Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २९ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन
श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक
नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा,
हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज
सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
दहावीच्या निकालासाठी मूल्यमापन धोरण निश्चित; अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा
**
कोविड प्रतिबंधासाठी शास्त्रोक्त पद्धतीने ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग आवश्यक- आरोग्य मंत्री
राजेश टोपे
**
राज्यात काल नवे २० हजार
७४० कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल ७७ रुग्णांचा मृत्यू तर नव्या दोन हजार ४२ रुग्णांची नोंद
**
उल्हासनगर इथं एका इमारतीचं छत कोसळून सात जणांचा मृत्यू; मदतकार्य सुरू
**
मराठा आरक्षणाबाबत येत्या शिवराज्याभिषेक दिनापर्यंत भूमिका न घेतल्यास, किल्ले रायगडावरून
आंदोलन - खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा
**
जालना इथं रुग्णालयात मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह पाच जण निलंबित
आणि
**
लातूर शहरात १५ ऑक्टोबरपर्यंत पाईपलाईनद्वारे घरगुती वापराचा गॅस पुरवठा सुरु करण्याचे
पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
****
इयत्ता
दहावीच्या निकालासाठी मूल्यमापन धोरण निश्चित केलं आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
यांनी काल ही माहिती दिली. अंतर्गत लेखी मूल्यमापन ३०गुण, गृहपाठ-तोंडी परीक्षा आणि
प्रात्यक्षिक परीक्षा यांना २० गुण आणि विद्यार्थ्यांचे ९ वीचे विषयनिहाय अंतिम निकालाचे
५० गुण, या आधारे यंदा दहावीच मूल्यमापन करण्यात येणार आहे. निकालासाठी शाळास्तरावर
मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल. निकालांची पडताळणी
विभागीय स्तरावर शिक्षण अधिकाऱ्यांकडून केली जाईल. गैरप्रकार किंवा शिस्तभंग झाल्यास
दंडात्मक कारवाईचा इशाराही विभागानं दिला आहे. ज्यांना हा निकाल समाधानकारक वाटणार
नाही, त्यांना कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यावर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार
योजनेअंतर्गत परीक्षा देण्याची संधी असेल, असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान,
यंदा अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा
घेण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितलं. २०२०-२१ या शैक्षणिक
वर्षात दहावीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण
करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याचं नियोजन आहे. अकरावी प्रवेशासाठीची
CET दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
****
कोरोना
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर CBSE आणि ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची
मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल दाखल करुन घेतली. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी
देशपातळीवर एकच वस्तुनिष्ठ स्वरुपाची परीक्षा घेतली जावी, आणि तिचा निकाल निर्धारित
वेळेत जाहीर करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी
येत्या ३१ तारखेला होणार आहे.
दरम्यान,
बारावीच्या परीक्षेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांकडून
सूचना मागवल्या होत्या. २५ मेपर्यंत राज्यांनी आपलं म्हणणं केंद्रसरकारला कळवलं असून
अंतिम निर्णय येत्या १ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
कोविडच्या
तिसऱ्या लाटेत बालकांना असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी काल महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. बालरोग
तज्ज्ञ कृतीदलातले डॉक्टर आणि महिला - बालविकास विभागातल्या अधिकाऱ्यांमध्ये संवाद
घडवून आणावा, अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण होऊन, मार्गदर्शक सुचनांमध्ये त्याचा समावेश
करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
राज्यात
कोविड संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग हे शास्त्रोक्त पद्धतीने
होणं आवश्यक असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात
कोविड आढावा बैठकीनंतर बोलत होते. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान १५ ते २० लोकांची
तपासणी झाली पाहिजे तसंच रुग्णांच्या संस्थात्मक विलगीकरणावर अधिक भर दिला पाहिजे,
असं टोपे म्हणाले.
दरम्यान,
महिलांच्या मासिक पाळी दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारन उन्नती अभियान राबवणार असल्याचं,
आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत महिलांसाठी जनजागृतीपर
उपक्रम राबवावेत, औद्योगिक समूहांनी सॅनिटरी नॅपकिन पॅड्सचं वाटप करावं, असं आवाहन
टोपे यांनी केलं.
