Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 May
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी वीस कोटी २६ लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण
**
औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे अकरा रुग्णांचा मृत्यू
**
कोरोना विषाणू संसर्गाचे बीडमध्ये ६०३ तर जालन्यामध्ये ८५ नवे रुग्ण
आणि
**
औरंगाबाद जिल्ह्यात तसंच उस्मानाबाद शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस
****
केंद्र
सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत स्वरुपात तसंच राज्यांकडून थेट खरेदीच्या
माध्यमातून अशा दोन्ही मार्गांनी मिळून कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या आतापर्यंत एकूण
बावीस कोटी सोळा लाख अकरा हजार ९४० मात्रांचा पुरवठा केला आहे. यापैकी वाया गेलेल्या
मात्रांसह एकूण २० कोटी सतरा लाख ५९ हजार ७६८ मात्रा वापरण्यात आल्या. राज्यं, केंद्रशासित
प्रदेशांकडे या लसीच्या एक कोटी ८४ लाख ९० हजार ५२२ मात्रा लसीकरणासाठी अद्यापही उपलब्ध
आहेत. याव्यतिरिक्त अकरा लाख ४२ हजार ६३० मात्रा या तीन दिवसांत राज्यं, केंद्रशासित
प्रदेशांना प्राप्त होतील.
****
औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय रुग्णालय- घाटीत आज कोरोना विषाणू संसर्गामुळे अकरा रुग्णांचा मृत्यू
झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या आठ आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा
समावेश आहे. काळी बुरशी म्हणजे `म्युकरमायकोसीस` आजारावर उपचार घेत असलेल्या औरंगाबाद
इथल्या एका रुग्णाचाही या मृतांमध्ये समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात `म्युकरमायकोसीसनं`
आतापर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात या संसर्गाच्या ३१७ रुग्णांवर उपचार
सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत या संसर्गाच्या ३९९ रुग्णांची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. रक्तातल्या
साखरेचं प्रमाण वाढल्यानं आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या
रुग्णांना `म्युकरमायकोसीस` आजाराचा धोका जास्त असल्याची माहितीही डॉ. कुलकर्णी यांनी
यावेळी दिली.
****
बीड जिल्ह्यात आज ६०३ नवे कोविड रुग्ण
दाखल झाले. यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक १६५, तसंच आष्टी ७९, केज ६५, गेवराई ५८,
अंबाजोगाई ५५, माजलगाव ५०, शिरुर ४९, धारुर ३०, पाटोदा २६, वडवणी १४ आणि परळी इथल्या
१२ रुग्णांचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यात आज तीन कोरोना विषाणू बाधित रूग्णांचा
मृत्यु झाला. तर नवे ८५ रूग्ण आढळले.आज १७८ जणांना उपचारानंतर बरे
झाल्यानं सुटी देण्यात आली.सध्या तीन हजार ४०१ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
`मुक्यरमायकोसीस`चा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या
पुढाकारानं वर्धा इथल्या `जेनेटेक लाइफ सायन्सेस` कंपनीमध्ये
`एम्फोटेरिसिन बी` इंजेक्शनच्या
निर्मितीसाठी परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत फक्त एकच कंपनी या इंजेक्शनचं भारतात उत्पादन करत होती.
या इंजेक्शनचं वितरण सोमवारपासून सुरू होईल आणि त्याची किंमत १२०० रुपये असेल. सध्या हे इंजेक्शन सात
हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याचं गडकरी यांनी एका संदेशाद्वारे
आज सांगितलं.
****
कोरोना
विषाणू संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना
आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचं विशेष कार्यदल डॉ. सुहास
प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं आहे. यात तेरा तज्ज्ञ सदस्य असून वैद्यकीय
शिक्षण आणि संशोधन संचालक याचे सदस्य सचिव आहेत. राज्यात सध्या या संसर्गाची दुसरी
लाट सुरू आहे. कोरोना विषाणूत होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी
लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे
स्थापन बालरोग तज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद,
नागपूरच्या तज्ज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
निर्माण केल्याचं जे चित्र उभं केलं जात आहे. ती अफवा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. कुठल्याही
मंत्र्यांनी कार्यपद्धतीवर कुठलाही प्रश्न निर्माण केलेला नसून सरकार एकजुटीनं काम
करत आहे असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत
राज्यातल्या कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीसह लसीकरण, टाळेबंदी आणि इतर महत्त्वाच्या
विषयावर चर्चा झाली, असं मलिक यांनी सांगितलं.
****
मराठा
आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निर्णय करण्याची आवश्यकता असून हे सर्व
केंद्राच्या हातात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री
जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या मुद्दावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यात
फिरण्याऐवजी दिल्लीत फिरलं तर उपयोग होईल, अशी टीकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. टाळेबंदीमुळे कोरोना
विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या मर्यादित झाली असून याचा चांगला फायदा प्रत्येक
जिल्ह्यात झाला असल्याचं ते म्हणाले. आपण टाळेबंदीच्या निर्णयावर थेट भाष्य करणार नाही
मात्र याचा अर्थ असा नाही की टाळेबंदी कायम केली पाहिजे, असंही पाटील यांनी नमुद केलं.
****
सध्या
महाविकास आघाडीचा सत्तेचा बोनस काळ सुरू असून आपण फार काळ सत्तेत राहणार नाही याची
जाणीव या सरकारला झाली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांनी केली आहे. ते आज कोल्हापूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या सरकारला येत्या ३० मे रोजी सात वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या
दिवशी ‘सेवा हेच संघटन’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. देशात एक लाख, तर राज्यात वीस
हजार गावात हा उपक्रम राबवण्यात येणार असून पन्नास हजार बाटल्या रक्तसंकलन करण्यात
येईल तसंच गावागावात कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहितीही पाटील यांनी
यावेळी दिली.
****
हवामान
विभागानं येत्या ३१ तारखेपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जऩा आणि विजांच्या
कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात पाचोड
आणि परिसरात तसंच खुल्ताबाद तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे झाडं उन्मळून
पडली तर बाजरी, ऊसाच्या पिकांचं नुकसान झालं. औरंगाबाद शहरातही दुपारपासून ढगाळ वातावरण
असून वारे वाहत आहे. उस्मानाबाद शहर आणि परिसरातही आज दुपारी चार वाजेच्या सुमाराला
पाऊस झाला. जिल्ह्यात परवा- शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर वेगानं वादळी
वारं वाहण्याची तसंच विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेण्याचं
आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. नागरिकांनी विजेच्या खांबासमोर किंवा वीज वाहक मनोऱ्याच्या जवळ न थांबण्याचं,
शेतात कामं असतील तर उघड्यावर असताना विजांची काळजी घेण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
डॉक्टर शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यातल्या निम्न दुधना सिंचन प्रकल्पातून दुधना नदी काठच्या गावांच्या टंचाईच्या
निवारणाकरता उद्या सकाळी साडे नऊ वाजेपासून दुधना नदीच्या पात्रात तीन हजार ५६ घनफूट
प्रतीसेकंद वेगानं पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांनी
सतर्क रहावं, नदीपात्रात उतरु नये, तसंच गुरं आणि इतर तत्सम प्राणी यांना नदीपात्रात
उतरु देवू नये. शेतीचे अवजारे, विद्युत पंप तातडीने काढून घ्यावेत, असे निर्देश प्रशासनानं
दिले आहेत. मोरेगाव, इरळद, नांदगाव, झरी आणि सनपूरी बंधाऱ्याच्या फळ्या काढून घ्यावयाची
कार्यवाही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागानं तातडीनं करावी, असे निर्देशही या विभागानं
आज दिले.
****
परभणी जिल्ह्यातल्या `आयटक` संलग्न संघटनेच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि
मदतनीस यांनी आज केंद्र
आणि राज्य सरकारच्या कामगार आणि
शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात"काळा निषेध दिन" पाळला. दिल्लीच्या सीमेवर सुरू शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ यावेळी काळ्या फिती लावून आणि काळे
झेंडे फडकवून निषेध व्यक्त करण्यात आला.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या अर्धापूर शहरात नव्यानं
बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचं उद्धाटन
आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते आज झालं. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण
यांनी आगामी तीस वर्षात अर्धापूर शहराचा विस्तार गृहीत धरून ही पाणीपुरवठा योजना
आखली असल्याचं राजूकर यावेळी म्हणाले.
****
नांदेड
जिल्ह्यातील हदगाव इथल्या दत्त महाविद्यालयातले प्राध्यापक गणेश शिंदे यांचं आज हृदय
विकारानं निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. मराठा आरक्षण चळवळीतले एक कार्यकर्ते असलेले
प्रा. शिंदे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी युवक कल्याण
विभागाचे संचालक म्हणून काम पाहिलं होतं.
****
कोरोना
विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं असल्यानं खेळाची
मैदानं, व्यायामाची ठिकाणं तसंच उद्यानं सुरु करण्याची मागणी क्रीडा भारती संस्थेनं
केली आहे. औरंगाबाद इथं विभागीय क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांच्याकडे ही मागणी
करण्यात आली.
//**************//
No comments:
Post a Comment