Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 May
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून
पाहणी
**
गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार
**
चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचं
कोविड संसर्गानं निधन
आणि
**
परभणी जिल्ह्यात टाळेबंदी दरम्यानची सूट दोन दिवसांसाठी रद्द
****
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
असून, नुकसान भरपाईचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल,
असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. आज सकाळी रत्नागिरी इथं नुकसानीची पाहणी आणि आढावा घेतल्यानंतर, ठाकरे बोलत होते. या नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची आमची
मागणी आहे. निकष बदलून कोकणवासीयांना दिलासा दिला जाईल,
पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. अशी वादळं दरवर्षी येत असल्यानं, भूमिगत वीज वाहिन्या,
धूप प्रतिबंधक बंधारा यासारखी कामं कायमस्वरूपी होणं आवश्यक आहेत,
त्यासाठी राज्यसरकार आवश्यक निधी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
चिपी विमानतळ सुरू करण्याबाबतचा निर्णय २५ मे रोजीच्या अहवालानंतर घेणार
असल्यानं लवकरात लवकर विमानतळ सुरू करू असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यातल्या नक्षलवादाचं उच्चाटन करण्यासाठी
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं, गृहमंत्री
दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. गडचिरोली इथं आज सकाळी झालेल्या
चकमकीत १३ नक्षलवादी मारले गेले, त्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील
पत्रकार परिषदेत बोलत होते. एटापल्ली तालुक्यातल्या जंगलात आज
सकाळी ही चकमक झाली. या चकमकीनंतर नक्षल्यांकडील बंदुका,
पुस्तकं आणि दैनंदिन वापराचं साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ठार झालेले नक्षली कसनसूर दलमचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिस आणि महसूल विभाग समन्वयानं काम करत असल्यानं दुर्गम भागाचा विकास होत आहे, दुर्गम भागात मोबाईल जोडणीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असं
वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
शिवभोजन थाळी मोफत देण्याच्या योजनेला येत्या १४ जूनपर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे. राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत
४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा नि:शुल्क लाभ घेतला
आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्र सुरु
आहेत.
****
चिपको आंदोलनाचे प्रणेते, ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं आज उत्तराखंडात ऋषीकेश
इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. अखिल
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या ऋषीकेश इथल्या रुग्णालयात बहुगुणा यांच्यावर कोविड
संसर्गासाठी उपचार सुरू होते.
गांधीविचारांचे अनुयायी असलेले बहुगुणा यांनी १९७४ साली उत्तरप्रदेशात
वृक्षतोडी विरोधात पुकारलेल्या चिपको आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. भागिरथी नदीवरच्या टिहरी धरणाच्या विरोधात बहुगुणा यांनी १९९५
मध्ये प्रथम ४५ दिवसांचं आणि पुढच्या वर्षभरात ७४ दिवसांचं उपोषण केलं होतं.
समाजातल्या वंचित घटकांसाठी त्यांनी काम केलं, अनुसूचित समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी टिहरी इथं ठक्कर बाप्पा वसतीगृह
उभारलं. पर्वतीय नवजीवन मंडळ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी
पर्यावरण संवर्धन चळवळ चालवली. पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात
केलेल्या कार्यासाठी बहुगुणा यांना १९८१ साली पद्मश्री तर २००९ साली पद्मविभुषण पुरस्कारानं
गौरवण्यात आलं होतं. याशिवाय देशविदेशातल्या विविध संस्था संघटनांकडूनही
त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
बहुगुणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त
केलं आहे. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातल्या एका गौरवशाली अध्यायाचा
अस्त झाल्याचं, राष्टपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनीही बहुगुणा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं देशभरात
अभिवादन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी
यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली. देशानं
माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही राजीवजींच्या
नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळे शक्य झाली असल्याचं, पवार यांनी आपल्या
संदेशात म्हटलं आहे.
औरंगाबाद इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात
आली. पक्षाच्या वतीनं आज घाटी रुग्णालयात रुग्णाच्या
नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण
काळे, माजी आमदार सुभाष झांबड यांच्यासह अनेक कार्यकर्ते या उपक्रमात
सहभागी झाले
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज १६ कोविड बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. यामध्ये जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
****
बीड जिल्ह्यात आज ७२० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक १०२ रुग्ण केज तालुक्यात, त्या खालोखाल
आष्टी तालुक्यात १००, शिरुर ७६, पाटोदा
तसंच माजलगाव तालुक्यात प्रत्येकी ७१, धारुर ७०, गेवराई ६६, अंबाजोगाई ६२, बीड ४८,
परळी ३५, आणि वडवणी इथल्या २० रुग्णांचा समावेश
आहे.
****
परभणी जिल्ह्यात १ जून पर्यंतच्या टाळेबंदीदरम्यानची सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत
देण्यात आलेली सूट उद्या शनिवार आणि परवा रविवारसाठी रद्द करण्यात आली आहे. नागरिकांची रस्त्यावरील गर्दी पाहता प्रशासनानं या दोन दिवसांच्या कालावधीत
किराणा दुकानं, भाजीपाला, फळविक्री यावरही
बंदी घातली आहे. या दोन दिवसांत वैद्यकीय सेवा आणि कृषी निविष्ठा
तसंच सहाय्यभूत सेवा देणाऱ्या आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात,
त्यानंतर सोमवार ते शुक्रवार पर्यंत सूट दिलेल्या आस्थापना सकाळी ७ ते
११ या कालावधीत चालू राहतील, असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी
आज जारी केलेल्या एका आदेशात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणे, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणं आणि लसीकरणावर भर देण्याच्या सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत, जिल्ह्यातल्या सर्व
यंत्रणांनी त्यानुसार प्रयत्न करण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी कौस्तुभ
दिवेगावकर यांनी केलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत,
आमचे वार्ताहर...
या आरोग्य तपासणी मोहिमेत
५९ हजार दुर्धर व्याधी असलेले नागरिक आढळले असून त्यांच्या नियमित आरोग्य तपासणी
आणि लसीकरण यावर भर दिला जात आहे. दुर्धर आजार असणाऱ्या २४ हजार नागरिकांच लसीकरण पूर्ण झालं
आहे. जिल्ह्यातल्या १५२ गावात दहापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तिथं विशेष लक्ष देण्यात
येत आहे, तर ९३ गावात अद्याप संसर्ग झालेला नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा आणि ग्रामीण रुग्णालयात ३० बेडची सोय करण्यात येत आहे.
रुग्णांसाठी पाच लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्यांना किमान चारशे ऑक्सिजन
कॉन्सनन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्याचा
संसर्ग दर अठरा टक्के असला तरीही तो पाच टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व यंत्रणांना करण्यात आल्याची
माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर
उस्मानाबाद.
****
रासायनिक खतं, पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या
निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शनं करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांना
निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
हरिहरराव भोसीकर, महिला आघाडी प्रमुख कल्पना डोंगळीकर यांच्यासह
अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
कोविड महामारी तसंच संचारबंदीच्या काळात ऑटोरिक्षा तसंच इतर
प्रवासी वाहनांच्या कर्जाचे थकीत हफ्ते वसूल करण्यास तत्काळ मनाई करावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील
यांनी केली आहे. याबाबत जलील यांनी जिल्हाधिकारी सुनिल
चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना पत्र सादर केलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment