Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २८ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन
श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक
नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा,
हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज
सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
एकदम टाळेबंदी न उठवता, १ जूननंतर टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी
करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे
निर्देश
** राज्यात २१
हजार २७३
कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ६५ जणांचा मृत्यू तर एक हजार ९०७ बाधित
**
तौक्ते चक्रीवादळातील आपदग्रस्तांना वाढीव दरानं मदत देण्याचा तसंच
चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्याचा राज्य
मंत्रीमंडळाचा निर्णय
**
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची तर
राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची नियुक्ती
आणि
**
मराठवाड्यात येत्या ३१ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
****
एकदम
टाळेबंदी न उठवता, १ जूननंतर टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे,
असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून
ट्वीट करण्यात आलं आहे. रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला, तरी १० ते १५ जिल्ह्यांत
रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत, शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यात सरसकट टाळेबंदी हटवली
जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत मंत्रिमंडळाच्या
बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या संदर्भातील नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर
करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या २१ जिल्ह्यांत बाधितांची संख्या अजूनही दहा टक्क्यांवर
आहे, त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत ते तूर्त उठवले जाणार नाहीत. एक जून नंतरही हे
निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत
झालं असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान,
प्रतिबंधित क्षेत्रातले निर्बंध ३० जून पर्यंत कायम ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारनं
दिले आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठवण्याबाबत निर्णय
घ्यावा, असं केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे.
****
राज्यात काल २१ हजार २७३
कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ५६ लाख ७२ हजार १८० झाली आहे. काल ४२५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९२ हजार २२५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६३ शतांश टक्के
झाला आहे. काल ३४ हजार ३७०
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५२ लाख ७६
हजार २०३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९३ पूर्णांक दोन
दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
तीन लाख एक हजार ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल एक हजार ९०७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर ६५ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये
लातूर जिल्ह्यातल्या २२, औरंगाबाद १२, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी
आठ, हिंगोली पाच, नांदेड चार, तर परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा
समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ६०३ रुग्ण आढळले. उस्मानाबाद
३५६, औरंगाबाद २९९, नांदेड २०१, लातूर १९३, परभणी १२२, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी ८५ रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात काल म्यूकरमाकोसिसचे ७४ रुग्ण आढळले. या आजारानं जिल्ह्यात बुधवारी सहा जणांचा,
तर काल पाच जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात या आजाराचे ३११ रुग्ण आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यात संसर्गाच्या प्रमाणात घट झाली असून, मृत्यूदरही गेल्या दोन महिन्यांच्या
तुलनेत कमी झाला आहे. जिल्ह्यात विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करून कोरोना विषाणू
संसर्गाची दुसरी लाट थोपवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. याविषयी आधिक माहिती
देत आहेत, आमचे वार्ताहर
हे यश मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने
मार्च महिन्याच्या सुरूवाती पासून निर्बंध लागू करण्याला सुरूवात केली होती. कोरोना
तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी केंद्र तसेच सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या
सहकार्याने संशयीत रूग्णांचा शोध घेण्यासाठी कोरोना तपासणी शिबीरं घेण्यात आली. या
काळात कोरोना बाधीत आढळून आलेल्या रूग्णांना गृह विलगीकरण, संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात
येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तर गंभीर रूग्णांना रूग्णालयात दाखल करून बरं
करण्यात आले. या सर्वांचा परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यात
झाला आहे. आनंद कल्याणकर, आकाशवाणी वार्ताहर, नांदेड
****
राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना केंद्र शासनानं
निर्धारीत केलेल्या दरापेक्षा वाढीव दरानं
मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कपड्यांच्या आणि घरगुती भांडी, इतर वस्तुंच्या नुकसानीपोटी प्रति
कुटुंब पाच हजार रुपये, घरांच्या नुकसानीपोटी दीड लाख
रुपये प्रति घर, अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी
१५ हजार ते ५० हजार रूपये, तर झोपड्यांसाठी १५ हजार रुपये
प्रति झोपडी, अशी मदत देण्यात येणार आहे.
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ५० हजार रूपये प्रति हेक्टर, नारळासाठी २५० रुपये प्रति झाड, सुपारीसाठी ५० रुपये प्रति झाड मदत दिली जाणार आहे. याशिवाय दुकानदार तसंच
टपरीधारक, मत्स्य व्यवसायिक
यांनाही मदत दिली जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्याचा
निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एप्रिल २०१५ पासून जिल्ह्यात दारुबंदी लागू केल्यानंतर मोठ्या
प्रमाणावर वाढलेले अवैध दारुचे प्रमाण, वाढलेली गुन्हेगारी
याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरातील दारुबंदीबाबत
सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली
होती, या समितीने नऊ मार्च २०२१ रोजी सादर केलेल्या अहवालात, बहुसंख्य संघटना, नागरीक
आणि रहीवाशांनी दारुबंदी मागे घेण्याच्या दिशेनं
कौल दिला असल्याचं, नमूद केलं होतं.
****
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील
आरक्षणासंदर्भात येत्या मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. काल झालेल्या
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्यावर चर्चा होऊ शकली नाही. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत
काँग्रेस पक्ष ठाम असल्याचं पक्षाच्या अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. लोकशाहीच्या मार्गाने
महाविकास आघाडी या मुद्यावर चर्चा करेल आणि जो निर्णय घेतला जाईल तो मान्य असेल, असं
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या
उसाचा चालू गाळप हंगाम संपला असून, या हंगामात यंदा एक हजार बारा लाख टन उसाचं गाळप होऊन, अंदाजे १०६
लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. सरासरी एकशे चाळीस दिवस चाललेल्या या हंगामात,
साडेदहा टक्के साखर उतारा मिळाल्याचंही ते म्हणाले. यंदाच्या हंगामात उसाला सर्वाधिक
दर देणारे पहिले दहाही कारखाने, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले असल्याचं गायकवाड
यांनी सांगितलं. इथेनॉल निर्मिती मध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं सांगत, ते म्हणाले..
या वर्षीचा गळीप हंगाम सरासरी
१४० दिवस चालला. त्याचबरोबर ज्या साखर कारखान्यांना आज आपल्याला शेतकऱ्यांच्या मनामध्ये
जो प्रश्न आहे की सरासरी रिकव्हरी दहा पन्नास म्हणजे कमी आली. या बहुतेक कारखान्यांनी
यावर्षी इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. उसाच्या रसापासून जेवढं इथेनॉल बनवलं
त्याचं कॅल्क्युलेशन शास्रज्ञामार्फत करुन, त्याचं प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन ती
रिकव्हरी याच्यामध्ये वाढवणार आहोत. म्हणजे एखाद्या कारखान्याची सव्वा टक्के रिकव्हरी
कमी दिसत असली तसेच सव्वा टक्के जास्त रिकव्हरी गृहीत धरुन शेतकऱ्यांना पैसे मिळणार
आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या काही कारखान्यांनी अतिशय विक्रमी काम केलं. त्यामध्ये
हंगामातील सर्वाधिक दिवस हे जालन्यामधल्या अंकुशराव टोपे कारखान्याचे २०८ दिवस कारखाना
चालला.
****
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर जेष्ठ साहित्यिक
सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय डॉ. नागनाथ कोतापल्ले, फ. मुं. शिंदे, डॉ. प्रज्ञा दया पवार, प्रेमानंद गज्वी, भारत सासणे, डॉ.
रामचंद्र देखणे, डॉ. रविंद्र शोभणे, विलास
सिंदगीकर, शामराव पाटील, दिनेश आवटी,
धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, प्रा. रंगनाथ पठारे, विनोद शिरसाठ, यांच्यासह
२९ जणांची साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त सदस्यांचं मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केलं
आहे.
****
राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची
अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.अरुण भोसले,
राहुल देशमुख, आसाराम लोमटे, निखिलेश चित्रे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. सदाशिव पाटील, प्रा. संजय ठिगळे, डॉ. कृष्णदेव गिरी, डॉ. विशाल इंगोले, डॉ. निंबा देवराव नांद्रे, प्रा. संतोष पवार,
मनिषा उगले, भाऊसाहेब चासकर, उल्हास पाटील यांच्यासह ३० जणांची मराठी विश्वकोष
निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षणाबाबत राज्याच्या दौऱ्यावर असलेले खासदार संभाजीराजे
छत्रपती यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भुमिका घ्यावी, त्यासाठी सर्व नेत्यांना एकत्र आणण्याची विनंती आपण पवार यांच्याकडे केल्याचं
खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. या मुद्यावर खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
****
बंगालच्या
उपसागरात आलेल्या यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, हवामान
विभागानं येत्या ३१ तारखेपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात
कन्नड तालुक्यात ताड पिंपळगाव, चापानेर तसंच पैठण तालुक्यात
पाचोड आणि परिसरात तसंच खुलताबाद तालुक्यात काल वादळी
वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे झाडं उन्मळून पडली तर बाजरी, ऊसाच्या
पिकांचं नुकसान झालं. जालना
शहरासह घनसावंगी तालुक्यात काल पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, तसंच परभणी जिल्ह्यातल्या
पूर्णा इथंही काल मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यातही काल दुपारी पाऊस झाला. जिल्ह्यात उद्यापर्यंत तुरळक
ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर वेगानं वादळी वारं वाहण्याची, तसंच विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय
म्हणून काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. नागरिकांनी विजेच्या
खांबासमोर किंवा वीज वाहक मनोऱ्याच्या जवळ न थांबण्याचं, शेतात
कामं असतील तर उघड्यावर असताना विजांची काळजी घेण्याचं आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी डॉक्टर शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना सिंचन प्रकल्पातून दुधना नदी काठच्या
गावांच्या टंचाईच्या निवारणाकरता, आज सकाळी साडे नऊ
वाजेपासून नदी पात्रात, तीन हजार ५६ घनफूट प्रतीसेकंद वेगानं
पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांनी सतर्क रहावं,
नदीपात्रात उतरु नये, तसंच गुरं नदीपात्रात
उतरु देऊ नये, शेतीची अवजारं, विद्युत
पंप तातडीनं काढून घ्यावेत, असे निर्देश प्रशासनानं दिले
आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या `आयटक` संलग्न
संघटनेच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी, काल
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात,`निषेध दिन` पाळला. दिल्लीच्या सीमेवर सुरू
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ, यावेळी काळ्या फिती लावून आणि काळे झेंडे फडकवून निषेध व्यक्त करण्यात
आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर शहरात नव्यानं बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा
योजनेचं उद्धाटन, आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते काल
झालं. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आगामी तीस वर्षात अर्धापूर शहराचा
विस्तार गृहीत धरून, ही पाणीपुरवठा योजना आखली असल्याचं
राजूकर यावेळी म्हणाले.
****
लातूर
जिल्ह्यात कोविड साथीमुळे मृत्यु पावलेल्या एक हजार ६९० व्यक्तींच्या कुटुंबांना केंद्र
आणि राज्य सरकार पुरस्कृत योजनांचा लाभ देऊन मदत केली जाणार असल्याचं पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल
पत्रकार परिषदेत सांगितलं. ते
म्हणाले,
लातूर जिल्ह्यातल्या दहा तहसीलदारांना
या सुचना दिल्या आहेत की, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार यांच्या ज्या सगळ्या योजना
आहेत. या बाधित कुटुंबियांना त्या योजनांचा लाभ तातडीने ते मिळून देत आहेत. एवढच नव्हे
तर एखाद्या कुटुंबाचंं छत्र हरवलं असेल तर त्या कुटुंबाला देखील एक दत्तक योजना जिल्हा
प्रशासनानं तयार करावी. विधवा असतील त्यांना उपजीवीकेचं साधन आता हरवलं आहे. त्यामुळे
ते साधन त्यांना उपलब्ध करुन देण्यासंदर्भामध्ये आणि काही मुलं अनाथ झाली असतील त्यांना
देखील दत्तक ते स्वत:च्या पायावर उभे राहिपर्यंत घेण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.
त्याची सविस्तर योजना आम्ही आखत आहोत. आणि या सगळ्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने आधार
मिळाला पाहिजे या मागची ती भावना आहे.
****
कोविड १९ आजारामुळे आई-वडीलांचं छत्र हरवलेल्या अनाथ मुलांना दरमहा तीन
हजार रूपये निर्वाह भत्ता सुरू करून, त्यांना
शासनानं मोफत शिक्षण द्यावं, अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्याकडे, एका निवेदनाव्दारे केली आहे.
****
टाळेबंदी असतांनाही परभणी शहरात अनेक आस्थापना सुरू असल्याचं आढळून आलं असून, काल महानगरपालिच्या पथकानं शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तीन झेरॉक्स दुकांनदारांना प्रत्येकी दोन
हजार रूपये, आणि एका हॉटेल चालकाला अडीच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment