Tuesday, 25 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक२५ मे २०२ सकाळी ७.१० मि.

कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर, नोंदणीची तसंच समूह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

** कोरोना विषाणू संसर्गामुळे मुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोविड- १९चा उल्लेख करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला विचारणा

** निर्बंध शिथिल करण्याबाबत घाई न करण्याची राज्य सरकारकडून दक्षता; रेड झोनमधल्या जिल्ह्यां संचारबंदी आणखी कडक करणार

** बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून कडक निर्बंध

** जालना जिल्ह्यात कोविड रुग्णांना जादा बील आकारणाऱ्या १२ खाजगी रुग्णालयांना १७ लाख ५२ हजार रूपये सात दिवसांमध्ये परत करण्याचे निर्देश

आणि

** महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरु

****

१८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर, नोंदणीची तसंच समूह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा, लसीच्या मात्रा वाया जाऊ नयेत, आणि नागरिकांचं लसीकरण व्हावं, हाच या मागचा उद्देश आहे. फक्त शासकीय लसीकरण केंद्रांवरच ही सुविधा उपलब्ध असेल. खासगी लसीकरण केंद्रांना मात्र लसीकरण कार्यक्रम जाहीर करून, ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. कोविन ॲपवर सध्या एका मोबाईलवरून चार जणांची नोंदणी करता येते, मात्र ज्या नागरिकांना मोबाईल किंवा इंटरनेट वापराला मर्यादा आहेत, त्यांना या ॲपवरून समूह नोंदणी करून, लसीकरणाची वेळ घेता येणार आहे. लसीकरण केंद्रावर नोंदणीचा निर्णय घेताना, केंद्रांवर गर्दी होणार नाही, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोविड- १९चा उल्लेख का केला जात नाही, अशी विचारणा, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम १२ नुसार आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना, सरकारकडून नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची नुकसाई भरपाई देण्यास सांगितलं होतं, मात्र यंदा कोणत्याही राज्यानं अशी भरपाई अद्याप दिलेली नाही, असं यावेळी सांगण्यात आलं. रुग्णालय शवविच्छेदन न करता मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असल्यामुळे मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचं कारणाचा उल्लेख असत नाही. अशा परिस्थितीत नुकसान भरपाईची योजना सुरु झाली, तरी लोकांना ती मिळू शकणार नाही. यासाठी मृत्यू प्रमाणपत्रावर कोविडचा उल्लेख करण्याचे सर्व राज्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली.

****

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्यूकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांवर राज्यातल्या निवडक १३० रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतील, असं राज्य शासनानं सांगितलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य शासनानं ही माहिती दिली. मोफत उपचारासाठी रुग्णांजवळ कोणत्याही प्रकारचं कार्ड असण्याची सक्ती नाही, खासगी रुग्णालयांनाही मर्यादेपेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं.

****

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असला तरीही सध्या लागू असलेले निर्बंध चार टप्प्यात शिथिल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी निर्बंध शिथिल केल्यानंतर गर्दी उसळून रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढली होती, त्यामुळे घाई न करण्याची दक्षता राज्य सरकारकडून घेतली जात आहे. रेड झोनमधले जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांना दिलासा मिळू शकतो. रेड झोन मध्ये संचारबंदी आणखी कडक करुन निर्बंध लागू करावे लागतील, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. बीड आणि उस्मानाबादसह बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, गडचिरोली आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा रेड झोन मध्ये समावेश आहे.

****

बीड जिल्ह्यात आज रात्री १२ वाजेपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत, कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काल यासंदर्भातले आदेश जारी केले. औषधी दुकानं, आरोग्यसेवा, तसंच इतर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व आस्थापना या काळात बंद राहणार आहेत. भाजीपाला विक्री सकाळी सात ते नऊ या वेळेत, तर दूधविक्री सकाळी सात ते दहा या वेळेत सुरू असेल. स्वस्त धान्य दुकानं आणि कृषी निविष्ठा सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरु राहतील. ज्या नागरिकांना लसीकरणाबाबत मोबाईलवर संदेश आलेला आहे, अशांना या काळात लस घेण्यासाठी परवानगी असणार आहे.

