असा हा ३०० लीटर कपॅसिटीचा पीएसए प्लॉंट इंन्सटॉल झालेला आहे.त्याचा टेस्ट रिर्पोट आपल्याला मिळालेला आहे.त्यानुसार  ९३.३१ टक्के त्यामध्ये ऑक्सीजन आहे. टेस्ट रिर्पोट चांगला असल्यामुळे आपण हा कार्यान्वित करत आहोत. कार्यान्वित करण्यासाठी त्याला जनरेटरचा बॅकअप द्यावा लागतो.रायगड जिल्ह्यासाठी आणि सर्व शासकीय रुग्णालयांसाठी हा प्लॉंट जीवनदायी आहे. कोविड पर्यंत नक्कीच त्याला महत्व आहे. आणि अशा पद्धतीनं आपण आपलं ऑक्सीजन उत्पादन वाढवू शकतो.

 

****

कोविड रुग्णांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडिसीवीर औषधीच्या बुलडाणा आणि  खामगाव इथं झालेल्या काळाबाजाराची माहिती मागवून रुग्णांना न्याय मिळवून देणार असल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातच काळाबाजार झाला असून याप्रकरणाचा तपास संथगतीनं सुरु असल्याचं त्या म्हणाल्या.

****

पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुस्तकातल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे कुबेर यांनी माफी मागावी असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

****

राज्यातल्या वाघांच्या संख्येत वाढ झाली असून ती ३१२ झाली आहे. चंद्रपूरच्या अभयारण्यात सर्वाधिक वाघ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल वनविभागाची प्रशंसा केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या अभयारण्याजवळील दोन गावांचं पूनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

****

बुद्धपौर्णिमा उद्या साजरी होत आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. देश लवकर कोरोनामुक्त व्हावा अशी प्रार्थना करत असल्याचं, राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज दहा कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामृतांमध्ये औरंगाबाद इथल्या एका म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराच्या रुग्णाचाही समावेश असल्याचं घाटी प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात आज ७९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २१० रुग्ण बीड तालुक्यात, गेवराई तालुक्यात ६९, केज ८३, आष्टी ९७, अंबाजोगाई ४४, शिरुर ५०, परळी २६, पाटोदा ४५, धारुर ५८, माजलगाव ४, आणि वडवणी तालुक्यातल्या २२ रुग्णांचा समावेश आहे.

****

नांदेड शहरातील श्री गुरू गोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयातील कोरोना रूग्णाच्या नातेवाईकांना शिदोरी उपक्रमाअंतर्गत गोदावरी उद्योग समुहाच्यावतीनं गेल्या ५ मे पासून दररोज जेवण दिलं जात आहे. दररोज ४०० ते ४५० नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. मागील वीस दिवसात जवळपास आठ हजार नागरिकांना भोजन मिळाल्याचं आमच्या  वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मुंबईतील अन्नदा संस्था आणि तुळजापूर नळदुर्ग भागातील परिवर्तन सामाजिक संस्था यांनी नळदुर्ग शहरातील विधवा, निराधार,परित्यक्ता, एकल महिला तसंच गोरगरीब, गरजूंना अन्नधान्य किटचं वाटप केलं. २७२ कुटुंबांना याचा लाभ झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात बँकांनी तत्काळ पीककर्ज वाटप यंत्रणा कार्यन्वित करण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी दिले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्जवाटपाची कोणतीच यंत्रणा उपलब्ध केली नसल्याने, अनेक शेतकऱ्यानी खासदार पाटील यांच्याकडे तक्रार केली होती, त्या पार्श्वभूमीवर खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासोबत बैठक घेऊन, ही सूचना केली

****

 

कर्नाटक राज्यातून औरंगाबादकडे ८० पोते अवैध गुटखा भरून निघालेला ट्रक सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला इथं पकडला. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली

****

लातूर महानगरपालिका आणि वाईज वर्ड ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने 'पर्जन्य जल व्यवस्थापन' या विषयावर उद्या सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे इथल्या एमआयटी विद्यापीठातील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सहयोगी प्राध्यापिका धनश्री मिरजकर या मार्गदर्शन करणार आहेत. इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चैनलवर नागरिकांनी हे व्याख्यानाचा लाभ घ्यावा असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, सचिव डॉ.प्रीती पोहेकर यांनी केलं आहे.

//***************//

No comments: