Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २७ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन
श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक
नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा,
हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज
सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
माहिती
तंत्रज्ञान नियम २०२१ च्या
पालनाबाबत विविध सामाजिक माध्यमांकडे
केंद्र सरकारची विचारणा
**
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईपोटी २५० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार
**
बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी मराठवाड्यात राबवलेला आराखडा राज्यभरात लागू केला जाणार
**
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश पात्रता ॲडव्हान्स परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
** राज्यात २४ हजार ७५२ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ७५ जणांचा मृत्यू तर दोन हजार १६४ बाधित
**
बहुजन समाजाप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी
आणि
**
येत्या एक जूनपासून सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं उघडण्याचा औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचा निर्णय
****
इलेक्ट्रॉनिक
आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं विविध सामाजिक माध्यमांना नव्या माहिती
तंत्रज्ञान नियम २०२१ चं पालन कशा प्रकारे होत आहे, याची विचारणा केली
आहे. कालपासून हे नियम लागू झाले. महत्वाच्या सामाजिक माध्यमांना नियम लागू
करण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांची मुदत दिली होती.
दरम्यान, व्हॉट्सऍपने
या नियमावलीच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्र
सरकारच्या या नियमावलीमुळे वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येत असल्यानं या
नियमांना स्थगिती द्यावी, अशी मागणी व्हॉट्सऍपने केली
आहे.
****
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईपोटी २५० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय, राज्य सरकारने घेतला आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर या बाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यात सात जिल्ह्यांत चक्रीवादळाचा परिणाम झाला, या सर्व ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल - एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यातील वादळांचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय झाला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीजवाहक तारा टाकण्यात येणार आहेत, निवारेही बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली
****
बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी मराठवाड्यात राबवलेला आराखडा राज्यभरात लागू केला जाणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली एक वेबिनार घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निर्भया निधीतील रक्कम मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं. महिला आणि बालविकास आयुक्त पवनीत कौर, सहायक आयुक्त बाल संरक्षण संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक मनिषा बिरारीस यांच्यासह, अनेक अधिकारी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी, विशेष कृतीदल स्थापन करून प्रायोगिक स्तरावर काम करण्यात आलं. हाच आराखडा या वर्षी संपूर्ण राज्यात सुरु करणार असल्याची माहिती, बिरारीस यांनी यावेळी दिली.
****
बचत
गटांच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होत असतानाच, महिलांची फसवणूक होण्याचे प्रकारही
होत आहेत, त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर
नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर महेंद्रकुमार मेश्राम लिखित ‘स्वयंसहाय्यता
चळवळीतील महिलांची वाटचाल’ या पुस्तकाचं प्रकाशन गोऱ्हे यांच्या हस्ते काल दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात महिला अधिकारांच्या
लढ्यासाठी उभ्या राहिलेल्या चळवळीनं बचतगट आणि महिला अधिकारांची योग्य सांगड घातली,
असंही गोऱ्हे यांनी नमूद केलं.
****
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश पात्रता -जेईई ॲडव्हान्स ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान
संस्था- आयआयटी खरगपूरने हा निर्णय घेतला आहे. परिक्षेच्या सुधारीत तारखेची घोषणा योग्य वेळी केली जाईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यापूर्वीच्या घोषणेनुसार येत्या ३ जून
रोजी ही परीक्षा होणार होती.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काल चर्चा केली. राज्यातली कोविड स्थिती, मराठा आरक्षण, चक्रीवादळग्रस्तांना मदत अशा अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात काल २४ हजार ७५२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५६ लाख ५० हजार ९०७ झाली आहे. काल ४५३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९१ हजार ३४१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६२ शतांश टक्के झाला आहे. काल २३ हजार ६५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५२ लाख ४१ हजार ८३३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख १५ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन हजार १६४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७५ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २०, औरंगाबाद १७, बीड ११, हिंगोली सात, तर जालना, परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी पाच रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७०३ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ३१८, उस्मानाबाद ३०६, लातूर २५०, जालना तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी २१२, परभणी १३०, तर हिंगोली जिल्ह्यात ३३ रुग्ण आढळून आले.
****
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या एकीकडे कमी होत असताना दुसरीकडे म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयामध्ये स्वतंत्र उपचार कक्षही स्थापन करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात या आजाराचे ८१ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १५ रुग्ण बरे झाले असून, ५६ जणांवर उपचार सुरु आहेत. तर दहा रुग्णांचा म्यूकरमाकोसिसनं मृत्यू झाला आहे.
****
कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हिंदुजा रुग्णालयातले बालरोग तज्ञ डॉ. सुहास प्रभु यांच्या अध्यक्षतेखाली, कृती दल स्थापन करण्यात आला आहे. या कृतीदलात राज्यातल्या विविध भागातले १३ बालरोग तज्ञ असून, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, हे कृतीदलाचे सदस्य सचिव आहेत. हे विशेष कृती दल कोविड १९ च्या संसर्गापासून लहान मुलांचा बचाव, त्यांच्यासाठी उपचारपद्धती विकसित करणं आणि औषधांसह सोयीसुविधांसंबंधी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती, डॉ लहाने यांनी दिली.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवाल – एफआयआरमधले दोन परिच्छेद वगळावे, अशी मागणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयानं याचिकेवरील सुनावणी आठ जूनपर्यंत तहकूब केली आहे. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत सामावून घेणं, तसंच काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यांचा देशमुखांवरील भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांशी काहीही संबंध नाही, सीबीआय या प्रकरणाचा उल्लेख कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन करत असल्याचा युक्तिवाद, सरकारकडून करण्यात आला.
दरम्यान, मूळ तक्रारदार डॉ. जयश्री पाटील आणि सीबीआयने, हे प्रकरण मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. येत्या नऊ जूनपर्यंत राज्य सरकारकडे या संदर्भात कोणत्याही नव्या कागदपत्रांची मागणी करणार नाही, अशी ग्वाही सीबीआयनं दिली.
****
बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, काल मुंबईत राजभवनात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला, पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. कोरोना विषाणूच्या संकटकाळात भगवान बुद्धांची करुणा आपल्या मनी बाळगावी, असं आवाहन, राज्यपालांनी केलं. यावेळी बौध्द धर्मगुरु भिक्खूंना चीवरदान करण्यात आलं.
राज्यात सर्वत्र कोविड नियम पाळून बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांना आदरांजली वाहण्यात आली.
परभणी इथं भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखेतर्फे, कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून, उपसामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात आलं.
उस्मानाबाद इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीनं बुद्ध पौर्णिमानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं. गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. यावेळी रक्तदात्यांना सॅनिटायझर, मास्क, तसंच रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र, देऊन सन्मानित करण्यात आलं.
औरंगाबाद इथं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, लहुजी साळवे आरोग्य केंद्र, तेजस्विनी महिला विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसंच रक्तदान शिबिर घेण्यात आलं, या शिबीरात २४ जणांनी रक्तदान केलं.
****
बहुजन समाजाप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळावा अशी मागणी, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या २८ तारखेला आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला न्याय मिळवून देणं हीच आमची भूमिका आहे, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेत्यांना आपण भेटणार असून, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरु, अशी भूमिका संभाजीराजांनी यावेळी मांडली. इतर मागास प्रवर्ग - ओबीसीला दुखवून मराठा समाजाला आरक्षण मागण्याची आपली भूमिका नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारनं दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल पण ही आंदोलनाची वेळ नाही, ७० टक्के समाज गरीब आहे. त्यांच्यासाठी काय करणार हे सरकारनं सांगावं, त्याचवेळी मराठा समाजाच्या मुद्द्यांना कोणीही राजकीय रंग देऊ नये, असं आवाहनही खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.
