Saturday, 29 May 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २९ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणीस्तानचं नागरिकत्व असणाऱ्या, पण अनेक वर्षे भारतात गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि पंजाब या राज्यातल्या १३ जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या विविध अल्पसंख्यांक नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याच आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. नागरीकत्व अधिनियम १९५५ नुसार हा आदेश लागू करण्यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे.

****

म्यूकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीवरील औषधांवरील सीमा शुल्क तसंच वस्तू आणि सेवा करावर देण्यात आलेल्या सवलतींना मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची ४३वी बैठक काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

****

देशाला सावरकर यांच्या विज्ञाननिष्ठतेची अधिक गरज आहे, असं प्रतिपादन विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं आयोजित ऑनलाइन पुरस्कार समारंभात ते बोलत होते. 'विकसित देशांमध्ये विज्ञानावर मोठा भर दिला जातो, भारतामध्ये मात्र कृतीपेक्षा चर्चाच अधिक असून विज्ञानाबाबत असणारी ही उदासीनता देशाला आणि समाजालाही घातक असल्याचं नारळीकर म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार कर्नल बी. संतोष बाबू यांना, तर स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार, पुण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला यावेळी देण्यात आला.

****

परभणी शहरात टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरोधात विविध ठिकाणी महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

****

परभणी इथं काल दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेली मुलं पाण्यात बुडत असल्याचं समजल्यावर अग्निशामक दलानं बचावकार्य सुरू केलं, मात्र दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

****

नांदेड जिल्ह्यात महानगर पालिकेच्या नऊ केंद्रांसह जिल्ह्यातल्या ९२ लसीकरण केंद्रावर आज कोविड लसीकरण होणार आहे. या सर्व केंद्रांवर फक्त ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे.

*****

No comments: