Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 May
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** वैद्यकीय प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची मिशन ऑक्सिजन स्वावलंबन योजना
** प्रसिद्ध संगीतकार विजय पाटील उर्फ लक्ष्मण यांचं हृदयविकाराच्या
धक्क्यानं निधन
** औरंगाबाद इथं आज १८ तर जालना जिल्ह्यात ३ कोविडग्रस्तांचा
मृत्यू
आणि
** विधान परिषद बरखास्त करण्याची धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश
कार्याध्यक्ष रेवण भोसले यांची मागणी
****
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याची वैद्यकीय प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं मिशन ऑक्सिजन स्वावलंबन
योजना हाती घेतली आहे. या योजनेतंर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन
दिलं जाणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. हा निर्णय जाहीर केल्यानंतर
आमच्याकडे बऱ्याचशा उद्योजकांनी संपर्क साधला असून, महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास
त्यांनी विशेष रुची दाखवली असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
****
देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा
तिसरा टप्पा सुरु असून सर्व राज्यांकडे कोविड लसीच्या एकूण १ करोड ६० लाखहून अधिक मात्रा उपलब्ध असल्याचं
आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. येत्या तीन दिवसात २ लाख ६७ हजारहून अधिक मात्रा
उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
आयुषमान भारत आणि अन्य आरोग्य विमा योजनांनध्ये म्युकरमायकोसिस
काळी बुरशी या आजाराचा समावेश करावा अशी विनंती कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.या आजाराला महामारी घोषित केल्यामुळे
यावरील उपचारासाठी आवश्यक औषधींच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर भर दिला जावा असं गांधी
यांनी पत्रात म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात १३२
जणांना म्यूकरमायकोसिस आजार झाला असून ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या सोलापूर इथं या
आजाराचे १२० रुग्ण उपचार घेत असून ३० रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. या
रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार घेता येणार असल्याचं पालकमंत्री
दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
****
प्रसिद्ध संगीतकार विजय पाटील उर्फ लक्ष्मण यांचं आज नागपूर
इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. आपले सहकारी सुरेंद्र
हेंद्रे यांच्या साथीनं विजय पाटील यांनी १९७०च्या दशकात संगीत दिग्दर्शन सुरू केलं, पांडू हवालदार या चित्रपटापासून
त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ झाला. प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक दादा कोंडके यांनी
या जोडीचं राम लक्ष्मण असं नामकरण केलं, त्यानंतर अवघ्या काही काळातच राम यांचं निधन
झालं, मात्र विजय पाटील यांनी राम लक्ष्मण याच नावानं जवळपास ७५ हिंदी, मराठी तसंच
भोजपुरी चित्रपटांना संगीत दिलं. 'तुमचं
आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ एजंट विनोद,
हम से बढकर कौन, आगे की सोच, मैंने प्यार किया, पत्थर के फूल, हंड्रेड डेज, हम आपके
है कौन, हम साथ साथ है, आदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत जागतिक पातळीवर प्रसिद्ध
झालं. मैंने प्यार किया चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानं गौरवण्यात
आलं होतं. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी राज्य शासनाचा २०१८ सालचा लता मंगेशकर पुरस्कार
देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
यांनी लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राम-मक्ष्मण युगाचा आज अस्त झाला, मात्र त्यांच्या संगीतातून ते कायम रसिकांच्या स्मरणात राहतील असं देशमुख
यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
पदोन्नती
मधील आरक्षण देणं हे राज्याच्या अधिकारात असून, हे आरक्षण रद्द करणारा ७ मे रोजीचा शासन आदेश रद्द करावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक
जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ही मागणी मान्य न झाल्यास, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या
संघटनांना सोबत घेऊन १५ जूनला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी
दिला. राज्य शासनाच्या सर्व प्रवर्गातील पदांमध्ये ३३ टक्के आरक्षणाची
पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांसाठी तरतूद असतांना ते प्रत्यक्ष आज आहे का आणि त्याचा
किती अनुषेश आहे? हे राज्य शासनाने स्पष्ट करावं, असंही कवाडे म्हणाले.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक
अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी
उद्या एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश
पोखरियाल निशंक, यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि लाभधारक सहभागी होणार आहेत.
****
राज्यात
२०२१ - २२ मधील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप
अंतिम करण्यात आली नाही, असं शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलं आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबत
सविस्तर दिशानिर्देश शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळवण्यात येतील, असं शिक्षण उपसंचालक
द गो जगताप यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी
आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये, विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होईल
अशा सूचना दिल्या जाऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
****
औरंगाबाद
इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी इथं १८ कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. यामध्ये जालना तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश
आहे. उर्वरित १४ मृत रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत.
****
जालना
जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित ३४२ नवे रुग्ण आढळून आले तर तीन रुग्णांचा आज
मृत्यू झाला. यामुळे या संसर्गानं आतापर्यंत
दगावलेल्या रुग्णांची संख्या ९४७ झाली आहे. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ५८ हजार
३६७ झाली आहे.
****
बीड जिल्ह्यात
आज ७८९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक १९५ रुग्ण बीड तालुक्यात, त्या
खालोखाल गेवराई तालुक्यात १०३, केज ७५ आष्टी तसंच अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी ६९,
शिरुर तसंच परळी तालुक्यात प्रत्येकी ५७, पाटोदा ५३, धारुर ४७, माजलगाव ४२, आणि वडवणी
तालुक्यातल्या २२ रुग्णांचा समावेश आहे.
****
कोविड
उपचारादरम्यान म्यूकर मायकोसिस या आजाराचा संसर्ग झालेले आणि सध्या औरंगाबाद इथं एमजीएम
रुग्णालयात उपचार घेत असलेले डॉक्टर राहुल पवार यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची
तयारी एमजीएम रुग्णालयाने घेतली आहे. लातूर इथं खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप
करणारे डॉ. राहुल पवार यांना कोविड आणि त्यानंतर म्यूकर मायकोसिसची लागण झाली, आर्थिक स्थिती बेताची असल्यानं, सामाजिक
माध्यमातून त्यांना मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
यांनी पवार यांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले
आहेत.
****
बुलडाणा
जिल्हयातील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू जावेद चौधरी यांनी कोविड सुश्रुषा
केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन यंत्र दिलं. अभिनेते अनुपम खेर यांनीही
बुलडाणा जिल्ह्यासाठी ३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन आणि तीन बिबॅप मशीन्स दिल्या
आहेत.
****
महाराष्ट्र
विधान परिषद बरखास्त करावी, अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते विधीज्ञ रेवण भोसले
यांनी केली आहे. याबाबत विधानसभेत एक ठराव घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्याची मागणी भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दक्षिणेतल्या काही राज्यांनी आपल्या विधान
परिषदा रद्द करून त्यावरील खर्च वाचवला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेचाही
खर्च वाचवावा, हा निधी जनतेच्या कोणत्याही कामासाठी वापरावा, राज्यातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तकं मोफत द्यावी, शेतकऱ्यांना - कामगारांना
मदत करावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.
****
बुलडाणा
इथल्या भारत विद्यालयाचे प्रगतीशील शिक्षक नरेंद्र लांजेवार यांनी टाळेबंदीच्या
काळात पाचवी ते नववी पर्यंतच्या मुलांसाठी ‘रोज एक पुस्तक वाचू या‘ही मोहिम
राबवली. या मोहिमेत त्यांनी १६०० विद्यार्थ्यांसाठी व्हॉटसऐपच्या माध्यमातून रोज
एक बालसाहित्याचं पुस्तक पीडीएफ स्वरूपात वाचायला उपलब्ध करून दिलं. टाळेबंदीमुळे
ग्रंथालय बंद असल्यामुळे मुलांना वाचनासाठी पर्याय म्हणून हा उपक्रम राबवत
असल्याचं लांजेवार यांनी सांगितलं.
//********//
No comments:
Post a Comment