****
राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना काल ७६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. विभागात काँग्रेस पक्षाच्या विविध शाखांच्यावतीनंही विलासरावांना अभिवादन करण्यात आलं. लातूर नजिक बाभळगाव इथल्या विलासबागेत वैशालीताई देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांनी विलासरावांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. लातूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वृक्षारोपण करण्यात आलं.
फक्त लातूर नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यानं पाण्याचं योग्य नियोजन करणं, हीच विलासराव देशमुख यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असं माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी म्हटलं आहे. लातूर महानगरपालिका, आणि वाईज वर्ड ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, यांच्या संयुक्त विद्यमानं, काल विलासरांवांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. पुण्याच्या एमआयटी महाविद्यालयातल्या सहयोगी प्राध्यापक धनश्री मिरजकर यांनी पर्जन्य जल व्यवस्थापन याविषयी सादरीकरण केलं. छोट्या-छोट्या साधनांचा वापर करून पाण्याचं नियोजन कसं करता येतं, याची तंत्रशुद्ध आणि शास्त्रीय माहिती त्यांनी दिली.
****
जातीधर्माच्या पलीकडे सर्वसमावेशक राजकरणाचं उत्तम उदाहरण, विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं, असं मत, माजी कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते काल बोलत होते. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी केलेल्या भाषणात, विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने अद्ययावत डिजिटल स्टुडिओ उभारण्यात आला असून, त्याचं लवकरच लोकार्पण होणार असल्याचं सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी, संयुक्त किसान सभा, संयुक्त किसान मोर्चा आणि मजूर संघटनांच्या वतीनं, काल काळा दिवस पाळण्यात आला. या संघटनांच्या पदाधिकारी तसंच सदस्यांनी घरावर काळे झेंडे फडकवून सरकारचा निषेध केल्याची माहिती, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात आयटक, लाल बावटा, शेतमजूर युनियन आणि इतर संघटनांच्या वतीनं, हे निषेध आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात १२९ गावांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसंच प्रहार सैनिकांनी, आपल्या घरावर काळा झेंडा लावून केंद्र सरकारचा निषेध केला.
****
औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं येत्या एक जूनपासून सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ब्रेक दी चेन या संकल्पनेमध्ये, गेल्या दोन महिन्यापासून दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांनी शासनाला सहकार्य केलं, मात्र दोन महिने व्यापार बंद असल्याने व्यापारी अडचणीत सापडला आहे. व्यापाऱ्यांच्या आर्थिक तसंच मानसिक परिस्थितीचा अभ्यास करून, येत्या मंगळवारपासून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं, महासंघाकडून सांगण्यात आलं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियम आणि अटी पाळून व्यवसाय करण्यास सहकार्य करण्याचं आवाहन, महासंघानं प्रशासनाकडे केलं आहे.
****
परभणी शहरात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एका आस्थापनेला दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकानं काल ही कारवाई केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या म्युकरमायकोसिस या रोगावर उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना, आवश्यक प्रमाणात ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन मिळण्यासाठी, रुग्णांची माहिती संबंधित शासकीय संकेतस्थळावर अद्ययावत ठेवण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. म्युकरमायकोसिस बाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारावरच, शासनाकडून आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा होणार असून, यासाठी संबंधित यंत्रणेच्या संपर्कात राहण्याचे निर्देशही, चव्हाण यांनी यावेळी दिले.
****
म्युकरमायकोसिस तसंच कोविड १९च्या संभाव्य तिसऱ्या लाटेत, बालकांच्या आरोग्याची योग्य उपाययोजना व्हावी, यासाठी परभणी जिल्ह्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यांना, काल ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आलं. या आजारांची लक्षणं, उपचार पद्धती, घ्यायची काळजी, या बाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरापासून जवळच असणाऱ्या काळवटी तलावात एका १५ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला. वैष्णवी भोसले असं या मुलीचं नाव असून, ती तलावात पोहण्यासाठी गेली असता, पोहून थकल्यामुळे ती पाण्यात बुडाली, असा प्राथमिक अंदाज आहे.
//*********//
No comments:
Post a Comment