Saturday, 22 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.05.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात २०२१-२२ मधील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आली नाही, असं शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलं आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबत सविस्तर दिशानिर्देश शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळवण्यात येतील, असं शिक्षण उपसंचालक द गो जगताप यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये, विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होईल अशा सूचना दिल्या जाऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

****

संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतले संगीतकार लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं आज नागपूर इथं निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. राजश्री फिल्म्सच्या एजंट विनोद या चित्रपटाने राम लक्ष्मण यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती. आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिलं. त्यांनी सुमारे ७५ हिंदी, मराठी आणि भोजपुरी चित्रपटांना संगीत दिलं आहे. मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ है या चित्रपटांना राम लक्ष्मण यांनी दिलेलं संगीत आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलं होतं.

****

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं मिशन ऑक्सिजन स्वावलंबन योजना हाती घेतली आहे. या योजनेतंर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. हा निर्णय जाहीर केल्यानंतर आमच्याकडे बऱ्याचशा उद्योजकांनी संपर्क साधला असून, महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास त्यांनी विशेष रुची दाखवली असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं ३१ मार्च रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारला अतिरिक्त असलेली ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत अतिरिक्त असलेली रक्कम हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा, जागतिक आणि देशांतर्गत आव्हानं आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर झालेला प्रतिकूल परिणाम दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा, आढावा घेण्यात आला.

****

कोविड प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं असून, ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, त्यांना योग्य कालावधीनंतर दुसरी मात्रा देण्यावर भर देण्याचे निर्देश, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिले आहेत. त्यांनी काल विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावर्षी जुलैपर्यंत लसीच्या ५१ कोटी मात्रा खरेदी केल्या जातील, लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार लस उत्पादन कंपन्यांना आवश्यक सर्व सहकार्य करत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. 

****

म्युकर मायकोसिस अर्थात काळी बुरशीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी योग्य तयारी करण्याचे निर्देश, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सिचवांना पत्र लिहिलं आहे. कोविड रुग्णालय आणि अन्य आरोग्य केंद्रांमध्ये, म्युकर मायकोसिसचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असून, यासंदर्भात राज्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासही, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

दरम्यान, म्युकर मायकोसिस रोगावर प्रभावी ठरणाऱ्या अॅम्फोटेरेसीन- बी या इंजक्शनचा, सध्या मोठ्या प्रमाणावर देशात तुटवडा जाणवत असून, त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी, देशातल्या पाच औषध कंपन्यांना या इंजक्शनचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश, केंद्र सरकारने दिले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७७वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ४७ हजार ७७८ नागरीकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. यामध्ये ग्रामीण भागातल्या दोन लाख ५६ हजार ८६६, तर शहरी भागातल्या दोन लाख ९० हजार ९१२ नागरीकांचा समावेश आहे.

****

स्वामी विवेकानंद केंद्र शाखेच्या वतीने उस्मानाबाद शहरातल्या तेलगु वैद्य वस्तीतील गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आलं. जीवभावे ईश सेवा या स्वामी विवेकानंद यांची शिकवणुक नुसार केंद्र संपूर्ण देशभर कार्यरत आहे.

****

नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानच्या परिसरात दाखल झाल्यानंतर पोषक वातावरणामुळे पुढील ४८ तासांमध्ये ते आणखी प्रगती करणार असल्याचं हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. मोसमी वारे ३१ मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता असून, त्यानंतर सहा ते आठ दिवसांत ते महाराष्ट्रात दाखल होऊ शकतात, असं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments: