आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ मे २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
हिंदी महासागरात
निर्माण झालेलं यास चक्रीवादळ आज ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची प्रक्रिया सुरु
झाली आहे. त्यामुळे ओडीशाच्या किनारपट्टीलगतच्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. हे वादळ
आज पश्चिम बांगालच्या किनारपट्टीवर धडकण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय
आपत्ती निवारण दल - एनडीआरएफच्या १२५ तुकडया तामिळनाडूहून पश्चिम बंगालला रवाना झाल्या
आहेत.
****
बुद्धपौर्णिमा
आज साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौतम बुद्धांचे
विचार मानवाचे जीवन कायम प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी, तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून, सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
दिल्या आहेत.
****
केंद्रात प्रतिनियुक्तीवर
गेलेले महाराष्ट्र केडरचे वरीष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी
असेल. कार्मिक मंत्रालयानं काल याबाबतचा आदेश जारी केला.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या तीन कार्यालयांवर
सक्तवसुली संचालनालयानं काल छापे मारले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सी बी आय नं अनिल देशमुख यांच्याविरोधात
प्रथम माहिती अहवाल दाखल केल्यानंतर, ई डी नं देखील देशमुख यांच्याविरोधात
गुन्हा दाखल केला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या
बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्यात आलं आहे. या दलाअंतर्गत मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन
सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा माहिती बाल संरक्षण
अधिकारी विद्या आळणे यांनी दिली.
****
परभणी इथं बालकांसाठीच्या कृती दलाची काल बैठक झाली. जिल्ह्यात
कोविड मुळे दोन्ही पालक दगावलेल्या तसंच कोविड संसर्गामुळे पालक रुग्णालयात असलेल्या
शून्य ते १८ वर्ष वयोगटातल्या बालकांची माहिती प्रत्येक आठवड्याला, जिल्हा कृती दलाचे समन्वयक तथा जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी
यांना उपलब्ध करून द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावेळी केली.
****
No comments:
Post a Comment