Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २६ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन
श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक
नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा,
हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज
सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
ग्रामीण भागातली कोरोना विषाणू संसर्गाची साखळी
तोडण्यासाठी बाधित रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
**
बांधकामासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांशी संबंधित दुकानं आणि व्यवसायांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याचा
राज्य सरकारचा निर्णय
**
राज्यात २४ हजार १३६ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात
८३ जणांचा मृत्यू तर दोन हजार ७२७ बाधित
**
पदोन्नतीतलं आरक्षण कायम ठेवण्यावर काँग्रेस पक्ष ठाम; राज्य
सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
**
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला
देण्याची मागणी
करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल
आणि
**
राज्यात हमीभावानं करण्यात येणाऱ्या हरभरा खरेदीस २५
जूनपर्यंत मुदतवाढ
****
राज्यात ग्रामीण भागातली कोरोना विषाणू संसर्गाची साखळी
तोडण्यासाठी बाधित रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर
द्यावा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. कोविडसह म्युकरमायकोसिसच्या राज्यातल्या परिस्थितीसह
उपाययोजनांची आढावा बैठक काल उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी
ते बोलत होते. ज्या गावांमध्ये बाधितांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी सरसकट
चाचण्या कराव्यात, ग्रामदक्षता समित्यांना
अधिक क्षमतेनं कार्यान्वित करावं, कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरिप हंगामाच्या
पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती अवजारांची दुकानं
शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरु ठेवण्याचे नियोजन करावं, आदी सूचना पवार यांनी
दिल्या. राज्यातल्या रुग्णालयांचे
ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट
तातडीने करावं, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिस
आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करावी, असे निर्देशही पवार
यांनी दिले.
****
म्युकरमायकोसीस या आजारावरील उपचारासाठी आवश्यक ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनच्या
६० हजार कुप्या, जूनच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय
स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते काल मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत
होते. महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे दोन हजार २४५
रुग्ण आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचं नियंत्रण केलं जात आहे, असं टोपे म्हणाले.
****
नादुरुस्त
व्हेंटिलेटर बदलून देण्यासंदर्भात केंद्र शासनाचं काय धोरण आहे, अशी विचारणा मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं केली आहे. निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरबाबत
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेऊन न्यायालयानं स्वत:हून दाखल केलेल्या
सुमोटो याचिकेवर काल सुनावणी झाली. यासंदर्भात केंद्र शासनाचे वकील असिस्टंट सॉलिसिटर
जनरल अजय तल्हार यांनी शुक्रवार पर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले
आहेत. नादुरुस्त व्हेंटिलेटर प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, अशी ताकीदही खंडपीठानं
राजकीय नेत्यांना दिली आहे.
****
राज्यात काल २४ हजार १३६ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५६ लाख २६ हजार १५५
झाली आहे. काल ६०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९० हजार ३४९
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६१ शतांश टक्के झाला आहे.
काल ३६ हजार १७६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५२ लाख १८
हजार ७६८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. सध्या
राज्यभरात तीन लाख १४ हजार ३६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन हजार ७२७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८३ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या
२२, बीड १८, औरंगाबाद १४, जालना १३,
उस्मानाबाद आठ, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर परभणी जिल्ह्यातल्या
दोन रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७४९ रुग्ण आढळले. परभणी ४६२, उस्मानाबाद ४०९, औरंगाबाद ३९६, जालना २३२, लातूर २१२, नांदेड २०५, तर हिंगोली जिल्ह्यात ६२ रुग्ण आढळून आले.
****
बांधकामासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकानं,
व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
१५ते २० मे च्या दरम्यान
झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित
होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांची दुरुस्ती किंवा
मजबुतीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व व्यवसायांना कोविड
नियमांचं पालन करणं बंधनकारक असून, त्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असं
यासंदर्भातल्या आदेशात म्हटलं आहे.
****
रायगड जिल्हा ऑक्सीजन हब झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायू
निर्मिती केली जात असून, अन्य जिल्ह्यांनाही इथून प्राणवायूचा
पुरवठा केला जात आहे. रायगड जिल्हा सामान्य रूग्णालयात उभारण्यात आलेल्या
प्राणवायू निर्मीती प्रकल्पाची माहिती देत आहेत, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ सुहास माने….
सदरील प्लॉंट हा ३०० लीटर कपॅसिटी
म्हणजे सात जम्बो सिलिंडर चोविस तासात तयार होतात. असा हा ३०० लीटर कपॅसिटीचा पीएसए
प्लॉंट इंन्सटॉल झालेला आहे. त्याचा टेस्ट रिर्पोट आपल्याला मिळालेला आहे. त्यानुसार ९३.३१ टक्के त्यामध्ये ऑक्सीजन आहे. टेस्ट रिर्पोट
चांगला असल्यामुळे आपण हा कार्यान्वित करत आहोत. कार्यान्वित करण्यासाठी त्याला जनरेटरचा
बॅकअप द्यावा लागतो.रायगड जिल्ह्यासाठी आणि सर्व शासकीय रुग्णालयांसाठी हा प्लॉंट जीवनदायी
आहे. कोविड पर्यंत नक्कीच त्याला महत्व आहे. आणि अशा पद्धतीनं आपण आपलं ऑक्सीजन उत्पादन
वाढवू शकतो.
****
पदोन्नतीतलं आरक्षण कायम राहिलं पाहिजे या
मुद्यावर काँग्रेस पक्ष ठाम असून, या प्रकरणी कोणतीही
तडजोड केली जाणार नाही, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मे
चा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू, अशी ग्वाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पदोन्नतीतील आरक्षण
या विषयावर राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी संघटना, विविध
सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींसोबत काल झालेल्या ऑनलाईन चर्चेनंतर, पटोले यांनी माध्यमांशी बोलताना ही भूमिका मांडली. पदोन्नतीतील आरक्षण
कायम ठेवण्याविषयी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून,
सरकारने अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटके, विमुक्त आणि इतर
मागासवर्गीय, यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कायमस्वरूपी
धोरण करावं, असं पटोले म्हणाले.
दरम्यान, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करुन
तो कोटा सर्वांसाठी खुला करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई
उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्याचवेळी या निर्णयाच्या आधारे दिल्या जाणाऱ्या पदोन्नती
या याचिकेवरील न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहतील, असंही न्यायालयानं स्पष्ट
केलं आहे.
****
तौक्ते चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाच्या
नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी घोषणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. २१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी
कोकण दौरा करून, तौक्ते चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीचा
आढावा घेतला होता, आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन
व्यवस्थित मदत दिली जाईल, कुणालाही वंचित ठेवणार नाही असं
आश्वासन दिलं होतं, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी काल ही घोषणा केली.
****
बुद्धपौर्णिमा आज साजरी होत आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. देश लवकर कोरोनामुक्त
व्हावा अशी प्रार्थना करत असल्याचं, राज्यपालांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे. तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला
आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे,
असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नोकर भरतीमध्ये प्रभावित उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी
तातडीनं मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर
करण्याचे निर्देश, मुख्य सचिवांना दिल्याचं, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत उपसमितीची बैठक
झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं मराठा समाजासाठी
घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनात
मृत्यू पडलेल्यांच्या वारसांना राज्य परीवहन महामंडळ -एसटीत
नोकरी देण्याची प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना उपसमितीनं यावेळी केल्या.
****
खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी काल उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या तुळजापूर, नांदेड आणि जालना
इथं काल मराठा समाज बांधवांची भेट घेऊन मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा केली. सरकारशी चर्चा
करून मराठा आरक्षणा संदर्भात पुढील ठोस भूमिका स्पष्ट केली
जाईल, असं यावेळी सांगितलं. यापुढे मराठा मोर्चे काढण्यापेक्षा विधी तज्ज्ञांची फळी उभारून सर्वोच्च
न्यायालयातून मराठा आरक्षण मिळवू, कायदा माणसासाठी आहे माणूस
कायद्यासाठी नाही, यामुळे घटना दुरुस्ती करण्यास आपण समाज
बांधव भाग पाडू असं ते म्हणाले. येत्या चार दिवसात राज्य सरकारशी यासंदर्भात चर्चा
करु तोपर्यंत सर्वांनी संयम पाळावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
दरम्यान, खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला द्यावा
अशी मागणी करणारी याचिका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे
यांनी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल
केली आहे. केंद्र सरकारनं एकशे तीनच्या घटनादुरुस्तीनुसार खुल्या प्रवर्गातल्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण दिलेलं आहे.
****
हिंगोली इथल्या शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये रुग्णांसोबत थांबून
सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या चाळीस जणांविरोधात, हिंगोली
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड वॉर्डमध्ये रुग्णांसोबत
त्यांच्या नातेवाईकांनी थांबू नये अशा स्पष्ट सूचना, जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी वेळोवेळी दिल्या आहेत. तरीही सदर रुग्णांचे नातेवाईक दिवसभर
थांबून त्यानंतर गावाकडे निघून जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना
कैलासवासी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा अशी मागणी
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे
निवेदनाद्वारे केली आहे. कोविडमुळे मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला विम्याचा
लाभ देण्यात यावा अशी मागणी क्षीरसागर यांनी निवेदनातून केली आहे.
****
नांदेड शहरातील श्री गुरू गोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयातील कोरोना
रूग्णाच्या नातेवाईकांना शिदोरी उपक्रमाअंतर्गत गोदावरी उद्योग समुहाच्यावतीनं
गेल्या ५ मे पासून दररोज जेवण दिलं जात आहे. दररोज ४०० ते ४५० नागरिकांना या
उपक्रमाचा लाभ मिळत आहे. मागील वीस दिवसात जवळपास आठ हजार नागरिकांना भोजन
मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबईतील अन्नदा संस्था आणि तुळजापूर नळदुर्ग भागातील परिवर्तन सामाजिक संस्था
यांनी नळदुर्ग शहरातील विधवा, निराधार, परित्यक्ता, एकल महिला तसंच गोरगरीब, गरजूंना अन्नधान्य किटचं वाटप केलं. २७२ कुटुंबाला याचा लाभ झाल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवन जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याच्या
हेतूने नांदेड जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीनं, एक साहित्यिक, एक विचार,
एक आत्मविश्वास, असा उपक्रम ऑनलाईन माध्यमातून सुरू करण्यात आला
आहे. या विषयी आधिक माहिती देत आहेत जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार.
मान्यवर जे काही साहित्यिक आहेत. त्यांना आपण बोलत करतं आहोत.
साहित्याच्या पलिकडे माणूस म्हणून कुठं उभ आहोत आपण आणि कुठल्या दृष्टीने आपल्याला
हे बळ घेऊन काळातून पूढ जावं लागेल. कुठल्या प्रकारची प्रेरणा सर्वांना घ्यावी लागेल.
कुठल्या प्रकारचा आत्मविश्वास आपल्याला सोबत बाळगावा लागेल. ते एक भाष्य त्यांच्या
शब्दामध्ये घेऊन ते पुन्हा एकदा समाजापर्यंत पोहचून आपण, प्रत्येकाची दुखलेली जी मन
आहेत, ती साधण्याचा छोटासा एक प्रयास आपण केलेला आहे. यामाध्यमातून ही चळवळ रविवार
आठवड्यातून एक दिवस, एक साहित्यीक, एक विचार, एक आत्मविश्वास असं गणित जरी झाल समजा
तरी मला वाटतं सकारात्मकतेच हे बीज जे आहे सर्वत्र वाढायला काही वेळ लागणार नाही.
****
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघामार्फत राज्यात हमीभावानं
करण्यात येणाऱ्या हरभरा खरेदीस २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय
कृषी मंत्रालयानं काल यासंबंधीचा आदेश
जारी केला. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी पणनमंत्र्यांकडे ही मुदतवाढ
करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
****
हिंगोली जिल्ह्यात बँकांनी तत्काळ पीककर्ज वाटप यंत्रणा कार्यन्वित करण्याचे
निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी दिले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील
बँकांनी पीक कर्जवाटपाची कोणतीच यंत्रणा उपलब्ध केली नसल्याने, अनेक शेतकऱ्यानी खासदार पाटील यांच्याकडे तक्रार केली होती, त्या पार्श्वभूमीवर खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यांच्यासोबत बैठक घेऊन, ही सूचना केली
****
परभणी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध
करुन दिले आहेत. शेतकऱ्यांनी ते अर्ज डाऊनलोड करून, आवश्यक
कागदपत्रांसह तलाठ्यांकडे दाखल करावे, असं आवाहन
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे. संबंधीत तलाठ्यांनी गाव निहाय अर्ज
संकलित करून, गाव ज्या बँकेकडे दत्तक आहेत, त्या बँकेकडे अर्ज जमा करावेत असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
//********//
No comments:
Post a Comment