Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
भारतीय स्टेट
बँकेनं एक जुलै २०२१ पासून बचत खातेधारकांसाठी, नवे सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय
घेतला आहे. बँकेचे हे नवे दर एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, ट्रान्सफर यावर लागू होणार
आहेत. एटीएम मधून एका महिन्यात चार वेळा मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर, त्यानंतरच्या
प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांना, १५ रूपये आणि जीएसटी असं शुल्क द्यावं लागेल. तर चार
मोफत व्यवहारानंतर सर्वच एटीएम आणि शाखेतून केलेल्या व्यवहारावर, शुल्क आकारलं जाईल,
असं स्टेट बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
संयुक्त किसान
मोर्चातर्फे उद्या देशव्यापी शेतकरी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना,
कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह, १२ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीच्या
सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर,
पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कृषी कायदे रद्द करुन कोरोना संकटाचा सामना
करणाऱ्या या दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारं पत्र शेतकरी संघटनांनी,
१२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं होतं.
****
ग्रामीण डाक
सेवक पदांच्या भरती प्रक्रियेची अंतिम मुदत १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी, मुख्य पोस्टमास्टर
जनरल हरीश अग्रवाल यांनी, टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस अजित परब
यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र पोस्ट सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या
भरतीची अंतिम दिनांक २६ मे २०२१ ही आहे. चक्रीवादळ तसंच टाळेबंदीमुळे ऑनलाईन प्रक्रिया
पुर्ण करताना इंटरनेटची समस्या येते, या सर्व परीस्थितीचा विचार करून भरती प्रक्रियेची
अंतिम दिनांक वाढवावी, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
हिंगोली इथल्या
शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये नातेवाईकांसोबत थांबून सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या
चाळीस जणांविरोधात, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड
वॉर्डमध्ये रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांनी थांबू नये अशा स्पष्ट सूचना, जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी वेळोवेळी दिल्या आहेत. तरीही सदर रुग्णांचे नातेवाईक दिवसभर थांबून
त्यानंतर गावाकडे निघून जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
मराठा आरक्षणासाठी
कोणत्याही नेत्यानं अथवा संघटनेनं मोर्चा काढला, तरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते
पक्षाचा झेंडा किंवा बॅनर न वापरता त्यामध्ये संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होतील, असं
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत
बोलत होते. मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अधिकारात असल्यानं, केंद्र सरकारची
भेट घेऊन उपयोग नाही, याबाबत केंद्र सरकारची भूमिका ही घटनेच्या एकशे दोनाव्या दुरुस्तीपुरती
मर्यादित आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
****
यंदाच्या पावसाळ्यात
किमान ९८ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यामुळे गोदावरी पात्रातून पैठणच्या
नाथसागर धरणात येणार्या पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं, अशी मागणी, अण्णा हजारे
प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासनं केली आहे. यासंदर्भात न्यासच्या वतीनं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मराठवाडा
गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पत्र पाठवलं आहे. नाथसागरात येणाऱ्या
पाण्याचं मोजमाप करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र कायमस्वरूपी बसवावं, धरण क्षेत्रात कार्यकारी
अभियंता दर्जाचं पथक नियुक्त करावं, आदी मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.
****
विहिर पुनर्भरण
ही कमी खर्चाची आणि अत्यंत प्रभावी लोकचळवळ व्हावी असं मत, पुणे इथल्या भूजल सर्वेक्षण
आणि विकास यंत्रणेचे संचालक, डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल
लातूर इथं बोलत होते. अतिशोषित वर्गवारीतल्या गावांमध्ये व्यापक प्रमाणात भूजल पुनर्भरण
आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून, केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेची जिल्हयात
सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली.
****
बीड जिल्हा प्रशासनाकडून
वैद्यकीय तज्ञांचा कृती दल गठित करण्यात आला असून, या दलाच्या मार्गदर्शनाखाली बालकांमध्ये
कोविड संसर्गाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी
आदेश दिले आहेत. जिल्ह्यात लक्षणं नसणाऱ्या आणि कमी लक्षणं असणाऱ्या मुलांच्या तपासण्या,
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी स्वतंत्र कक्ष, जिल्हा
रूग्णालयात २०० खाटांचा विशेष कक्ष सुरू करण्याचे आदेश, जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
गेल्या आठवडाभरात कोविड प्रतिबंधात्मक नियम भंग केल्याप्रकरणी, २१३ गुन्हे दाखल करण्यात
आले. विनामास्क फिरणाऱ्या ७८४ नागरिकांना एक लाख २० हजार ५५० रुपये, दुकानं सुरू ठेवणाऱ्या
९४ व्यावसायिकांना ७१ हजार ३०० रुपये, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तीन हजार ६८३ वाहनधारकांना,
आठ लाख ३९ हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
//********//
No comments:
Post a Comment