Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 May
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** तोक्ते चक्रीवादळाच्या
नुकसान भरपाईपोटी २५० कोटी रुपये पॅकेज देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** बहुजन समाजाप्रमाणे मराठा समाजाला न्याय द्या -
आरक्षणप्रकरणी खासदार संभाजीराजे यांची मागणी
** केंद्र सरकारच्या
शेतीविषयक धोरणाचा संयुक्त किसान सभेसह अन्य संघटनांकडून काळा दिवस पाळून निषेध
आणि
** कोविड नियमांचं पालन
करून बुद्ध पौर्णिमा साजरी; माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ७६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
****
तोक्ते
चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईपोटी २५० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला आहे. उद्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर या बाबतचा शासन निर्णय जाहीर
करण्यात येईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्यात सात जिल्ह्यांत चक्रीवादळाचा परिणाम झाला. या सर्व ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती
निवारण दल - एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. भविष्यातील वादळांचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय
झाला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीजवाहक तारा टाकण्यात येणार
आहेत, निवारेही बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली
****
बहुजन समाजाप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळावा अशी
मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली
आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २७ ऐवजी
२८ तारखेला आपली भूमिका स्पष्ट
करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा
आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार आणि विरोधी पक्ष नेत्यांना आपण भेटणार असून मराठा समाजाला
न्याय मिळवून देणं
हीच आमची भूमिका आहे आणि वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरु अशी भूमिका
संभाजीराजांनी पत्रकार परिषदेत मांडली. इतर मागास प्रवर्ग - ओबीसीला
दुखवून मराठा समाजाला आरक्षण मागण्याची आपली भूमिका नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले...
मी शाहू महाराजांचा वंशज
आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे. मी केंव्हाही असं म्हणू शकत नाही की ओबीसीला दुखवून
मराठा समाजाला त्यात घाला. अन्याय झाला मराठा समाजावर पण याचा अर्थ असा नाही की बहुजन
समाजाचे जे लोक आहेत अनुसूचती जाती - जमाती, ओबीसी यांना दुखवून आपण काय ते आरक्षण
मागावं एकंदरीत २८ तारखेला २७ चं नाही आता मी एक दिवस पुढे ढकलेलं आहे. कारण ते लोक
एव्हढे भेटायला लागलेत अनेक लोकांची इच्छा आहे. जी ही सगळ्या आपल्या समाजातल्या लोकांनी
जी ही भुमिका मांडली आहे. ती त्या दिवशी मांडण्याचा प्रयत्न करेल.
सरकारनं
दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल पण ही आंदोलनाची वेळ नाही. ७० टक्के समाज
गरीब आहे. त्यांच्यासाठी काय करणार हे सरकारनं सांगावं, त्याचवेळी मराठा समाजाच्या
मुद्द्यांना कोणीही राजकीय रंग देऊ नये, असं आवाहनही खासदार संभाजीराजे यांनी केलं.
*****
बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निर्भया निधीतील रक्कम
मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती
महिला आणि बालविकास मंत्री विधिज्ञ
यशोमती ठाकूर यांनी दिली. या
संदर्भात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमाद्वारे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत
होत्या. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड आणि
हिंगोली या जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विशेष कृतीदल स्थापन करून
प्रायोगिक स्तरावर काम करण्यात आले. हाच आराखडा या वर्षी संपूर्ण राज्यात सुरु
करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
केंद्र
सरकारच्या शेतीविषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी संयुक्त किसान सभा, संयुक्त किसान मोर्चा
आणि मजूर संघटनांच्या वतीनं आज काळा दिवस पाळण्यात आला. या संघटनांच्या पदाधिकारी तसंच
सदस्यांनी घरावर काळे झेंडे फडकवून सरकारचा निषेध केल्याची माहिती, किसान सभेचे राज्य
सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी दिली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आयटक, लाल बावटा, शेतमजूर युनियन आणि इतर संघटनांच्या वतीनं हे निषेध आंदोलन
करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात १२९ गावामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसंच
प्रहार सैनिकांनी आपल्या घरावर काळा झेंडा लावून केंद्र सरकारचा निषेध केला
****
बचत गटांच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होत असतानाच,
महिलांची फसवणूक होण्याचे प्रकारही होत आहेत,
त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत विधान परिषदेच्या
उपसभापती डॉक्टर नीलम
गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर महेंद्रकुमार
मेश्राम लिखित ‘स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांची वाटचाल’
या पुस्तकाचं प्रकाशन डॉ. गोऱ्हे यांच्याहस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात महिला अधिकारांच्या लढ्यासाठी उभ्या राहिलेल्या चळवळीनं बचतगट आणि महिला अधिकारांची योग्य सांगड घातली, असंही
गोऱ्हे यांनी नमूद केलं.