 

सातारा जिल्ह्यात काल मध्यरात्री १२ वाजेपासून एक जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू झाले आहेत. या काळात राज्य परिवहन मंडळाच्या सेवा तसंच सर्व सहकारी बँक, पतसंस्था बंद राहणार आहेत. भाजी, किराणा तसंच इतर सर्व बाजारपेठा देखील बंद राहणार असून, दूध वितरणासाठी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

****

नाशिक जिल्ह्यात १२ दिवसांचे कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर, काल बाजार, उद्योग सुरू झाले. गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू झाल्यानं, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत काल लिलाव सुरू होताच, कांद्याला प्रतिक्विंटल किमान सातशे, तर जास्तीत जास्त १ हजार ४८१ रुपये दर मिळाला.

****

राज्यात काल २२ हजार १२२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५६ लाख दोन हजार १९ झाली आहे. काल ३६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, हजार ९८१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५ शतांश टक्के झाला आहे. काल ४२ हजार ३२० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख २७ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल दोन हजार ६६४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८४ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २२, औरंगाबाद १७, बीड १६, परभणी १२, नांदेड आठ, उस्मानाबाद सहा, हिंगोली दोन, तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८२४ रुग्ण आढळले. परभणी ४०८, उस्मानाबाद ४०६, औरंगाबाद ३२६, जालना २३६, नांदेड २१०, लातूर २०२, तर हिंगोली जिल्ह्यात ५२ रुग्ण आढळून आले.

****

खाद्यतेलांच्या वाढत्या किंमती स्थिर करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल सर्व संबंधित घटकांची बैठक घेऊन चर्चा केली. सर्वसामान्यांना रास्त दरानं खाद्य तेल उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयानं प्रयत्न करण्यासाठी घेतलेल्या या बैठकीत अन्न तसंच सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव, कृषी सचिव तसंच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशात तेलबियांचं उत्पादन कमी होत असून, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करावं लागत असल्याकडे सार्वजनिक वितरण सचिवांनी लक्ष वेधलं.

****

जालना जिल्ह्यातल्या १२ खाजगी रुग्णालयांनी २९१ कोविड रुग्णांकडून, उपचाराचे १७ लाख ५२ हजार रुपये जादा आकारल्याचं, जिल्हा प्रशासनानं केलेल्या लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झालं आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल या खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांची बैठक घेऊन, रुग्णांकडून घेतलेली जादा रक्कम सात दिवसांमध्ये परत करण्याचे निर्देश दिले. शहरातल्या काही नामांकित रुग्णालयांचा यात समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोविडमुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांपर्यंत शासकीय योजना तात्काळ पोहचाव्यात, यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं मिशन मोडवर काम करणं अपेक्षित असल्याचं, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी म्हटलं आहे. कोविड पार्श्वभूमीवर बालकांची काळजी तसंच संरक्षणासाठी, जिल्हास्तरावर स्थापन कृतीदलाच्या बैठकीत काल ते बोलत होते. जिल्ह्यातील अशा बालकांची माहिती विहित मुदतीत संकलित होण्यासाठी, कर्मचाऱ्यांनी याकडे कामाचा भाग म्हणून न पाहता, जिव्हाळ्यानं काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी केलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी नांदेड शहरातल्या जिल्हा शासकीय रुग्णालय, तसंच विष्णुपुरी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात, प्रत्येकी एक हजार किलोलीटर क्षमतेच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पासाठी, पंतप्रधान केअर फंडातून दोन कोटी पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्प उभारणीच्या कामाची, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल भेट देऊन पाहणी केली. हे दोन्ही प्रकल्प येत्या ३० मे पर्यंत कार्यान्वित होतील अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या आदर्श पाटोदा ग्रामपंचायतीनं, स्वखर्चातून गावातल्या जिल्हा परिषद शाळेत सर्व सुविधांनी युक्त, कोविड सुश्रुषा केंद्र स्थापन केलं आहे. सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे आणि ग्राम विकास अधिकारी पुंडलिक पाटील यांच्या संकल्पनेतून, गावात हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. गावातल्या ४५ वर्षांवरील १०० टक्के व्यक्तींचं कोविड लसीकरण पूर्ण झाल्याचं, ग्राम विकास अधिकारी पुंडलिक पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले….

प्राथमिक सर्व आरोग्याच्या ज्या सुविधा लागतील त्या आम्ही इथं ठेवलेल्या आहेत. खाजगी डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे, आणि त्याचं पेमेंट ग्रामपंचायत करते.होम आयासोलेशनचा ज्यांना सल्ला दिला जातो. तर इथे त्यांना ॲडमिट करुन त्यांची देखरेख या डॉक्टरांच्या अधिपत्याखाली करुन आणि मग त्याची ट्रीटमेंट करण्याची सुविधा आम्ही इथं केली. त्याच्या मागचं कारण असं आहे की, तो जर गावात पेशंट राहिला तर त्याचं मनोधैर्य मजबूत होतं आणि तो लवकर कव्हर होण्याच्या दृष्टीकोनातून म्हणून हे क्वारांटाईन सेंटर स्थापन करण्याची आमची संकल्पना होती. असंच जर इतर ग्रामपंचायतीनं केलं तर जो सरकारी यंत्रणेवर ताण येतो आहे. तो कमी होवून पेशंटची संख्या कमी होईल व कोरोना हा लवकरात लवकर हा हद्दपार होवू शकतो. एव्हढं आवाहन मी पाटोदा ग्रामपंचायतच्या वतीनं करतो.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक  असल्याचं, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६२ शतांश टक्क्यांवर आला आहे, कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपचारांच्या नियोजनसह प्रशासन सज्ज असल्याचं गव्हाणे यांनी सांगितलं.

****

टाळेबंदीच्या काळात परभणी जिल्ह्यातल्या ऑटो रिक्षा मालकांकडून, बँका किंवा फायनान्स कंपन्या करत असलेली कर्जाची हप्ते वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी, प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना काल याबाबत एक निवेदन सादर करण्यात आलं. राज्य शासनानं चालू वर्षी दीड हजार रुपये मदत केली, मात्र ती तुटपुंजी आहे. या वर्गाची आर्थिक स्थिती सध्या नाजुक असल्यामुळे, सक्तीची हफ्ते वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी संघटनेनं केली आहे.

****

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात या तीनही कंपन्याच्या सहा संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. वीज कर्मचाऱ्यांना आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, शासनानं वीज कर्मचाऱ्यांचं बदललेलं वैद्यकीय विमा धोरण मागे घ्यावं, एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोना संसर्गानं मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी तीस लाख रुपये रक्कम पन्नास लाख करावी, कोविड काळात कर्मचाऱ्यांना वीजबील वसुलीची सक्ती करु नये, यासह अन्य मागण्या, आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. कोरोना काळात २४ तास वीज पुरवठा सुरळीत ठेवत असतांना, राज्यात ४०० वीज कामगार मरण पावले आहेत. तसंच या कामगारांच्या कुटूंबातले अनेक सदस्य कोरोना बाधित होऊन मृत्यू पावले आहेत. या काम बंद आंदोलनादरम्यान, आंदोलन काळात रूग्णालयं आणि महत्वाची कार्यालयाची सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे, वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून, कार्यालयात लेखणी बंद आंदोलन करण्यात येत आहे. तथापि वीज बील वसूली यासारखी काम बंद राहतील असं सांगण्यात आलं आहे. औरंगाबाद, नांदेड तसंच परभणी जिल्ह्यातले कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप पिकविमा नुकसानभरपाईच्या मागणीसाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी, काल मुंबईत कृषीमंत्री दादा भुसे तसंच कृषी सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-२०२० अंतर्गत, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या १४ लाख ५३ हजार ५४० शेतकऱ्यांनी, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या हप्त्यापोटी शेतकरी, राज्यशासन आणि केंद्र शासनानं मिळुन, एक हजार ११२ कोटी रुपयांचा प्रीमियम भरला आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी, पीक विम्यापासून वंचित १३ लाख ११ हजार ४२० शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासंदर्भात  पाठपुरावा करत राहणार आहे, असं खासदार निंबाळकर यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यात बावी, आणि भूम तालुक्यातल्या सोन्नेवाडी इथं, खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण शिबीरात कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद यांनी, बियाणं उगवण क्षमता तपासणी घरगुती बियाणं वापर, याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. उत्पादन वाढवण्यासाठी बी.बी.एफ. हे तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर असून, शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा, असं त्यांनी सांगितलं.

//********//

 

  

No comments: