Monday, 31 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 May 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

तारांकित हॉटेलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याची कृती बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे. देशभरातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये अशा प्रकारची मोहीम सुरु असल्यास ती त्वरित थांबवावी, अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही, देण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, काही तारांकित आणि बड्या हॉटेलनी विशेष लसीकरण पॅकेज सुरु केलं असून, त्यात आरामदायी वास्तव्याबरोबरच मोफत लस दिली जात आहे. अशी लसीकरण मोहीम बेकायदा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अप्पर सचिव डॉ. मनोहर आगनानी यांनी लेखी आदेशाद्वारे स्पष्ट केलं आहे.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. तंबाखूमुळे होणार्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं, १९८७ पासून हा दिवस पाळण्यात येतो.

****

कोविड-19 साथीच्या काळात नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या चार राष्ट्रीय स्तरावरील हेल्पलाईन क्रमांकाची जागरूकता वाढवण्यासाठी खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी पुढाकार घ्यावा, याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड बाबत प्रश्न विचारण्यासाठी १०७५, लहान मुलांसाठीची हेल्पलाईन १०९८, ज्येष्ठ नागरिकांसाठी १४ ५६७, आणि समुपदेशनाबाबत मदतीसाठी, ०८० ४६१ १०० ०७, अशा या चार हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी विविध कार्यक्रमाच्या मध्यंतरात, विशेषतः सर्वाधित प्रेक्षक संख्या असलेल्या वेळेत म्हणजे प्राईम टाईमला, या हेल्पलाईनबद्दल जागरूकता वाढवावी, असं सुचवण्यात आलं आहे.

****

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

कोविड पार्श्वभूमीवर श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी राज्य विमा महामंडळ - ईएसआयसी, तसंच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना- ईपीएफओ योजनांच्या माध्यमातून, अतिरिक्त फायदे जाहीर केले आहेत. ईएसआयसी योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तींने कोविड रोगाचे निदान होण्यापूर्वी, आणि त्या रोगामुळे मृत्यू होण्यापूर्वी ईएसआयसीच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये नोंदणी केली असल्यास, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांनाही समान लाभ दिला जाणार आहे.

****

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी मतदारसंघात कोविड साथरोग संकटात सामाजिक उपक्रमांतून सेवाधर्म सुरू आहे. याअंतर्गत काल २१ कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी देण्यात आला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ७५ कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे.

****

परभणी महापालीकेच्या वतीनं शहरात आणखी तीन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात आता एकूण १२ केंद्रांवर लसीकरण होणार असल्याचं, आयुक्त देविदास पवार यांनी सागितलं.  

****

सातारा शहरात एका लसीकरण केंद्रावर माजी नगरसेवकानं, प्रभागातल्या नागरिकांना लस देण्यासाठी आरोग्यसेवकांवर दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित लसीकरण केंद्रावरच्या आरोग्य सेविकेने तक्रार नोंदवल्यानंतर, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक स्मिता घोडके यांच्यासह सहा जणांविरोधात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

****

नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने लसीकरणाबाबतीत आदीवासींमध्ये असलेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर, आदिवासींच्या बोलीभाषेचा वापर करून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी भागातले नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत, इतकंच नव्हे तर काही गावात लसीकरणासाठी गेलेल्या वैद्यकीय पथकाला परत पाठवण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधून लस किती सुरक्षित आहे, याचे ऑडिओ व्हिडीओ तयार केले जात आहेत, त्यासाठी डांगी आणि अहिराणी या दोन्ही भाषेचा वापर केला जात आहे.

****

कमी प्रवासी संख्येमुळे नांदेड इथल्या दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयांतर्गत असलेल्या काही रेल्वे गाड्या पूर्णतः, तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यात नांदेड-औरंगाबाद - नांदेड आणि सिकंदराबाद - साई नगर शिर्डी या रेल्वेगाड्या १४ जून पर्यंत, नांदेड-आदीलाबाद रेल्वे १५ जून पर्यंत, औरंगाबाद- रेणीगुंठा रेल्वे १२ जून पर्यंत, तर परभणी-नांदेड रेल्वे, १७ जून पर्यंत रद्द करण्यात आली आहे. नांदेड मार्गे तांदूर रेल्वे एक ते पंधरा जूनपर्यंत सिकंदराबाद ते तांदूर रेल्वे स्थानकांदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

****

दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात भारताच्या पूजा राणी हिनं सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं. तर ५१ किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या मेरी कोम हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात काल कझाकिस्तानच्या स्पर्धकानं मेरी कोमवर मात केली.

//***************//

 

No comments: