Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
पाकिस्तान, बांगलादेश आणि
अफगाणीस्तानचं नागरिकत्व असणाऱ्या, पण अनेक वर्षे भारतात गुजरात, राजस्थान, छत्तीसगड,
हरियाणा आणि पंजाब या राज्यातल्या १३ जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या, विविध अल्पसंख्यांक
नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी, अर्ज करण्याच आवाहन, केंद्र सरकारनं केलं
आहे. नागरीकत्व अधिनियम १९५५ नुसार हा आदेश लागू करण्यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयानं
अधिसूचना जारी केली आहे.
****
कोविडसंदर्भात उपयोगात येणारी
औषधं, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक
सवलत देण्यात यावी, अशी मागणी, अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांच्याकडे केली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची ४३वी बैठक काल केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी पवार यांनी मागणी
केली. केंद्र सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या इंधनावरील विविध उपकर आणि अधिभारांच राज्यांना
सुयोग्य वाटप व्हावं, कोरोना संकटाचा सामना करण्याबरोबरच राज्यांचे अर्थचक्र सावरण्यासाठी
केंद्राकडून मदत आणि सकारात्मक सहकार्याची अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
म्यूकरमायकोसिस म्हणजे काळ्या
बुरशीवरील औषधांवरील सीमा शुल्क तसंच वस्तू आणि सेवा करावर देण्यात आलेल्या सवलतींना
मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सीन लसीची उत्पादन क्षमता जुलै-ऑगस्ट
महिन्यात सहा ते सात पटींनी वाढवण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारतच्या मिशन कोविड
सुरक्षा अंतर्गत कोव्हॅक्सीनची उत्पादन क्षमता वाढवली जाणार आहे. जैव तंत्रज्ञान
विभागाद्वारे हे अभियान राबवलं जात आहे.
****
राज्यातल्या
ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आणि त्याला १५
वर्षे झाली आहेत, अशांनी जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घ्यावी, असं आवाहन आरोग्य
विभागानं केलं आहे. यामध्ये १९६९ पूर्वीच्या जन्म नोंदणींचा देखील समावेश असल्याचं
आरोग्य विभागानं सांगितलं.
****
राज्यात
३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती, क्रिडामंत्री
सुनील केदार यांनी दिली. केदार यांनी काही दिवसांपूर्वीच नवी दिल्ली इथं केंद्रीय क्रीडा
मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन, महाराष्ट्रातलं क्रीडा धोरण आणि आंतरराष्ट्रीय
क्रीडा विद्यापीठाबाबत चर्चा केली होती. देशभरात सर्वत्र क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध
व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने, क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया
केंद्र सुरू करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून तीन कोटी ६० लाख इतकं अर्थसहाय्य
प्राप्त होणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारला
उद्या ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
गावांमध्ये कोरोना निवारणासाठी सेवाकार्य करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष नितीन काळे
यांनी ही माहिती दिली. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणताही उत्सव होणार नाही, मात्र कोविड
योद्ध्यांचा सत्कार, सेवाकार्य करणाऱ्यांना आवश्यक साहित्य, कोविडमुळे पालक गमावलेल्या
बालकांची १२ वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी, तसंच रक्तदान शिबीरं घेण्यात येणार असल्याचं,
काळे यांनी सांगितलं.
****
पालघर
जिल्ह्यातल्या उमरोळी गावात ग्रामपंचायत, गावातले सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते
आणि ग्रामस्थ या सर्वांच्या लोक सहभागातून १२ खाटांचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं
आहे. कोरोना विषाणूची सौम्य लक्षणं असलेल्या किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी, ज्यांना
गृह विलगीकरणात राहणं शक्यं नाही, अशा रुग्णांसाठी हे सेंटर उभारण्यात आलं आहे. या
सेंटर मध्ये रुग्णांसाठी दोन डॉक्टर्स आणि काही आशा वर्कर्स आपली सेवा देणार आहेत.
****
ज्यादा
दराने खत विक्री करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या सात खत विक्रेत्यांवर कृषी विभागानं
कारवाई केली आहे. यात देवळा तालुक्यातल्या तीन, नांदगाव तालुक्यातल्या दोन, तर मालेगाव
आणि सिन्नर तालुक्यातल्या प्रत्येकी एका विक्रेत्याचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा २४ वा भाग असेल. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
परभणी
शहरात टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरोधात विविध ठिकाणी महानगरपालिका
आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
****
दुबई
इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत अमित पंघाल आणि शिवा थापा
यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंघाल यानं कझाकिस्तानच्या, तर थापा यानं ताजिकिस्तानच्या
प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
*****
No comments:
Post a Comment