****
बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजभवन इथं बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण
करून अभिवादन केलं. कोरोना विषाणूच्या संकटकाळात भगवान बुद्धांची करुणा आपल्या मनी बाळगावी असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. यावेळी बौध्द धर्मगुरु भिक्खूंना चीवरदान करण्यात आलं. राज्यात
सर्वत्र कोविड नियम पाळून बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांना आदरांजली वाहण्यात
आली.
परभणी इथं भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखेतर्फे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं
पालन करून उपसामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात आलं.
****
राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आज ७६ व्या जयंतीनिमित्त
अभिवादन करण्यात आलं. लातूर नजिक बाभळगाव
इथल्या विलासबागेत वैशालीताई देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विलासरावांच्या
प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
जातीधर्माच्या पलीकडे सर्वसमावेशक राजकरणाचं उत्तम उदाहरण विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं, असं मत, माजी कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त
केलं आहे. औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विलासराव देशमुख जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते
बोलत होते. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी केलेल्या भाषणात विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने अद्ययावत डिजिटल स्टुडिओ
उभारण्यात आला असून त्याचं लवकरच लोकार्पण होणार असल्याचं
सांगितलं.
****
औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज १६ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या ११, अहमदनगर जिल्ह्यातल्या तीन, लातूर आणि जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णांचा
समावेश आहे. या मृत पावलेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर आणि लातूर इथल्या प्रत्येकी एका
म्यूकरमायकॉसिसच्या रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या एक लाख ४१ हजार १३३ झाली
असून पाच हजार १२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गानं
आतापर्यंत तीन हजार १७ रुग्ण दगावले आहेत.
****
जालना
जिल्ह्यात आज दिवसभरात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ९९७ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात
२१२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ५९ हजार ७३४ झाली आहे.
उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ३७४ रुग्णांना आज सुटी देण्यात
आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५५ हजार २४० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित
असलेल्या तीन हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड
जिल्ह्यात आज ७०३ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, यामध्ये सर्वाधिक २२६ रुग्ण बीड तालुक्यात
आढळले, त्या खालोखाल आष्टी तालुक्यात ९२, गेवराई ६६, केज ६४, शिरूर ६३, पाटोदा ४६,
अंबाजोगाई ४२, वडवणी ३३, माजलगाव ३०, धारूर २५, तर परळी तालुक्यात आज १५ नवे कोविडबाधित
रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या म्युकरमायकोसिस या रोगावर उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना
आवश्यक तेवढे ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन मिळण्यासाठी संबंधित शासकीय संकेतस्थळावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती नियमितपणे
अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज संबंधितांना दिले.
म्युकरमायकोसिस बाबत आढावा बैठकीत ते आज बोलत होते. या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारावरच शासनाकडून आवश्यक
इंजेक्शनचा पुरवठा होणार असून यासाठी संबंधित यंत्रणेच्या संपर्कात राहण्याचे निर्देशही चव्हाण
यांनी यावेळी दिले.
//**************//
No comments:
Post a Comment