****
राज्यात काल २० हजार ७४० कोविड
रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ५६ लाख ९२ हजार ९२० झाली आहे. काल ४२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९३ हजार १९८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६४ शतांश टक्के झाला आहे. काल ३१ हजार ६७१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५३ लाख सात हजार ८७४
रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक २४ शतांश टक्के झाला
आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ८९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन हजार ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर ७७ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये
लातूर जिल्ह्यातल्या २५, औरंगाबाद १८, बीड ११, उस्मानाबाद आठ, हिंगोली पाच,
जालना चार, तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७००
रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ३०९, उस्मानाबाद २८८, नांदेड २०७, परभणी १९१,
लातूर १८८, जालना १२०, तर हिंगोली जिल्ह्यात ३९ रुग्ण आढळून
आले.
****
स्थायी
समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या
खरेदीसाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
जिल्हा
परिषदेच्या स्थायी समितीला ५० लाख रुपयांपर्यंतचे तर जिल्हा परिषदेस ५० लाख रुपयांवरील
खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
****
वीज
महावितरण कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कोविड पार्श्वभूमीवर वैद्यकीय आणि आर्थिक सहायता
करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना उपचार तसंच विलगीकरणाच्या कालावधीची
पगारी रजा मंजूर करण्यात आली असून वेतन श्रेणी तीन आणि चारच्या सर्व कर्मचाऱ्यांना
सॅनिटायझर किट खरेदीसाठी विशेष बाब म्हणून एक हजार रुपये एकदा देण्यात येत आहेत. कोविडसाठी
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम म्हणून ५० हजार रुपये आणि घरी
किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये दिले
जातील. कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपये सानुग्रह
सहाय्य तसंच विम्याचे वीस लाख रुपये अशी एकूण ५० लाख रुपये मदत करण्यात येत आहे.
****
ठाणे
जिल्ह्यात उल्हासनगर इथं एका इमारतीचं छत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला. काल रात्री
ही घटना घडली. या इमारतीत २९ सदनिका आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी बचावकार्य
सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अभिनेता
सुशांत सिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीने
सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला हैदराबदहून अटक केली. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन
सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. सुशांतने नैराश्यातून कथित आत्महत्या केल्याचा अंदाज
आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या रविवारी ३० तारखेला मन की बात या आकाशवाणी वरच्या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा २४
वा भाग असेल. सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
मराठा
आरक्षणाबाबत येत्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनापर्यंत काही भूमिका न घेतल्यास,
किल्ले रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करण्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी
दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही कुठल्याही पक्षाविरोधात
नसून मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांची
आहे असं, त्यांनी नमूद केलं. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणं, राज्यपाल
आणि राष्ट्रपतींमार्फत संसदेत याबाबतचा प्रस्ताव दाखल करणं, आदी उपाय संभाजीराजे यांनी
सांगितले. मराठा समाजाच्या प्रश्नासाठी दोन दिवसांचे अधिवेशन घ्यावं, अशी मागणीही त्यांनी
केली.
****
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र काल त्यांना आदरांजली
अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी
असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटलं आहे.
नाशिकजवळ
भगूर या सावरकरांच्या जन्मगावी स्थानिक नागरिकांनी आरोग्य नियमांचं पालन करून सावरकर
यांना अभिवादन केलं. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
परभणी
इथल्या वीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीनं सावरकर जयंतीनिमित्त ऑनलाईन गायन तसंच वक्तृत्व
स्पर्धा घेण्यात आली. सावरकर रचित गीतगायनातून सावरकरांना अभिवादन करण्यात आलं. परभणी
जिल्ह्यात सेलु इथं नूतन महाविद्यालयात सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आदरांजली
वाहण्यात आली.
औरंगाबाद
इथही सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
जालना
इथं भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना एका खाजगी
रुग्णालयात मारहाण केल्याप्रकरणी, कदीम जालना पोलीस ठाण्यातल्या एका उपनिरीक्षकासह
अन्य चार पोलीस कर्मचाऱ्यांना, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी काल निलंबित केलं.
या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधिताला मारहाण केल्याची चित्रफीत काल समाज
माध्यमांवर पसरली होती. या प्रकरणाची अप्पर पोलीस अधीक्षकांमार्फत चौकशी केल्यानंतर,
मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे,
सुमित सोळंके, महेंद्र भारसाखळे यांना निलंबित करण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणातल्या
दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अहवाल पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आल्याचं देशमुख
यांनी सांगितलं.
****
लातूर
शहराला घरगुती गॅस पुरवठा करण्याबाबतचा संपूर्ण आराखडा तयार करून, १५ ऑक्टोबर २०२१
रोजी ग्राहकांना घरगुती गॅस पुरवठ्याची जोडणी द्यावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री
अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते काल लातूर शहर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन
करत होते. या संदर्भात अशोका गॅस कंपनीचे शहराच्या काही भागात सर्वेक्षण केलं आहे.
गॅस कंपनीने घरगुती गॅस वापर वापरकर्त्यांना प्रति किलो गॅस दरात सवलत द्यावी, अशी
सूचनाही देशमुख यांनी केली आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तीन महिन्यात ग्राहकांना
जोडण्या दिल्या जातील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं. उद्योगांनाही पाईपलाईनद्वारे गॅस
जोडणी देण्याबाबत विचार करावा, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं.
****
आषाढीवारी
बद्दलचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीतच घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आळंदी आणि देहू संस्थानच्या
पदाधिकाऱ्यांसमवेत काल एक बैठक झाली. गेल्या वर्षी दोन्ही संस्थानं, त्याचबरोबर वारकरी
सांप्रदायानंही शासनाला सर्वतोपरी सहकार्य देण्याची भूमिका घेतली, यंदा मात्र पायी
वारीला परवानगी मिळावी,त्यासाठी निश्चित होणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यास
हा सांप्रदाय तयार आहे अशी स्पष्ट भूमिका दोन्ही संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत
मांडली
****
परभणी
जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून ३१ मेच्या सकाळपर्यंत सप्ताहांत टाळेबंदी लागू झाली
आहे. या काळात किराणा, भाजीपाला आणि फळविक्री बंद राहणार आहे. कृषी निविष्ठा तसंच सहाय्यभूत
सेवा देणाऱ्या आस्थापना सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत तसंच दूध विक्रीला सकाळी नऊ वाजेपर्यत
परवानगी देण्यात आली आहे.
****
सांगली
इथं डिज्ने वर्ल्डच्या धर्तीवर बाल कोरोना उपचार केंद्र उभारण्यात आलं आहे. या कोरोना
केंद्रात प्रवेश केल्यावर डिज्ने वर्ल्ड मध्ये आल्याचा भास होतो. एखाद्या अंगणवाडी
प्रमाणे असलेल्या या केंद्रात कार्टून चित्र, खेळणी, तसंच भिंतीवरही बोलकी चित्र रेखाटण्यात
आली आहेत. सांगलीचे काँग्रेस नगरसेवक अभिजित भोसले यांनी हे महाराष्ट्रातलं पहिलं बाल
कोविड सेंटर साकारलं असून या ठिकाणी सध्या पाच बालकांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद
इथं औद्योगिक वसाहतीतल्या बजाज कंपनीमध्ये उभारलेल्या कोविड 19 लसीकरण केंद्राचं उद्घाटन
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या केंद्रातून कामगार आणि
त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण केल्यामुळे इतर नागरिकांमध्येही लसीकरणाबाबत जागृती होईल,
आणि जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
****
परभणी
जिल्ह्यातली नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच जुन्या निवडक अशा एकूण दहा प्राथमिक
आरोग्य केंद्रांना राज्य शासनाकडून रुग्णवाहिका मिळाल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
निर्मला विटेकर, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, यांच्या उपस्थितीत काल या रुग्णवाहिका
प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपूर्द करण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात महानगर पालिकेच्या नऊ केंद्रांसह
जिल्ह्यातल्या ९२ लसीकरण केंद्रावर आज कोविड लसीकरण होणार
आहे. या सर्व केंद्रांवर लस सर्वत्र
विभागून पाठवण्यात आली आहे. या सर्व केंद्रांवर फक्त ४५ वर्षावरील व्यक्तींना
लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात एका हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून एक
लाख दहा हजार ८८० रुपये किंमतीची देशी विदेशी मद्याची २१ खोकी जप्त करण्यात आली. कळंब
तालुक्यात मोहा इथल्या हॉटेल वाडा इथं केलेल्या या कारवाईत श्यामकांत झोरी यांच्याविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला
****
परभणी
जिल्ह्यातले सैनिेक जिजाभाऊ किशनराव मोहिते यांचं पंजाबमध्ये पठाणकोट इथं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर पूर्णा तालुक्यात महागाव
इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात कौठा परिसरातही काल दुपारी वादळी वारं आणि जोरदार पाऊस
झाला. यामध्ये अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी घराच्या भिंतींची
पडझड झाली. आडगाव रंजे, वसमत, कौठा, बासंबा, कुरुंदा, हिंगोली या परिसरात तासभर पाऊस
झाला. औरंगाबाद जिल्ह्यात करमाड परिसरात तर परभणी शहर परिसरातही काल सोसाट्याचा वारा,
विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली.
****
परभणी
इथं काल दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. काल संध्याकाळी ही घटना घडली.
//*********//
No comments:
Post a Comment