Monday, 31 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक३१ मे २०२ सकाळी ७.१० मि.

कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. कोविड - १९ शी संबंधित अधिक मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत केंद्राशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत केंद्राशी संपर्क करू शकता.

****

** राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे असलेले निर्बंध १५ जून पर्यंत कायम ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय: मात्र जिल्हानिहाय बाधिताच्या दरानुसार निर्बंधात शिथिलता देण्यास परवानगी

** कोरोनामुक्त गाव मोहीम राबवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

** कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत भारत विजयी होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

** राज्यात १८ हजार ६०० नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ६४ जणांचा या संसर्गानं मृत्यू तर एक हजार ४८६ बाधित

** शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खतं आणि बी - बियाणांचा पुरवठा करण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना

आणि

** केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सेवा दिवस तर काँगेसकडून सरकारच्या कारभारावर टीका

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे असलेले निर्बंध १५ जून पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र यापुढे हे निर्बंध एकसारखे लागू न करता महापालिका, जिल्ह्यातील बाधिताचा दर आणि तिथल्या ऑक्सिजन खाटांची उपलब्धता यानुसार निश्चित करण्यात आले आहेत. कोविड संसर्गाला रोखण्यासाठी महानगरपालिकांना स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल, तसंच या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातला उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील, असं यासंदर्भातल्या आदेशात म्हटलं आहे.

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड बाधिताचा दर दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल, आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन खाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी असतील, त्याठिकाणी सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या दुकानांच्या बाबतीत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल. दुपारी तीन वाजेनंतर वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त इतर सर्व व्यहार आणि येण्या जाण्यावर निर्बंध कायम असतील. कृषिविषयक दुकानं आठवड्याच्या कामाच्या दिवसां दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहू शकतील. बाधिताचा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लातूर, परभणी, औरंगाबाद, जालना, नांदेड, वाशिम, बुलडाणा, नाशिक, मुंबई आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

ज्या जिल्ह्यां बाधिताचा दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, आणि ऑक्सिजन खाटा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील, त्याठिकाणी जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील, आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध हे पूर्वी प्रमाणेच लागू राहतील. बाधिताचा दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद, हिंगोली, बीड, पुणे आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

कोविड संसर्गाची तिसरी लाट रोखणं, हे आपल्या वागणुकीवर अवलंबून असून, नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल समाज माध्यमांवरुन राज्यातल्या नागरीकांशी संवाद साधला. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोपटराव पवार यांनी त्यांचं हिवरे बाजार हे गाव, सोलापूर जिल्ह्यातले तरुण सरपंच ऋतुराज देशमुख तसंच कोमल करपे यांनी आपलं गाव कोरोनामुक्त केलं. राज्यातल्या सर्व सरपंचांनी त्यांचं अनुकरण करून आपापली गावं कोरोनामुक्त करावीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनतेनं सहकार्य केल्याशिवाय कोणतंही सरकार यशस्वी होत नाही, दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवल्याबद्दल महाराष्ट्राचं कौतुक होत आहे, हे श्रेय जनतेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचं पालकत्व सरकार घेईल, शिक्षण आणि निवासासह आवश्यक त्या प्रत्येक बाबीत सरकार सहकार्य करेल, त्यासाठी योजना तयार केली जात असल्याचं ते म्हणाले. बारावीच्या परिक्षेबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

****

जागतिक साथीच्या काळात भारत 'सेवा आणि सहकार्याचा' संकल्प घेऊन मार्गक्रमण करत असून कोरोना विषाणू विरुद्ध सुरु असलेल्या या लढाईत भारत विजयी होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साध होते. या कठीण आणि अवघड परिस्थितीमध्ये चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यांतल्या नागरिकांनी अतिशय धैर्यानं, या आपत्तीला तोंड दिलं त्याबद्दल त्यांनी नागरिकांचं कौतुक केलं.

देशात दर दिवशी ९०० मेट्रिक टन द्रवरुपी वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होत होती. ती आता प्रतिदिन ९ हजार ५०० मेट्रिक टनावर पोहचली असल्याचं सांगत, ऑक्सीजन टँकर चालक दिनेश उपाध्याय, ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वे चालवणारे लोको पायलट शिरीषा गजनी, हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन पटनायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधत पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कृषी-क्षेत्रानं केलेल्या अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनामुळे प्रत्येक देशवासियाला आधार देण्यास देश सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आपल्या ७ वर्षांचा कार्यकाळाबाबत बोलताना, जे साध्य झाले आहे ते देशाचे आणि देशवासियांचे असून या काळात आपण 'टीम इंडिया' म्हणून काम केल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

ग्रामस्थांची कोरोना विषाणू संसर्गाबाबतची भीती घालवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील अंजनवाडा गावचे तरुण सरपंच किरण घोंगडे यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर …

कोरोना चाचणी बाबतची भिती आणि गैरसमज घालवण्यासाठी युवा सरपंच किरण घोंगडे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. कोरोना चाचणी करणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून पाच लाख रुपयांची विमा पॉलिसी काढून सुरक्षा कवच दिले आहे.त्यामुळे हळूहळू कोरोना चाचणी करुन घेण्यास ग्रामस्थ पुढे आले.विमा धारकांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते पॉलिसी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना बाबतची जनजागृती करणारा हा अंजनवाडा पॅटर्न जिल्हाभरात राबवणार असल्याचं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.

****

राज्यात काल १८ हजार ६०० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली आहे. काल ४०२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९४ हजार ८४४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. काल २२ हजार ५३२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५३ लाख ६२ हजार ३७० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ७१ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ४८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६४ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २२, औरंगाबाद २०, उस्मानाबाद आठ, परभणी चार, नांदेड, जालना, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५०९ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात २२९, उस्मानाबाद २१०, लातूर १७९, नांदेड १५०, जालना ९१, परभणी ८८, तर हिंगोली जिल्ह्यात २१ नवे रुग्ण आढळून आले.

****

शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खतं आणि बी-बियाणांचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनानं प्राधान्यानं काम करण्याची सूचना, कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद विभाग कृषी विभागाच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला रोजगार तसंच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कृषी सचिव एकनाथ डवले, यांच्यासह लोकप्रतिनिधी तसंच औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. गावपातळीवर रासायनिक खतांची बचत १० टक्क्यांपर्यत करण्याबाबत उपक्रम राबवला जात आहे. यामुळे शेतीची उत्पादक क्षमता वाढली असून सेंद्रीय खत वापरास चालना दिली जात असल्याचं भुसे यांनी सांगितलं.

 

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना भुसे यांनी, खत तसंच बी-बियाणांची कमतरता भासणार नाही, युरीया आणि, इतर खतं वाढीव प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री पिक विमा प्रस्तावाबाबत राज्यमंत्री सत्तार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातल्या संबंधित प्रकरणाची वरिष्ठस्तरावरुन पथक पाठवून चौकशी केली जाईल, तसंच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं.

 

कृषी मंत्र्यांनी काल परभणी इथं लातूर विभागाची आढावा बैठक घेतली. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक तसंच नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अशोक ढवण, आणि सर्व लोकप्रतिनिधी या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. पिक विमाबाबत जिल्हास्तरावर मार्गदर्शन केंद्र आवश्यक असून, अशी केंद्र उभारण्याची सूचना अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

 

दरम्यान, पीक विम्याची कोट्यवधी रूपयांची हक्काची रक्कम शेतकऱ्यांना पेरणीपूर्व वितरित करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल परभणीत कृषीमंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. काल सायंकाळी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी कृषी मंत्री भुसे आले असता, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी भुसे यांनी बैठक थांबवून बाहेर येत, निवेदन स्वीकारून मागण्या जाणून घेतल्या.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्त काल भारतीय जनता पक्षातर्फे सेवा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त मुंबई, पुणे, वाशिम, यासह अनेक ठिकाणी सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले.

उस्मानाबाद इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालय परिसरात कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवणारे सामाजिक कार्यकर्ते, रुग्णवाहिका चालक, पोलीस कर्मचारी, पत्रकार यांना गौरवण्यात आलं.

या कार्यक्रमानंतर बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी, नागरिकांना कोविड प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं, तसंच लस घेण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...

 

मास्कचा वापर, अंतर ठे‍वण आणि वारंवार हात धुणं याचा विषय जो आहे. तो मात्र मनात ठेवण गरजेच आहे. कारण अजूनही तिसरी लाट येईल म्हणतात. आपण काळजी घ्या. जून महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. आणि जुलै, ऑगस्ट नंतर तर आपल्याला कुठलीच लसीच्या बाबतीत अडचण जाणव‍नार नाही. त्यामुळे आपला जेव्हा टर्म येईल, आपण जरुर लस घ्या ही देखील विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करतो.

****

केंद्र सरकारच्या सात वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने निराशाजनक कामगिरी केल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन बोलत होते. कोविड परिस्थितीवरही सरकारला नियंत्रण मिळवता आलं नाही, हे भाजप सरकारचं अपयश असल्याचं चव्हाण म्हणाले.

कॉंग्रेस नेते अमित देशमुख यांनीही, सबका साथ सबका विकास, कार्यक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यासह मोठमोठी आश्वासनं देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातल्या जनतेचा पूरता भ्रमनिरास केला असल्याची टीका केली. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात देश अनेक वर्ष मागे गेला, महागाईने उच्चांक गाठला, जनतेची केविलवाणी स्थिती निर्माण झाली असल्याचं देशमुख म्हणाले. 

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली. कोविड महामारीत केंद्र सरकारनं चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

परभणीत जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारचा सात वर्षाचा कारभार निष्क्रीय असल्याचं सांगत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

नाशिक, सोलापूर, धुळे, वाशिम इथंही काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारविरोधात निदर्शनं केली.

****

माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ डाक पाकीट काढण्यात येणार असल्याचं, खासदार डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. तीन जून गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी या पाकीटाचं अनावरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंचायतराज व्यवस्थेतलं इतर मागासवर्गीय - ओ.बो.सी आरक्षणाबाबत सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी राज्यशासन तसंच ओबीसी नेते प्रयत्नशील असल्याचं, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी सांगितलं आहे. या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ते काल नागपूर इथं ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायलयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग गठित करून ओबीसींचा स्वतंत्र जनगणना अहवाल केंद्र सरकारला पाठवल्यास, हे राजकीय आरक्षण टिकू शकेल वडेट्टीवार म्हणाले.

//***************//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments: