Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ३० मे २०२१ सकाळी ७.१० मि.
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन
श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक
नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा,
हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज
सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
राज्याच्या अनेक भागात मान्सूनपुर्व जोरदार पाऊस; अंगावर
वीज पडून ५ जणांचा मृत्यू
**
कोविडमुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांना केंद्रीय विद्यालयात
मोफत शिक्षण तर वयाच्या २३ व्या वर्षी दहा लाख रुपये देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
**
आगामी पावसाळ्यात कोविड संसर्ग वाढण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर वेळीच कोविड आजाराची लक्षणं
ओळखून उपचार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे डॉक्टरांना निर्देश
**
राज्यात २० हजार २९५ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात
६६ जणांचा मृत्यू तर एक
हजार ५९९ बाधित
आणि
**
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी
कुटूंबाची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
****
मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात काल जोरदार मान्सूनपुर्व पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह
झालेल्या या पावसात अहमदनगर, नाशिक आणि
लातूर जिल्ह्यात अंगावर वीज पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी विद्युत खांब आणि तारा
निखळून पडल्या. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली.
विदर्भातील वाशिम, बुलडाणा, नागपूर,
वर्धा तसंच जळगाव या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
मराठवाड्यातही काल औरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि
हिंगोली जिल्ह्यात रोहिण्या बरसल्या. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या
पिरु पटेलवाडी इथं शेतात झाडाखाली थांबलेल्या आजी आणि नातीचा अंगावर वीज पडून काल
सायंकाळी मृत्यू झाला. जिल्ह्यात निलंग्यासह देवणी, येरोळ
इथेही पावसानं हजेरी लावली. यामुळे शेतमालाला मोठा फटका बसला आहे.
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं झालेल्या मुसळधार पावसामुळं जवळपास ५०
घरांवरील पत्रे उडून गेली. यामुळे घरातील वस्तूंचे मोठं नुकसान झालं. विद्युत खांब
आणि तारा तुटल्या. कळमनुरी तालुक्यातही आखाडा बाळापूर, नांदापूर, दांडेगाव या भागातही जोरदार
पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात जळगाव रस्त्यावरील गोळेगाव इथं पावसामुळं पुल वाहून
गेल्यानं वाहतूक ठप्प झाली. औरंगाबाद शहरातल्या पडेगाव परिसरात धुळे सोलापूर
महामार्गावर गॅस घेवून जाणाऱ्या एका टँकरवर वडाचं झाडं उन्मळून पडल्यानं या मार्गावरचीही वाहतूक काही काळ खोळंबली होती.
परभणी जिल्ह्यात पुर्णा, मानवत आणि जिंतूर
तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे बागायती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी
वादळी पाऊस झाला. या पावसामुळे येरमाळा इथल्या बसस्थानकतील
निवासी शेडवरील तसंच उपळाई इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रे उडून गेली.
कडब्याच्या गंजीही उडाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, येत्या चार दिवसांत मराठवाड्यात सर्वच
जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठानं व्यक्त केली आहे.
****
कोविडमुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांना केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षण
तसंच वयाच्या २३ व्या वर्षी या मुलांना पीएम केअर फंडातून दहा लाख रुपये दिले
जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ही घोषणा केली.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल
यासंदर्भात एक बैठक झाली. बालकं देशाचं भविष्य आहेत, त्यांचं
भविष्य उज्ज्वल होईल आणि ते एक उत्तम नागरिक बनतील याकरिता, या
मुलांच्या सुरक्षेसाठी शक्य ती पावलं उचलणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. लाभार्थी
मुलांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल, असंही पंतप्रधानांनी जाहीर केलं.
****
दरम्यान, कोविड संसर्गामुळे आईवडील किंवा दोघांपैकी
एकाचा मृत्यू झालेल्या बालकांची माहिती बाल स्वराज पोर्टलवर देण्याचं आवाहन
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं राज्य सरकारांना केलं आहे. संरक्षण आणि
देखभालीची आवश्यकता असलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी कार्यरत या पोर्टलवर आयोगाने
कोविड केअर नावाने एक लिंक दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या लिंकवरून बालकांची
माहिती भरणं अपेक्षित आहे.
****
आगामी पावसाळ्यात कोविड संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांनी
वेळीच कोविड आजाराची लक्षणं ओळखून उपचार सुरु करावेत असे निर्देश मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोविडसंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या दोन
दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन करतांना ते काल बोलत होते. नागरिकांनी कोविडचा आजार
अंगावर न काढता, तत्काळ उपचार घेण्याचं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी केलं. या ऑनलाईन परिषदेत जवळपास २१ हजार ५०० डॉक्टर्स सहभागी
झाले. दुसऱ्या लाटेत तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसतोय तर तिसऱ्या लाटेत
बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात त्यामुळे यादृष्टीने अधिक सावधानता बाळगली पाहिजे
असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोविड काळात केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी
डॉक्टरांचे आभार मानले.
****
कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं
असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातल्या धाड इथं कोविड सुश्रुषा केंद्राचं
लोकार्पण दरेकर यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. आमदार श्वेता महाले
यांच्या प्रयत्नातून हे केंद्र उभं करण्यात आलं आहे.
****
राज्यात काल २० हजार २९५ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५७ लाख १३ हजार २१५
झाली आहे. काल ४४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९४ हजार ३०
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे.
काल ३१ हजार ९६४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५३ लाख ३९
हजार ८३८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ४६ शतांश टक्के झाला आहे. सध्या
राज्यभरात दोन लाख ७६ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल एक हजार ५९९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर ६६ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला.
मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २४, औरंगाबाद २३, उस्मानाबाद आठ, नांदेड पाच, जालना
चार, तर परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका
रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५३६ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ३०३, औरंगाबाद जिल्ह्यात २२८, नांदेड १८३, लातूर १८१, जालना ७२, परभणी ६७,
तर हिंगोली जिल्ह्यात २९ नवे रुग्ण आढळून आले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या आकाशवाणी वरच्या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा
२४ वा भाग असेल. सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन हा
कार्यक्रम प्रसारित होईल.
****
ग्रामीण डाकसेवक नोकरभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १० जून २०२१ पर्यंत
वाढवण्यात आली आहे. कोविड आणि तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भरती
प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवण्यात यावी, अशी विनंती मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल यांना, टपाल विभागाचे स्थानीय लोकाधिकार समिती सरचिटणीस अजित परब यांनी केली
होती. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं
आवाहन टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार समितीनं केलं आहे.
****
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी कुटूंबाची
उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल
ही माहिती दिली. मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन,
जैन, शीख, पारसी आणि
ज्यू या अल्पसंख्याक समाजातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना वसतिगृहामध्ये
विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी आता या विद्यार्थ्यांच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न
मर्यादा अडीच लाख रुपयांवरून ८ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या
विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये पुरवण्यात येणाऱ्या खोलीभाडं, पाणी, वीज इत्यादी सुविधांचं शुल्क पूर्णपणे माफ
असेल, असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भातला शासन निर्णय जारी
करण्यात आला आहे.
****
‘कोरोना विषाणू संसर्गाची’ लक्षणं
दिसू लागताच तत्काळ औषधोपचार केले तर ४० टक्के रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी
व्यक्त केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन संवाद’ उपक्रमात ते काल बोलत होते. इथून
पुढचं जग हे ‘प्री कोविड' आणि पोस्ट
कोविड युग’ म्हणून ओळखलं जाणार आहे. त्यामुळे मास्क वापरणे,
गर्दी टाळणे आणि आजारावर तत्काळ उपचार या त्रिसुत्रतीचा अवलंब करावा,
असं डॉ लहाने यांनी नमूद केलं.
****
कोविडग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी रोटरी क्लब लातूरच्यावतीनं देण्यात
आलेल्या प्राणवायू कॉन्स्ट्रेटरच्या २५ यंत्रांचं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या
हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. कोविड १९ प्रादुर्भावाचं संकट अद्याप टळलं नसून जो पर्यंत संपूर्ण
लसीकरण होणार नाही तो पर्यंत नागरिकांनी मार्गदर्शक नियमावलींचं पालन करावं, असं आवाहन देशमुख यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ९५० गावांमध्ये आज केंद्र सरकारच्या सात
वर्षपूर्तीनिमित्त भाजपच्या वतीनं कोरोनासंबधी सेवाकार्य केलं जाणार आहे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी ही माहिती दिली. आशा सेविका आणि कोरोना
योद्ध्यांचा सत्कार, मास्क तसंच सॉनिटायझर वाटप, रक्तदान शिबीर, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी औषधी
वाटप, दिव्यांगाना लसीकरणास मदत यासह या साडे नऊशे
गावांमध्ये स्वच्छता अभियानही राबवलं जाणार आहे. मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे
निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असं, औताडे यांनी स्पष्ट केलं.
नांदेड जिल्ह्यात आज ९४ केंद्रांवर कोविड लसीकरण होणार असल्याची
माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. परभणी शहरात मात्र आज
कोविड लसीकरण बंद राहणार आहे. महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी ही माहिती
दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण
झाल्याच्या निमित्ताने उस्मानाबाद इथं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोविड
योद्धे यांचा सत्कार केला जाणार आहे. जिल्ह्यात लोहारा इथं भाजपा तालुका शाखेच्या
वतीने कोविड नियम पाळून महसूल तसंच आरोग्य विभागासह पोलिस अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात शेती विषयी तंत्रज्ञानाचा ई-मोबाईल पॉकेट बुक आणि ई
साहित्याच्या माध्यमातून तरूण कृषी अधिकारी तथा नानाजी देशमुख कृषी संजीवनी
प्रकल्प अर्थात पोकरा चे जिल्हा प्रमुख समन्वयक सचिन पांचाळ यांच्याकडून प्रसार
केला जात आहे. याविषयी सविस्तर माहिती देत आहेत, आमचे
वार्ताहर .....
कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना समजेल अशा
भाषेमध्ये पी.डी.एफ. स्वरुपात ई-मोबाईल पॉकेट बुक माध्यमातुन मिळत आहे. तीन मोबाईल
ई पॉकेट बुक, ८९ माहिती पत्रिका यांची निर्मिती केली असून यासंदर्भात तंत्रज्ञानानाचे
३८ व्हिडिओ तयार केले आहेत. प्रत्येक गावाकरीता व्हाटसअप चे ग्रुप तयार करुन हे डिजीटल
कृषी साहित्य प्रसारीत करण्यात येत आहे. ही माहिती अत्यंत आकर्षक उपयुक्त असल्याने
शेतकऱ्यांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील
वैयक्तिक लाभाच्या घटकांविषयी डिजीटल ई-साहित्य निर्माण केल्यामुळे तंत्रस्नेही शेतकरी
संख्या वाढत आहे, आणि डिजीटल पद्धतीने शेती करून शेती उत्पादन दुप्पट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा
उपयोग होताना दिसत आहे. देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद
****
दिव्यांग कल्याण निधी खर्च न करणारी परभणी जिल्हा परिषदेची समाज कल्याण समिती
तत्काळ बरखास्त करुन अराजकीय समाज कल्याण समिती स्थापन करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात
आली आहे. २०२०-२१ साठीचा निधी मार्च महिन्यापर्यंत खर्च न केल्याने जिल्ह्यातील
अनेक दिव्यांग सक्षमीकरणापासुन वंचित राहिले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे असं
पक्षानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिकाऱ्यांनी
निश्चित केलेल्या दराबाबत फेरविचार करावा, या
मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीनं काल निदर्शनं करण्यात
आली. २७ मे पासून लागू केलेले हे दर मागच्या वर्षीचे असल्याचं, संघटनेकडून सांगण्यात आलं. गेल्या वर्षभरात इंधन दरवाढ, गाड्यांच्या सुट्टया भागांची दरवाढ, चालकांची
पगारवाढ, करवाढ, आणि इतर बाबी विचारात
घेऊन, या दरपत्रका बाबत फेरविचार करण्याची मागणी संघटनेचे
संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांनी केली आहे.
****
परभणी जिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन तसंच तुरीच्या पीक विम्याचे ६९
कोटी ३२ लाख ८५६ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपूर्वीच वर्ग करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम
यांनी केली आहे. कदम यांनी काल कृषी आयुक्त धीरजकुमार तसंच कृषी मुख्य सांख्यिकी
उदय देशमुख यांची भेट घेत याबाबतचं निवेदन सादर केलं. शासनाने जाहीर केलेल्या
निकषाप्रमाणे शासकीय पंचनामे गृहीत धरुन जिल्ह्यातल्या १ लाख ४ हजार ६८९
शेतकऱ्यांच्या ८५ हजार ४९ हेक्टर बाधीत क्षेत्राचा पिकविमा परतावा अदा करावा,
असंही या निवेदनात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातले शहीद
जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्या पार्थिवावर
काल रात्री परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील महागाव या त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. हवाई दलात पठाणकोट इथं तैनात जवान जिजाभाऊ मोहिते शहीद झाले होते.
****
दक्षिण सोलापूर इथल्या लवंगी नदीत काल दुपारी एकाच परिवारातील
९ ते १३ वर्षे वयोगटातील चार मुले वाहून गेल्याची घटना घडली. वडीलांसोबत नदीवर पोहायला
आलेली ही मुले अचानक नदीच्या प्रवाह अचानक वाढल्यामुळे वाहून गेल्याचं
आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे.
//**************//
No comments:
Post a Comment