Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
'यास' चक्रीवादळाचा
तडाखा ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसला असून, त्यानंतर आता या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही
बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत,
राज्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा, हवामान विभागाने
दिला आहे. जालना, नांदेड, लातूर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, अकोला, अमरावती,
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. छत्तीसगड लगतच्या
गोंदिया, गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये 'यास'चा सौम्य प्रभाव पडू शकतो, असं विभागानं
सांगितलं आहे.
****
पंजाब नॅशनल
बँकेचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला
अटक करण्यात, डॉमिनिका या देशातल्या पोलिसांना यश मिळालं आहे. लवकरच त्याला अँटिगुआच्या
पोलिसांच्या ताब्यात सोपवलं जाणार आहे. पंजाब
नॅशनल बँकेचं कर्ज बुडवून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे दोघेही फरार झाले.
मेहुल अँटिगुआ इथं लपल्याची माहिती भारताला मिळाली होती, पण तीन दिवसांपूर्वी तो तिथून
फरार झाला होता. अखेर डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला
अटक केली.
****
समाज माध्यमावरील
एखाद्या संदेशावरून देशाच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला बाधा पोहोचत असेल, आणि
दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नसेल, तर व्हॉट्सॲप या समाज माध्यमाला संबंधित संदेशाचं
उगमस्थान विचारणं, हे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत नाही, असं इलेक्ट्रॉनिक्स
आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. सर्व नागरिकांच्या गोपनीयतेचा अधिकार
अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही देखील
सरकारची जबाबदारी असल्याचं, माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं
आहे. जेव्हा देशाच्या एकात्मता आणि सुरक्षिततेचा प्रश्न येईल, तर संदेशकर्त्याचा तपास
या पद्धतीनं केला जाईल, या प्रक्रियेला कायद्याचं संरक्षण देखील असेल, असं मंत्रालयानं
म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरणाच्या पथकर नाक्यांवरून, अगदी गर्दीच्या वेळीदेखील दर दहा सेकंदाला एक गाडी
बाहेर पडली पाहिजे, त्यापेक्षा जास्त वेळ लागू नये, यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी
करण्यात आल्या आहेत. शंभर मीटरपेक्षा जास्त लांबीची रांग लागू नये अशीही सूचना यात
करण्यात आली आहे. फास्ट टॅग लागू केल्यापासून पथकर नाक्यांवर वाहनांना लागणारा वेळ
अत्यंत कमी झाला आहे, त्यामुळे काही कारणाने पथकर नाक्यावर वाहनांची रांग लागली, आणि
ती शंभर मीटरपेक्षा लांब असेल, तर वाहनांना पथकर न भरता सोडावं, अशी सूचना, राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकारणानं जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. प्रत्येक पथकर नाक्यावर
शंभर मीटर अंतरावर एक पिवळ्या रंगाचा पट्टा असणं अनिवार्य आहे, असंही या निवेदनात म्हटलं
आहे.
****
देशात आतापर्यंत
२० कोटी २६ लाख ८५ हजार ८७४ नागरीकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. काल
दिवसभरात १८ लाख ८५ हजार ८०५ नागरीकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
सांगितलं.
दरम्यान, देशात
कोविड बाधितांच्या संख्येत घट होत आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० पूर्णांक एक
दशांश टक्के इतका झाला आहे. काल दोन लाख ८३ हजार १३५ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत,
दोन कोटी ४६ लाखाहून अधिक रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल नव्या दोन लाख
११ हजार रुग्णांची नोंद झाली, तर तीन हजार ८४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ९३ झाली असून, या संसर्गानं
आतापर्यंत, तीन लाख १५ हजार २३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २४ लाख १९
हजार ९०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी येत्या रविवारी ३० मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
पीएम केअर फंडातून
मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी, राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. पीएम केअरच्या
माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी, ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाले
असून, मुंबई उच्च न्यायालयानेही केंद्राला याबाबत उत्तर देण्यास सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर
पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
****
बीड जिल्ह्यात
आष्टी तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना बाधितांचा आकडा पाहता, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ
गड ट्रस्ट च्या वतीनं, दहा कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. या सेंटर्स वर ग्रामीण
भागातले रूग्ण मोठ्या संख्येनं भरती झाले आहेत. चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन या स्वयंसेवी
संस्थेनं, आष्टी इथल्या कोविड केयर सेंटरला पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment