Wednesday, 26 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 May 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

कोरोनाशी लढा देताना पर्यावरण बदलासारख्या मानवतेला भेडसावणाऱ्या इतर आव्हानांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बौद्ध पोर्णिमेनिमित्त आयोजित एका आंतरराष्ट्रीय सोहळ्यात पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. हवामान पद्धतीत बदल होत असून, नद्या, जंगलं संकटात असून, निसर्गाचा आदर करणं, ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं महत्वाची असल्याचं, ते म्हणाले. कोविड महामारीमुळे संपूर्ण देश संकटात असल्याचं सांगत, पंतप्रधानांनी, पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचे आभार मानले.

****

देशात आतापर्यंत सुमारे २० कोटी लोकांचं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १९ कोटी ८५ लाख ३८ हजार ९९९ लसी देण्यात आल्या आहेत.

देशातील ९७ लाख ७९ हजार ३०४ आरोग्य कर्मचार्यांना लसीची पहिली मात्रा, तर ६७ लाख १८ हजार ७२३ कर्मचार्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटातल्या एक कोटी १९ लाख ११ हजार ७५९ जणांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

****

दरम्यान, देशात काल नव्या दोन लाख आठ हजार ९२१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर चार हजार १५७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविडबाधितांची संख्या दोन कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ११ हजार ३८८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. तर काल दोन लाख ९५ हजार ९५५ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, दोन कोटी ४३ लाख ५० हजार ८१६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या २४ लाख ९५ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औष्णिक वीज प्रकल्पात इंधन म्हणून कोळशाऐवजी बायोमास अर्थात जैव इंधनाचा वापर करण्यासाठी, राष्ट्रीय मिशन स्थापण्याचा निर्णय, केंद्रीय उर्जा मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे शेतातील पेंढा जाळल्यानं होणारं वायू प्रदूषण आणि औष्णिक वीज प्रकल्पातील कार्बन उत्सर्जन कमी होऊन, उर्जेचे स्थित्यंतर आणि स्वच्छ उर्जेच्या स्रोतांकडे वाटचाल, या उद्दीष्टांना बळ मिळेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या राष्ट्रीय मिशनसाठी उर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक सुकाणू समिती स्थापन केली जाईल. नियोजित राष्ट्रीय मिशनचा कार्यकाळ किमान पाच वर्षांचा असेल, या मिशनसाठी उप-गट देखील स्थापन केले जाणार आहेत. हे मिशन, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातही योगदान देणार आहे.

****

देशात २०२० - २१ या वर्षात ३०५ दशलक्ष टनांहून अधिक विक्रमी अन्नधान्य उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सन २०१९ - २० मधल्या अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा सुमारे आठ दशलक्ष टनांनी हे उत्पादन अधिक असेल. शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, सरकारची धोरणं आणि राज्य सरकारांचं उत्तम सहकार्य आणि समन्वय यांच्यामुळे कृषी उत्पादनातील ही समाधानकारक स्थिती निर्माण झाली असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं. सन २०२० - २१ साठी मुख्य पिकांचे अग्रिम अंदाज कृषी मंत्रालयानं प्रकाशित केले असून, त्यानुसार भाताचं उत्पादन १२१ दशलक्ष टनांहून अधिक, तर गव्हाचं उत्पादन १०८ दशलक्ष टनांहून अधिक राहील. या काळात डाळींचं एकंदर उत्पादन २५ दशलक्ष टनांहून अधिक तर तेलबियांचं एकंदर उत्पादनही विक्रमी म्हणजे ३६ दशलक्ष टनांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे.

****

क्रीडा मंत्रालयानं देशातल्या महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये १४३ खेलो इंडिया केंद्र उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. यापैकी राज्यात ३६ खेलो इंडिया केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीनं ही केंद्र तयार केली जाणार असल्याचं, क्रीडा मंत्री किरेन रीजिजू यांनी म्हटलं आहे.  

****

बारा दिवसांच्या निर्बंधांनंतर नाशिक जिल्ह्यात काल सुरू झालेल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला. लासलगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशी कांदा भावात सुधारणा झाल्याचं दिसलं. सकाळच्या सत्रात झालेल्या कांदा लिलावात किमान ६०० ते कमाल एक हजार ७५३ रुपये, तर सरासरी एक हजार ४६० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लासलगाव बाजार आवारात सोमवारच्या तुलनेत काल दरामध्ये १५३ रुपयांची तेजी पाहायला मिळाली.

****

उस्मानाबाद इथं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने बुद्ध पौर्णिमानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यानिमित्ताने प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली आणि महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. रक्तदात्यांना यावेळी जनकल्याण समितीच्या वतीने सॅनिटायझर, मास्क, तसंच रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र, देऊन सन्मानित करण्यात आलं.

//****//

No comments: